चारा छावण्यांमध्ये तीन हजार जनावरांना परवानगी

चारा छावण्यांमध्ये तीन हजार जनावरांना परवानगी
चारा छावण्यांमध्ये तीन हजार जनावरांना परवानगी

मुंबई : दुष्काळी भागातील चारा छावण्यांमध्ये प्रत्येकी तीन हजार जनावरांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती महसूल आणि मदत-पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. ५) दिली. तसेच शेती-पिकांच्या नुकसानीपोटी आतापर्यंत २,७०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.  काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यापार्श्वभूमीवर छावण्यांमधील जनावरांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. याआधीच्या शासन निर्णयानुसार एका छावणीत किमान अडीचशे ते कमाल पाचशे जनावरे दाखल करून घेण्याचे बंधनकारक होते. मात्र, गावपातळीवर सोई-सुविधांअभावी दुसरी छावणी सुरू करण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे छावण्यांमधील जनावरांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, यापुढे एकेका चारा छावणीत कमाल तीन हजार जनावरे सहभागी करून घेता येणार आहेत. सध्या राज्यात २८ छावण्या कार्यरत आहेत, यामध्ये सुमारे चौदा हजार जनावरे सहभागी आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना शासनाकडून ७० रुपये अनुदान दिले जातात. त्याव्यतिरिक्त येत्या एप्रिल, मे महिन्यानंतर जनावरांच्या औषधाचा खर्च स्वतंत्रपणे देण्यासाठी तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीपोटी पाच हजार कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यापैकी २,७०० कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 

दुष्काळी भागात सध्या २,६०० पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरू आहेत. त्यासाठी आतापर्यंत १७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. टँकर्सवर येत्या मेपर्यंत सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय बिलाअभावी वीज तोडलेल्या योजनांच्या बिलातील पाच टक्के रक्कम राज्य शासन भरणार आहे, या निर्णयामुळे महावितरणने अशा योजनांची वीज जोडणी पूर्ववत सुरू केली आहे. बंद अवस्थेतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची वसुली पूर्णपणे थांबवली असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या एक एप्रिलपासून कर्जाच्या पुर्नगठणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.

२,८०० मराठा तरुणांना उद्योगासाठी अर्थसाह्य- मंत्रिमंडळ उपसमितीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानेही आढावा घेण्यात आला. मराठा तरुणांना उद्योग-व्यवसायासाठी दहा लाख रुपये अर्थसाह्य योजनेअंतर्गत आतापर्यंत २,८०० तरुणांनी कर्ज घेतले आहे. तसेच ५४ हजार तरुणांना आतापर्यंत लेटर ऑफ इंटेट दिल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगितले. मराठा उद्योजक वाढावेत यासाठी राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांच्या कर्जाला राज्य शासनाने थकहमी दिली आहे.  सारथीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा तरुणांना अर्थसाह्य केले जाणार आहे. एका विद्यार्थ्यामागे शासन सव्वाचार लाख रुपये खर्च करणार आहे. सारथीअंतर्गत नेट आणि सेट परीक्षा देणाऱ्या मराठा तरुणांसाठी कोचिंग क्लासेस सुरू केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी आतापर्यंत २४४ कोटी रुपये वितरित केल्याचेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com