मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे पाऊल ः फडणवीस

मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे पाऊल ः फडणवीस
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे पाऊल ः फडणवीस

औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी वळविण्यासाठी योजनेतून येत्या काळात मराठवाडा दुष्काळमुक्‍त करण्याच्या दृष्टीने केवळ संकल्प न करता त्या दिशेने पाऊल टाकल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्त स्थानिक सिद्धार्थ उद्यानामधील स्मृतिस्तंभाजवळ मंगळवारी (ता. १७) आयोजित ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘१७ सप्टेंबरला मराठवाड्याला मिळालेला मुक्‍तीचा दिवस व जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्याचा दिवस स्वातंत्र्याची विलक्षण अनुभूती देणारे क्षण आहेत. मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्‍ती देण्यासाठी मराठवाडा ग्रिडसारखा प्रकल्प, ज्यामध्ये मराठवाड्यातील सगळी धरणे ग्रिडने जोडली जाणार आहेत. त्यामध्ये ६४ हजार किलोमीटरची पाइपलाइन टाकून मराठवाड्याच्या प्रत्येक गावांत आणि शहरात पिण्याचे स्वच्छ पाणी वर्षाचे ३६५ दिवस पुरविले जाईल. यासाठी केवळ निर्णय घेऊन सरकार थांबले नाही, तर चार जिल्ह्यांच्या निविदाही सरकारने काढल्या आहेत. अजून चार जिल्ह्यांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. २० हजार कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या ग्रिडनंतर मराठवाड्यातील जनतेला कधीही पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही. औरंगाबाद शहरासाठी १६५० कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे पुढील किमान ५० वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न औरंगाबादला भासणार नाही. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणण्याची योजना सरकारने हाती घेतली आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळून मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम’ होण्यास मदत होईल. समृद्धी महामार्गामुळे उद्योगाचे मॅग्नेट तयार करतोय. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डीएमआयसीमध्ये देशातील पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटीचे लोकार्पण केले. त्याचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. डीएमआयसी व समृद्धी महामार्गामुळे औरंगाबाद, जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात उद्योगाचे मॅग्नेट तयार होईल. त्यामुळे सर्वांना रोजगार तर मिळेलच; शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याचे काम मराठवाड्यातून होईल. येणारा काळ मराठवाड्याच्या विकासाचा काळ असेल,’’ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

तत्पूर्वी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे सिद्धार्थ उद्यानात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. मुक्‍ती संग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

या वेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव विष्णुपंत धाबेकर, पालकमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांसह त्यांचे उत्तराधिकारी यांची उपस्थिती होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com