agriculture news in Marathi gram rate up due to NAFED procurement announcement Maharashtra | Page 2 ||| Agrowon

हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू 

अनिल जाधव
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केल्यानंतर हरभरा बाजारात सुधारणा झाली आहे. वाढत्या कोरोनामुळे काही ठिकाणी बाजारात भीतीचे वातावरण असले, तरी ही स्थिती अल्प काळ असेल, पुढील काही दिवसांत स्थिती पूर्वपदावर येईल.

पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केल्यानंतर हरभरा बाजारात सुधारणा झाली आहे. वाढत्या कोरोनामुळे काही ठिकाणी बाजारात भीतीचे वातावरण असले, तरी ही स्थिती अल्प काळ असेल, पुढील काही दिवसांत स्थिती पूर्वपदावर येईल. आवक वाढल्यानंतरही उत्पादनातील घटीचा अंदाज आणि नाफेडच्या खरेदीमुळे दर जास्त तुटणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत दर हमीभावाचा टप्पा गाठतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले आहे. 

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, उत्तर प्रदेशातील हरभरा उत्पादक पट्ट्यात नुकताच पाऊस झाला. त्याचा कमीअधिक प्रमाणात पिकाला फटका बसला आहे. याआधीच अनेक राज्यांत हरभरा उत्पादनात घट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यातच पावसामुळे फटका बसल्याने उत्पादनात आणखी घट होण्याचा अंदाज आहे. यंदा सर्वच शेतीमालाचे दर हे वाढलेले आहेत. देशात यंदा कडधान्य उत्पादनात घट झाल्याने हरभरा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

गेल्या पंधरवाड्यात राज्यातील बाजार समित्यांमध्ये हरभरा दर ४२०० ते ४४५० रुपयांदरम्यान होते. मात्र नाफेडने राज्यात ६.१७ लाख टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केल्यानंतर आठवड्यात दरात सुधारणा होऊन ४४०० ते ४७५० रुपयांवर पोहोचले. मागील दोन दिवसांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने काही बाजार समित्या बंद झाल्याने दर १०० रुपयांनी कमी झाले. मात्र ही स्थिती फार काळ राहणार नाही. बाजार पूर्वपदावर येऊन दर पुन्हा सुधारतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेल’ न करता टप्प्याटप्पाने विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले. 

छत्तीसगडमध्ये रायपूर, मुंगेली, कवर्धा, बेमेतरा, खैरागड या हरभरा उत्पादक पट्ट्यात पाऊस झाला आहे. तसेच ठिकठिकाणी हिमवृष्टी झाली. त्यामुळे उभे पीक आडवे होऊन मोठा फटका बसला आहे. यंदा बंपर पीक हातात येईल, असे वाटत असतानाच पावसाने पाणी फिरवले. आता ३० ते ४० टक्केच उत्पादन हातात येईल असे वाटत आहे. ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत, असे रायपूर येथील दीपक लेडवाणी यांनी सांगितले. 

हरभरा तेजीत राहील 
शेतीमाल बाजार विश्‍लेषक दिनेश सोमाणी म्हणाले, की यंदा हरभरा उत्पादकतेत घट झाली आहे. बाजारात आवक वाढल्यानंतरही दर फारसे तुटणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत हरभरा दर हमीभाव, ५१०० रुपयांपर्यंत पोचतील आणि ३ ते ४ महिन्यांत ५४०० रुपयांचा टप्पा गाठतील. तसेच कोरोनामुळे बाजार समित्यांमध्ये निर्माण झालेली भीतीची स्थिती काही काळ असेल, पुढील काही दिवसांत बाजार सुरळीत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल टप्प्याटप्प्याने विकावा. भीतीने विक्री करू नये. 

सोमाणी म्हणाले... 

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादकतेत घट 
  • हरभऱ्याला ५१०० रुपये हमीभाव असून, बाजार दर ४७०० रुपये आहेत. हंगामात ४५०० पेक्षा दर पडतील अशी शक्यता नाही. 
  • नाफेड खरेदीत उतरल्यानंतर बाजारात आवक मंदावेल 
  • तुरीसह इतर कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी हरभरा टप्प्याटप्प्याने विकण्याची शक्यता. 
  • महाराष्ट्रतील काही बाजार समित्यांमध्ये कोरोनामुळे पॅनिक निर्माण झाले आहे. मात्र हे थोड्या काळासाठी असेल. पुढील काही दिवसांनंतर स्थिती पूर्वपदावर येईल. 
  • पुढील १ ते २ महिन्यांत हरभरा ५००० रुपयांवर जाईल आणि ३ ते ४ महिन्यांत ५४०० ची उच्चांकी पातळी गाठेल, अशी शक्यता आहे. 

