नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
ताज्या घडामोडी
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर, मोताळ्यात शेतीमाल खरेदी बंद
संग्रामपुरात पाच दिवसांपासून खरेदी बंद असून, मोताळ्यातही हीच वेळ निर्माण झाली आहे. यंत्रणांनी तातडीने जागा, तसेच बारदाना उपलब्ध न केल्यास इतर ठिकाणीही अशीच स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत.
बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली भरडधान्य खरेदी साठवणुकीसाठी जागा, बारदान्याच्या अडचणीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. संग्रामपुरात पाच दिवसांपासून खरेदी बंद असून, मोताळ्यातही हीच वेळ निर्माण झाली आहे. यंत्रणांनी तातडीने जागा, तसेच बारदाना उपलब्ध न केल्यास इतर ठिकाणीही अशीच स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत.
गोदामे भरली, मका खरेदी रखडली
शासनाकडे मका साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने संग्रामपूरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मका खरेदी बंद आहे. शिवाय खरेदी विक्री संस्थेच्या आवारात शेतकऱ्यांचा दोन हजार क्विंटल मका मोजणीच्या प्रतिक्षेत पडून आहे. खरेदी विक्री संस्थेकडून तहसीलदारांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रही देण्यात आले आहे. मोजमापात होत असलेल्या विलंबामुळे ऑनलाइन नोंदणी झालेली असतानाही मका उत्पादकांना नाइलाजाने हमीभावापेक्षा कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना मका विकण्याची वेळ निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासनाने नाफेडअंतर्गत भरड धान्य खरेदी योजना सुरू केली आहे. संग्रामपूरमध्ये तालुक्यात सुमारे १ हजार २०० शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी २८ नोव्हेंबरपर्यंत १७७ शेतकऱ्यांचा सहा हजार ५७६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. सोबतच २२० शेतकऱ्यांना संदेश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक भास्कर निंबोळकर यांनी दिली. सद्यःस्थितीत खरेदी विक्री संस्थेच्या आवारात दोन हजार क्विंटल मका मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. या तालुका खरेदी विक्री संस्थेचे गोदाम आधीच फुल्ल झालेले असल्याने खरेदी केलेला मका ठेवायचा तरी कुठे असा प्रश्न सध्या यंत्रणांना पडला आहे. जास्त क्षमता असलेले गोदाम तालुक्याच्या ठिकाणी नसल्याने शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
मोताळ्यातही अशीच स्थिती
मोताळा तालुक्यात १ हजार ४०० शेतकऱ्यांची शासकीय मका व ज्वारी खरेदी करण्यासाठी नोंदणी झालेली आहे. गोदाम व्यवस्थेअभावी ही खरेदी बंद करण्याची वेळ आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मोताळा येथील गोदाम क्षमता पूर्ण झाली असल्याने आता या खरेदीच्या मार्गात खोडा निर्माण झाला आहे. खरेदी प्रक्रिया राबविणाऱ्या शेतकरी कंपनीने वारंवार शासनाकडे गोदाम उपलब्ध करून देण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु अधिकारी स्तरावरून अद्याप काहीही झालेले नाही.
जिल्ह्यात ५० हजार क्विंटलपेक्षा जास्त खरेदी
जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी १४ केंद्र सुरु आहेत. त्यावर आतापर्यंत ४८ हजार ४२२ क्विंटल मका तर ४ हजार १०१ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. जागेमुळे दोन ठिकाणी अडचण आलेली आहे. या ठिकाणी जागा उपलब्धतेबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी सहा बारदान्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच हा बारदाना मिळणार आहे. जेथे सध्या बारदाना नाही तेथे शेतकऱ्यांच्या बारदान्यासह खरेदी केली जात आहे, असेही शिंगणे यांनी सांगितले.
- 1 of 1023
- ››