उत्कृष्ट कमगिरीसाठी सरकार शेतकरी गटांना देणार पुरस्कार

उत्कृष्ट कमगिरीसाठी सरकार शेतकरी गटांना देणार पुरस्कार
उत्कृष्ट कमगिरीसाठी सरकार शेतकरी गटांना देणार पुरस्कार

मुंबई : शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने गट शेती योजना यापूर्वीच सुरू केली आहे. या योजनेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना पुरस्कार देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (ता.२५) मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना २५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, १० लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार आणि ५ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गट शेती योजनेंतर्गत मंजूर गटांना प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के अथवा जास्तीत जास्त एक कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे; तसेच हे अनुदान प्रचलित इतर योजनेमधून मिळणाऱ्या अर्थसाह्याव्यतिरिक्त असेल. राज्यात २०१७-१८ व २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये मंजूर तरतुदीच्या अधीन राहून जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यास कृषी आयुक्तांना मंजुरी देण्यात आली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वित्तीय वर्षांत गटशेतीची अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी योजना आखण्यात आली आहे. योजनेअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अथवा कंपनी नोंदणी अधिनियम १९५६ च्या तरतुदीअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. दोन वर्षांत या योजनेअंतर्गत प्रत्येक गटास जास्तीतजास्त एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. प्रतिवर्षी २०० शेतकरी गटांना त्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.  पीक पद्धती व शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन गटशेतीसाठी आदर्श नमुना प्रकल्प मॉडेल तयार करण्यात येईल. यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांचा आदर्श नमुना प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल. या योजनेत शेती अवजारे, बँकेचा समावेशही करण्यात आला आहे. गटातील सदस्यांची संख्या वाढण्यासह या सदस्यांचे एकूण क्षेत्र १०० एकरांच्या पटीत वाढले तर वाढीव असलेल्या प्रत्येकी १०० एकरांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे वाढीव अनुदान दिले जाणार आहे. तुकडीकरणावर उपाय लोकसंख्या वाढीमुळे शेतजमिनीचे सातत्याने विभाजन होत असून, तिची धारणक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. सन २०१०-११च्या अहवालानुसार महाराष्ट्रात १९७०-७१ मध्ये असलेली ४.२८ हेक्टरची धारणक्षमता कमी होत जाऊन ती सन २०१०-११ मध्ये १.४४ हेक्टर प्रतिखातेदार इतकी कमी झाली आहे. काही ठिकाणी तर ती ११ ते १५ गुंठे इतक्या कमी प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत एवढ्या छोट्या क्षेत्रावर शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याचे आढळून आले आहे. या समस्येवर गट शेती हा प्रभावी उपाय आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com