कर्जमाफीतून गावागावांत फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न

Government's attempt to divide villages by loan waiver
Government's attempt to divide villages by loan waiver

नगर ः ‘‘उद्योगपतींना रोजगारासाठी मजूर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकार शेतीमालाला भाव देत नाही. मते मिळविण्यासाठी सर्वच पक्षांकडून कर्जमाफीची घोषणा केली जाते. कर्जमाफी करूनही शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबत नाही. आत्महत्येचा कलंक पुसल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तत्कालीन व विद्यमान सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे नुसता तमाशा आहे. बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. ‘तोडा, फोडा आणि झोडा’ या ब्रिटिश नीतीचा अवलंब हे सरकार करीत आहे. गावागावांत फूट पाडण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे,’’ अशा शब्दांत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सरकारवर टीका केली. 

नगर येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. पाटील म्हणाले, ‘‘सरकारकडून शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा कमी भाव दिला जातो. उत्पादनापेक्षा दीड पट भाव देण्याचे केवळ आश्‍वासन दिले जाते. मात्र, ते पाळले जात नाही. कर्जाच्या रोगामुळे आत्महत्या वाढत आहेत. राज्यात आजअखेर ८० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मात्र, त्याचे कोणालाच सोयरसुतक नाही.’’ शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेचे गेली अनेक वर्ष काम केले आहे. कुठल्याही परिणामाची पर्वा न करता शेतकरी संघटना हे सुरूच ठेवणार आहे. 

सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी कुठलीही अट लावली जात नाही. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना मात्र निकषाची चाळणीच लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी केवळ मताचे राजकारण करण्याची दिली जात आहे. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी १९ ते २३ मार्चदरम्यान इस्लामपूर (सांगली) येथे राष्ट्रीय शेतकरी अधिवेशन होत आहे. यात ग्रंथदिंडी, कविसंमेलन, साहित्य आणि शेतकरी परिसंवाद, आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत.’’ असे पाटील म्हणाले. 

संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, अशोक पठारे, अहमद जहागीरदार, बच्चू मोढवे, युवराज जगताप, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिळे, बच्चू मोढवे आदी उपस्थित होते.

‘सीएए’, ‘एनआरसी’चा नवा खुळखुळा पाटील म्हणाले, ‘‘सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) कायदा सरकारने मंजूर केला. मात्र, आपले अपयश झाकण्यासाठी सरकार हा नवा खुळखुळा वाजवीत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com