हरभरा दर पाच हजारांवर 

यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर सुरुवातीलाच पोहोचला होता. बरेच दिवस चांगले दर टिकून राहिले.
gram
gram

अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवर सुरुवातीलाच पोहोचला होता. बरेच दिवस चांगले दर टिकून राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसह इतर प्रतिबंध लागू होताच त्याचा बाजारपेठांवरही परिणाम पडू लागला. सुरुवातीला हंगामात ५५०० पर्यंत पोहोचलेला दर आता कधी ४९००, तर कधी ५००० पर्यंत आहे. येणाऱ्या काळात बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्यास दर पुन्हा सुधारतील, असे जाणकारांनी सांगितले. 

परतीच्या पावसामुळे तसेच सिंचनासाठी प्रकल्पात पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत यंदा हरभऱ्याची लागवड सर्वच जिल्ह्यांमध्ये वाढली होती. उत्पादनही बऱ्यापैकी झालेले आहे. हरभऱ्याची आवक बाजारपेठांमध्ये वाढण्यास सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचे शुक्लकाष्ट मागे लागले. बाजार समित्यांच्या कामकाजावर याचा थेट परिणाम होऊ लागलेला आहे. काही बाजार समित्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने तेथील व्यवहार बंद करण्याची वेळ येऊन ठेपली होती.  अशाही स्थितीत काही बाजार समित्यांमध्ये नियमितपणे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू ठेवण्याकडे प्रशासन लक्ष देत आहे. यामुळे आवक कमी- अधिक असली तरी व्यवहार होत आहेत. अकोल्यातील बाजारात गेल्या आठवडाभरातील हरभऱ्याचे दर व आवकेचा विचार केल्यास मोठा चढ-उतार दिसून येतो. येथील बाजार समितीत २९ एप्रिलला हरभऱ्याची १११२ क्विंटल आवक झाली होती. या दिवशी हरभऱ्याला कमीत कमी ४४०० व जास्तीत जास्त ५११५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. ३ मे रोजी हरभऱ्याची आवक १२७३ पोत्यांवर जाऊन पोहोचली. तर दुसरीकडे दर ५००० ते ५२०० होता. गुरुवारी (ता. ६) हरभऱ्याच्या दरात थोडी तूट दिसून आली. गेल्या काही दिवसांत हे दर सातत्याने कमी-अधिक होत आहे. 

...तर दर सुधारतील  बाजारातील व्यवहार, वाहतूक जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोवर दरांमध्ये चढउतार टिकून राहू शकतात, असा अंदाज खरेदीदारांकडून व्यक्त केल्या जात आहे. बाजार समित्यांमधील व्यवहार जितके लवकर सुरळीत होतील तितका शेतीमालाच्या दरावर चांगला परिणाम दिसू लागेल. हरभऱ्याचा वापर प्रामुख्याने डाळीसाठी, बेसनापासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांत केला जातो. सध्या सर्वच प्रकारचे मोठे कार्यक्रम बंद आहेत. हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा उपलब्ध आहेत. 

प्रतिक्रिया हरभऱ्याला यंदा चांगले दर मिळाले. कोरोनाचे निर्बंध लागू झाल्यापासून आवक तसेच विक्रीवर परिणाम दिसून येत आहे. तरीही सध्या हरभऱ्याचा दर पाच हजारांपर्यंत मिळत आहे. निर्बंध उठल्यानंतर हरभऱ्याचे दर वाढू शकतात.  -सुनील खटोड, खरेदीदार, अकोला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com