मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक : सुभाष देशमुख

मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक

सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-मापाडींच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या अडचणींबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच मापाडींच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता.१७) येथे दिले. खोट्या पावत्या करून शेतक-यांना फसवणा-या व्यापा-यांनाही त्यांनी सूचक इशारा दिला. तसेच, बाजार समित्यांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची सूचनाही त्यांनी केली.  महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या मापाडी कामगारांची राज्यव्यापी परिषद रविवारी बाजार समितीच्या शिवदारे मंगल कार्यालयात पार पडली़. या परिषदेचे उद् घाटन राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव यांच्या हस्ते झाले़. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून मंत्री देशमुख बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, संघटनेचे सरचिटणीस सुभाष लोमटे, उपाध्यक्ष डॉ़ हरीश धुरट, उपाध्यक्ष राजकुमार घायाळ, विकास मगदूम, खजिनदार नवनाथ बिनवडे, सहचिटणीस अप्पा खताळ, सहचिटणीस हनुमंत बहिरट, अविनाश घुले, सहचिटणीस गुणाबाई कांबळे, संघटक गोरख मेंगडे, कृष्णा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती़.  सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ‘‘हमाल-मापाडी हे बाजार समित्यातील व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या कामाची कदर व्हायलाच पाहिजे, त्यादृष्टीने सरकार म्हणून योग्य ती काळजी घेणे, त्यांच्या अडचणीबाबत सकारात्मक राहणे, आम्ही आमचे कर्तव्य समजतो. पण, बाजार समित्यांचीही काही जबाबदारी आहे. आज अनेक व्यापारी शेतक-यांना देण्यासाठी चार प्रकारच्या पावत्या करतात, शेतक-यांना देण्यासाठी वेगळी, बाजार समितीला दाखवण्यासाठी वेगळी आणि त्यांच्या हिशोबासाठी वेगळी, ही शेतक-यांची फसवणूक आहे. पण बाजार समित्यांवर असे व्यापारी शोधून कारवाई करण्याची जबाबदारी आहे. हमीभावाची चर्चा होते, पण हा कायदा १९६३ पासून आहे, त्यामध्ये आम्ही काही बदल करतो आहोत, बाजार समित्यांनीही त्यादृष्टीने जबाबदारीने वागले पाहिजे. या आधीच्या सरकारने त्याला कधीच हात लावला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आज राज्यातील १७० बाजार समित्या ई-नामशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे या सगळ्या फसवणुका संपणार आहेत.’’ श्री. आढाव म्हणाले, की सरकारच्या नव्या धोरणानुसार असंख्य हमाल आणि तोलारांना वगळले जाणार आहे, ते बेकार होणार आहेत़. त्यांना वाचवणे गरजेचे आहे़. त्यांची उपासमार थांबवणे गरजेचे आहे़. त्यांचे बाजार समित्यांमध्येच पुनवर्सन झाले पाहिजे़, माथाडी कायद्याची अंमलबजावणी करून सन्मानाने जगण्यासाठी बळ दिले पाहिजे. या वेळी जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी प्रास्ताविकेतून हमाल आणि माथाडींचे प्रश्न मांडले़. तसेच, या वेळी त्यांनी डॉ़. बाबा आढाव यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शासनाकडे मागणी केली़, तसेच हमाल-माथाडी कामगारांना पिवळे रेशन कार्ड, घरकुल योजना राबवावी आणि माथाडी कायदा अमलात आणण्याची मागणी केली़.  डॉ. आढावांचे सरकारला प्रश्न डॉ़. आढाव यांनी न्यायालयात हमाली आणि माथाडीला सोबत घेऊन चर्चा केली जात नाही़, न्यायालयात बाजू मांडायलाही संधी देत नाही़त, माथाडी कायद्याला आज ५० वर्षे पूर्ण होतात आणि त्याची अंमलबजावणी अद्याप नाही, कोणत्या तोंडाने या कायद्याची पन्नाशी साजरी करायची? असा प्रश्न उपस्थित केला़. शेतक-यांची कर्जमाफी आणि हमीभावाचा प्रश्न कसा सोडवणार? त्याची अंमलबजावणी कशी करणार? असे प्रश्नही डॉ़. आढाव यांनी सरकारला केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com