नाफेडच्या खरेदीने मिळेल आधार 
कोरोनाकाळात डाळींचे वाटप केल्याने तसेच नुकतेच हरभरा विक्री केल्याने नाफेड यंदा मोठी खरेदी करेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. नाफेडने देशभरात राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. परिणामी, बाजारात हरभरा दर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात बाजारात आवक वाढल्यानंतर नाफेडच्या खरेदीने दरावर फारसा परिणाम होणार नाही, असेही जाणकार सांगतात. 

नाफेडची राज्यनिहाय मागील हंगामातील 
खरेदी आणि यंदाचे उद्दिष्ट (टनांत) 

राज्य २०२० (खरेदी) २०२१ (उद्दिष्ट)
उत्तर प्रदेश ३४,४९८ २,१२,८५० 
महाराष्ट्र ३,३४,६२४ ६,१७,००० 
तेलंगणा ४७,६०० ५१,३२५ 
कर्नाटक १,०१,८४३ १,६७,००० 
मध्य प्रदेश ७,०६,३१४ २,२८,५०० 
आंध्र प्रदेश १,२७,९१५ १,३९,९०० 
राजस्थान ६,१५,६६७ उपलब्ध नाही 
हरियाना १०,६३६ उपलब्ध नाही 
गुजरात १,२२,४५८ उपलब्ध नाही 
एकूण २१,०१,५५५ १४,१६,५७५* 

(*एकूण उद्दिष्ट तीन राज्ये वगळता) 

प्रतिक्रिया
रायपूर आणि शेजारच्या हरभरा पट्ट्यात तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. सुरुवातील पीक चांगले येईल असे वाटत असतानाच मोठा फटका बसला. या पट्ट्यात ३० ते ४० टक्केच पीक हातात येण्याची शक्यता आहे. हिमवृष्टी झाल्याने उभे पीक झोपले. १० ते १२ मार्चच्या दरम्यान येणारे पीक यंदा बाजारात १५ दिवस उशिरा येणार आहे. 
- दीपक लेडवाणी, हरभरा व्यापारी, रायपूर, छत्तीसगड 

मध्य प्रदेशात हरभरा पट्ट्यात पावसाचा तेवढा परिणाम नाही. बाजारात नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. सध्या केवळ ५०० ते १००० पोत्यांचीच आवक होत असून, ४४०० ते ४६०० रुपये दर मिळत आहे. एक मार्चपासून आवक वाढेल. त्यामुळे पहिल्या पंधरवड्यात दर काहीसे दबावात येतील. मात्र नाफेड खरेदी उतरणार असल्याने त्यानंतर पुन्हा सुधारतील. 
- गोपाल झंवर, निमच, मध्य प्रदेश 

बाजारात हरभरा आवक ५ हजार पोत्यांच्या आसपास आहे. परंतु मालात आर्द्रता जास्त आहे. सध्या आर्द्रता १७ ते १८ टक्के आहे. त्यामुळे मध्यम गुणवत्तेचा हरभरा ४४०० ते ४५५० रुपये आणि गुणवत्तेचा माल ४६५० ते ४७५० रुपयाने विकला जात आहे. येणाऱ्या काही दिवसांत आवक वाढेल. मात्र नाफेडने यंदा मोठी खरेदी करणार आहे. नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकरी तिकडेच माल विकतील. त्यामुळे बाजारातही हमीभावाच्या जवळपास दर पोहोचतील. राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या महत्त्वाच्या राज्यांतही नाफेड खरेदी करणार आहे. त्यामुळे बाजार दर हमीभावापर्यंत पोहोचतील. 
- ओमप्रकाश गोयंका, अध्यक्ष ग्रेन मर्चंट असोसिएशन, अकोला 

यंदा सर्वच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच शेतीमालाचे दर वाढलेले आहेत. त्याचा लाभ हरभऱ्यालाही होताना दिसत आहे. यंदा हरभऱ्याचा उतारा कमी आला अशीही बाजारात चर्चा आहे. त्यामुळेही दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले आहेत. लातूर बाजारात १० ते १२ हजार क्विंटलची आवक होत आहे. तर दर ४५५० ते ४७०० रुपये आहेत. पावसाचा सध्यातरी आवकेवर परिणाम जाणवत नाही. मात्र मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
- अशोक अगरवाल, हरभरा व्यापारी, लातूर  
 


इतर अॅग्रोमनी
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...