काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन

काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन
काटक ‘माडग्याळ’ मेंढीचे होणार संवर्धन

मुंबई : राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे. भारत वगळता इतर बहुतांश देशांमध्ये दैनंदिन आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते. ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन आदी देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठा वाव आहे. त्यातच राज्यातील मेंढ्यांची संख्या सातत्याने घटत चालल्याने कत्तलीसाठी पुरेशा प्रमाणात मेंढ्या उपलब्ध होत नाहीत. परिणामी, मेंढी मांसाच्या निर्यातीतही घट होत आहे. तसेच, राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने बीफची उपलब्धता कमी होत आहे. ही कमतरता मेंढी मांसातून काही अंशी भरून काढता येऊ शकेल, असाही एक विचार आहे.  चरण्याच्या सवयीमुळे मेंढ्या जमिनीलगतचे गवत खात असल्यामुळे जंगलाची हानी होत नाही. मेंढ्या लवकर वयात येतात, त्यांचा इतर जनावरांच्या तुलनेत गाभण काळ कमी असतो, त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीत त्या तीनवेळा वेतात. जरी मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. त्यामुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाचे खात्रीशीर साधन देणारा व्यवसाय म्हणून मेंढीपालनच्या विकासाचे उद्दिष्ट आहे. देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर, राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध असून, ही जात काटक आहे. इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते. माडग्याळ मेंढी संगोपन व संवर्धनास प्रोत्साहन दिल्यास मेंढी मांसनिर्यातीतून शेतकऱ्यांना परकी चलन मिळण्यास मदत होईल, असा अंदाज आहे. या संशोधन केंद्रास राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच पुण्यश्लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ, पुणे यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. प्रतिकूल वातावरणात तग धरतात उष्ण तापमान, अवर्षणप्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणाऱ्या चाराटंचाई परिस्थितीत गाई, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे. मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. तसेच मेंढ्यांच्या कातडी व लोकरीपासून तयार होणाऱ्या साहित्याच्या उद्योगाला चालना मिळेल आणि लेंडी खताचा उपयुक्त सेंद्रिय खत म्हणूनसुद्धा वापर करता येईल, त्यामुळे आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com