प्रत्यक्ष पाऊस कमी, आकडेवारीच मोठी !

तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाइटवर प्रत्यक्षात उमटलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे.
rain data
rain data

बुलडाणा ः तालुका स्तरावरून जिल्हा प्रशासनाला पाठविलेला पर्जन्यमानाचा अहवाल आणि शासनाच्या वेबसाइटवर प्रत्यक्षात उमटलेली आकडेवारी यामध्ये अनेकदा तफावत दिसून येत आहे. आकड्यांच्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मागील काळात फटका बसलेला असून यंदाही असे प्रकार होत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.  चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील माटरगाव मंडळात २१२ मिलिमीटर पावसाची नोंद दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात चौकशी केली असता या मंडळात काही ठिकाणी अत्यंत हलक्या सरी कोसळल्या होत्या.  माटरगाव येथे काही जणांसोबत संपर्क केला असता त्यांनी पावसाबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले होते. तर शुक्रवारी (ता.११) संग्रामपूर तालुक्यातील पावसाची शासकीय नोंद बघितली असता यामध्ये मोठी चूक दिसून आली. तालुका स्तरावर महसूल मंडळनिहाय पावसाची नोंद दररोज तहसील कार्यालयात घेतली जाते. त्या आकडेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो.  असाच अहवाल शुक्रवारी सकाळी तालुक्यातील चार मंडळांचा पाठविण्यात आला. त्यामध्ये कवठळ, संग्रामपूर, पतुर्डा, बावनबीर या मंडळांतील पावसाची नोंद होती. मात्र, प्रत्यक्षात तहसील स्तरावरून गेलेला अहवाल आणि शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर असलेला अहवाल यातील आकडेवारीमध्ये खूपच तफावत दिसून आली.  हंगामात पडणाऱ्या पावसाची नोंद ही भविष्यात मदत मिळण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची ठरत असते. अशावेळी कमी पाऊस झालेला असतानाही कागदांवर नोंद अधिक होत असल्याने शेतकरी वंचित राहण्याची भिती आहे. याकडे संबंधित यंत्रणांनी, जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात यामुळे तालुक्यातील पीक नुकसानीची भरपाई ,पीकविमा अथवा शासनाच्या अन्य योजनापासून शेतकरी वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. 

शेतकऱ्यांना फटका शासनाच्या वेबसाइटवर दर्शविलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात १० सप्टेंबरला चारही मंडळातील पावसाची आकडेवारी ३६.३ मिलिमीटर अशी एकसारखी देण्यात आली होती. मुळात तालुक्यात बावनबीर मंडळात २, सोनाळा ६, पातुर्डा ८, कवठळ ५४ आणि संग्रामपूर ० मिलिमीटर पावसाची नोंद होती. याअगोदर काही वर्षांपूर्वी या तालुक्याची पावसाची जास्तीची आकडेवारी दाखविण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com