केशरी शिधापत्रिकाधारकांना आजपासून सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण

शुक्रवारपासून(ता.२४) सवलतीच्या दरात केशरी रेशनकार्ड धारकास अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. यामधे ८ रुपये किलो गहू तर १२ रुपये किलो तांदूळ विक्री करण्यात येणार आहे.
ration card
ration card

मुंबई: कोरोना साथीचा मुकाबला करताना राज्यातील जनतेला अन्नधान्याचा तुटवडा पडून त्यांची उपासमार होता कामा नये. यासाठी शुक्रवारपासून (ता.२४) सवलतीच्या दरात केशरी रेशनकार्ड धारकास अन्नधान्याचे वाटप केले जाणार आहे. यामधे ८ रुपये किलो गहू तर १२ रुपये किलो तांदूळ विक्री करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील ३ कोटी ८ लाख जनतेस होणार आहे. मुंबई-ठाण्यातील सुमारे ५७ लाख जणांना याचा लाभ मिळणार आहे.  करोना साथीचा मुकाबला करण्यासाठी देशात व राज्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. टाळेबंदीमुळे घरातच बसावे लागलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील केशरी शिधपात्रिधारक कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (ता.२४) करण्यात येणार आहे. त्यांना ८ रुपये किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येणार आहे.  राज्यभरात ३ कोटी ८ लाख तर मुंबई परिक्षेत्रातील ५७ लाख लोकांना त्याचा लाभ होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या दारिद्री रेषेखालील कुटुंबांना रास्तभाव दुकानांमार्फत २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो. मजूर, हातावर पोट असलेल्या गरीब, कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु करुन मोफत अन्नधान्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सवलतीच्या दरातील अन्नधान्याबरोबर आता केंद्राच्या योजनेतील पाच किलो तांदूळही मोफत दिला जात आहे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या बाहेर असलेल्या व अत्यल्प उत्पन्न असेला वर्गही आर्थिक संकटात आहे, त्याचा विचार करुन केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वाटप करण्याचे राज्य सरकारने ठरविले. तसा ७ एप्रिलला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. ५९ हजार रुपयापेक्षा जास्त व एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना केशरी शिधात्रिका दिली जाते.  या वर्गात ३ कोटी ८ लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यांना ८ रुपये किलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व १२ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो तांदूळ म्हणजे पाच किलो अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये इतका भार तिजोरीवर पडणार आहे. सवलतीच्या दरातील धान्य विक्री मे व जून महिन्यासाठी करण्यात येणार आहे.  मुंबई परिक्षेत्रात मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शहरीभागाचा समावेश होतो. या परिक्षेत्रात केशरी शिधात्रिकाधारकांची संख्या १३ लाख ६२ हजार ७५२ असून सदस्य संख्या ५७लाख २० हजार २४० इतकी आहे. शुक्रवारपासून त्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ देण्यात येणार आहे. त्यासाठी २९ हजार ३१० मेट्रिक टन अन्नधान्य लागणार असून, त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली.  ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अन्य योजनेंतर्गत अन्नधान्याच्या वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, त्यासाठी ४४ दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. १२ ते २१ एप्रिल या कालावधी ठिकठिकाणी छापे टाकून गैरव्यवहार करणाऱ्या ७ रास्तभाव दुकानदारांवर गन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही यावेळी कैलास पगारे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com