द्राक्ष उत्पादकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजायला हवा : गोविंद हांडे

द्राक्ष उत्पादकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजायला हवा :  गोविंद हांडे
द्राक्ष उत्पादकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजायला हवा : गोविंद हांडे

पुणे : अनेक धोके पत्करून द्राक्ष उत्पादक माल तयार करतो. भारतीय द्राक्ष उत्पादक जगात ७ व्या क्रमांकावर असून देशातून ३२ लाख टन इतकी क्षमता निर्माण झाली आहे. मात्र, द्राक्षाचे मार्केटिंग करण्यात कमी पडतो, त्यामुळे बाजारात अनेक गैरसमज आहेत. आगामी काळात बाजारपेठेची मागणी, ग्राहकांची मानसिकता व व्यावसायिक बदल स्वीकारून द्राक्ष उत्पादकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे तांत्रिक सल्लागार गोविंद हांडे यांनी केले.  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ५९ व्या वार्षिक अधिवेशनात तिसऱ्या दिवशीच्या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘द्राक्ष काढणी व निर्यात’ या विषयावर ते बोलत होते. या सत्रात व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ. इंदू सावंत, संघाचे उपाध्यक्ष शिवाजी पवार, खजिनदार कैलास भोसले, मध्यवर्ती विज्ञान संशोधन समितीचे अध्यक्ष अरविंद कांचन यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री. हांडे म्हणाले, की द्राक्ष उत्पादनात आपण पुढे येत आहोत. मात्र, आता उत्पादनात मास्टर होण्यापेक्षा विपणन व विक्री क्षेत्रात मास्टर होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर बाजारपेठ मागणी व ग्राहकांची मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे. आगामी काळात द्राक्ष उत्पादनाबरोबर मार्केटिंगमध्ये पुढे जाऊन आपण सर्वांना काम करावे लागेल अशी सूचना केली.  या सत्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. शर्मा यांनी ‘उच्च प्रतीच्या बेदाणा निर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले, की, बेदाणानिर्मितीमध्ये कोटिंग तंत्रज्ञान महत्त्वाचा आहे. बेदाणा पॅकेजिंग तंत्रज्ञानावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र काम करत आहे. त्यामुळे रेझिननेट प्रणालीची मागणी होत आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादन, गुणवत्ता व निर्यात यामध्ये चांगल्या संधी निर्माण होतील.  ट्रेंड क्रॉप कंपनीच्या डॉ. नतालिया मुनोज यांनी द्राक्ष उत्पादकांना ‘उर्वरित अंशमुक्त द्राक्ष निर्यातीसाठी रोग व कीड नाशकांचा योग्य वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सांगितले, की नैसर्गिक घटक अर्क सूक्ष्मजीव यांचा वापर करून रसायनविरहीत घटकांचा वापर करून शेतमाल उत्पादित करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. जैविक कीडनियंत्रण केल्याने रसायनांचे अंश यांचे आढळणारे प्रमाण यांसह पिकाची हानी कमी होते. तसेच मित्रकीटक व उपयुक्त बुरशी याचे नुकसान होत नाही. विशेष म्हणजे कीडनियंत्रण यासह उत्पादनात गुणवत्तावाढ, पर्यावरणपूरक व मानवी जीवास हानीविरहित अन्नसुरक्षा देते. कॉपर, सल्फर, ओक द्रावण यांच्या निर्मितीसाठी उत्कृष्ट प्रकारचा कच्चा माल वापरण्यात येतो. कॉपरच्या वापरातून वाढ होण्याची क्षमता वाढते, बदलत्या हवामानात झाड अधिक कार्यक्षम होते. झाड प्रतिबंधात्मक, उपचारात्मक होण्यास कार्य करते. सल्फर हे फवारणी व ठिबकच्या माध्यमातून देत येत असल्याने ते फायदेशीर ठरत असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत चिली व इजिप्त या देशात प्रयोग सुरू असून, सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. संजय पांढरे यांनी ‘शेतकरी उत्पादक कंपनी व द्राक्ष उत्पादकांसाठी नव्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशभर काम करण्याची शेतकरी उत्पादक कंपन्याना मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. २०१८-१९ च्या बजेटमध्ये सरकारने ऑपरेशन ग्रीनला मंजुरी दिली असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद आहे. राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत वेगवेगळे क्लस्टर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्याच्या संधी आहेत. द्राक्ष उत्पादकांना उत्पादक कंपन्यांना व्यापारी तत्त्वासाठी स्मार्टमधून अनुदान देण्यास येईल, असे प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘मेडिका’ वाणात उत्पादनाबरोबर प्रक्रियेत संधी भारतातून बेदाण्याची २४ हजार टन निर्यात होते. तर ११ हजर टन आपण आयात करतो. ज्यूसनिर्मितीसाठी मेडिका हा वाण विकसित केले आहे.. या वाणाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादनाबरोबर प्रक्रियेत संधी निर्माण झाली आहे. या वाणामध्ये झिरो वेस्ट प्रोसेसिंग काम केले आहे. ही द्राक्ष क्षेत्रात बदल करण्याचे सामर्थ्य या वाणात असून, प्रक्रिया व जोडउत्पादन याचे गणित पाहिल्यास तुलनेत अधिक उत्पन्न मिळू शकते, असे डॉ. ए. के. शर्मा यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com