दीडपट हमीभाव जाहीर : कापूस ५१३०; सोयाबीन ३३९९, तूर ५६७५, मूग ६९७५

दीडपट हमीभाव जाहीर : कापूस ५१३०; सोयाबीन ३३९९, तूर ५६७५, मूग ६९७५
दीडपट हमीभाव जाहीर : कापूस ५१३०; सोयाबीन ३३९९, तूर ५६७५, मूग ६९७५

नवी दिल्ली : खरीप हंगाम २०१८-१९ करिता १४ पिकांच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) देण्याचा बहुचर्चित निर्णय केंद्र सरकारने बुधवारी (ता. ४) घेतला. यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांच्या एमएसपीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे.  सुधारित एमएसपीनुसार धान्य खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संस्थांबरोबरच इतर संस्थांचा पर्यायही विचाराधीन असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या दरवाढीमुळे सरकारी खजिन्यावर पंधरा हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा भार येणार आहे. एमएसपी दर हे ‘ए टू एफएल’ सूत्रानुसार ठरविण्यात आले आहेत, तर शेतकरी संघटनांची एमएसपी वाढीसाठी मागणी असलेले ‘सी टू’ सूत्र फेटाळण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले. शेतकरी सर्वांत मोठा उत्पादक, विक्रेता आणि खरेदीदार असूनही शेतीमालाला रास्त दर त्याला मिळत नव्हता. म्हणूनच मोदी सरकारने अर्थसंकल्पात दीडपट एमएसपीची घोषणा केली होती. आज हा ऐतिहासिक निर्णय अस्तित्वात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल, असाही दावा गृहमंत्र्यांनी केला. या निर्णयामुळे महागाई वाढण्याची शक्‍यताही गृहमंत्र्यांनी फेटाळून लावली. मोदी सरकारच्या कार्यकाळात जीडीपी विकासदर हा महागाई दराच्या तुलनेत दुप्पट आहे. शिवाय, चार वर्षांत महागाई नियंत्रणात राखण्याचा सरकारला अनुभव आहे. त्यामुळे महागाई वाढेल असे म्हणणे अनुचित असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. मात्र, सरकार केवळ गहू आणि तांदळाची खरेदी करत असल्याने अन्य पिकांची खरेदी कशी होणार यावर बोलताना राजनाथसिंह यांनी शेतकऱ्यांकडून एमएसपी दराने धान्य खरेदी व्हावी, यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनीही या एमएसपी वाढीच्या निर्णयाचे स्वागत करताना धान्य खरेदी आणि साठवणीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. अन्न महामंडळातर्फे खरेदी केली जाते. राज्य सरकारच्या संस्थाही धान्य खरेदी करतात. याव्यतिरिक्त आवश्‍यकता भासल्यास अन्य संस्थांचीही नियुक्ती केली जाऊ शकते किंवा भावांतरसारख्या योजनांचीही मदत घेतली जाऊ शकते, असे पासवान यांनी सांगितले. यामुळे अन्नधान्यावर दिले जाणारे अंशदान वाढणार असले तरी त्याची चिंता नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याला सरकारने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांचा एक एक दाणा खरेदी केला जाईल, असेही पासवान यांनी स्पष्ट केले.

काय आहे ए टू प्लस एफएल सूत्र खरीप पिकांसाठी दीडपट एमएसपी ‘ए-टू प्लस एफएल’ या सूत्राच्या आधारे ठरविण्यात आली आहे. जमीन भाडे वगळता यंत्र, बियाणे, खते, मजुरी, पाणी या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. काही ठिकाणी घरातील अन्य व्यक्ती शेतात काम करत असल्याने त्यांच्या श्रमाचा, त्याचप्रमाणे शेतीसाठी पाणी बाहेरून आणावे लागले असल्यास त्याचाही विचार यात केला आहे. एमएसपीसाठी ‘सी-टू’ सूत्र अमान्य स्वामिनाथन आयोगाने शिफारस केलेल्या ‘सी-टू’ सूत्रामध्ये बियाणे, खते, मजुरी, यंत्र वापर, इंधन, पाणी यांसारख्या घटकांसोबतच जमिनीचे भाडेदेखील निश्‍चित करून त्याआधारे एमएसपी ठरविण्याचे गणित मांडण्यात आले होते. देशभरातील शेतकरी संघटना या ‘सी-टू’ सूत्रानुसारच एमएसपी मिळावा यासाठी आग्रही आहेत. परंतु, देशभरात जमिनीचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने सरासरी भाडे ठरविणे शक्‍य नाही, असे निती आयोगाने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे हे सूत्र मान्य झाले नाही.

केंद्र सरकारने उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभावाचे दिलेले आश्वासन पूर्ण करताना मला अत्यंत आनंद होत आहे. हमीभावात ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. कृषी क्षेत्र विकास आणि शेतकरी कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे. यापूर्वी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, या पुढेही आवश्यक पावले उचलली जातील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी  

हमीभाव खरीप २०१८-१९ (दर क्विंटलचे)

पीक प्रकार खर्च (रुपये) उत्पादन खर्चाच्या दीडपट सुधारित एमएसपी (रुपये) दरवाढीची टक्केवारी
भात (साधारण) ११६६ १७५० ५०.०९
भात (श्रेणी ए) - १७७० ५१.८०
ज्वारी (संकरीत) १६१९ २४३० ५०.०९
ज्वारी (मालदांडी) - २४५० ५१.३३
बाजरी ९९० १९५० ९६.९७
रागी (नाचणी) १९३१ २८९७ ५०.०१
मका ११३१ १७०० ५०.३१
तूर ३४३२ ५६७५ ६५.३६
मूग ४६५० ६९७५ ५०
उडीद ३४३८ ५६०० ६२.८९
भुईमूग ३२६० ४८९० ५०
सूर्यफूल ३५९६ ३५९६ ५०.०१
सोयाबीन २२६६ ३३९९ ५०.०१
तीळ ४१६६ ६२४९ ५०.०१
खुरासणी (कराळं) ३९१८ ५८७७ ५०.०१
कापूस (मध्यम धागा) ३४३३ ५१५० ५०.०१
कापूस (लांब धागा) - ५४५० -

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. दीडपट हमीभावाचे मोदी सरकारने दिलेले आश्वासन पाळले आहे. वाढलेल्या हमीभावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल. उत्पादन वाढेल. गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल. आयात खर्च कमी होईल आणि पोषणमूल्य सुरक्षा वाढेल.  - राधामोहनसिंह, केंद्रीय कृषिमंत्री  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com