आवक वाढूनही हरभरा दर टिकून 

यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण आणि समारंभांच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढली आहे. सध्या मोठे व्यापारी आणि साठेबाज खरेदीत उतरले आहेत.
gram
gram

पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण आणि समारंभांच्या पार्श्‍वभूमीवर मागणी वाढली आहे. सध्या मोठे व्यापारी आणि साठेबाज खरेदीत उतरले आहेत. त्यामुळे बाजारात हरभरा आवक वाढल्यानंतरही दरात फारशी घसरण दिसत नाही. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काही मंडींमध्ये दर आजही ५००० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तर वायदे बाजारातही एप्रिलचे सौदे शुक्रवारी (ता. १९) ५००६ रुपयांवर बंद झाले. परिणामी, हरभरा दरात जास्त घसरण्याची शक्यता दिसत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अंदाज घेऊन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा मागणी वाढली आहे. साठवणूक क्षमतेची सीमा नसल्याने वाढती मागणी लक्षात घेता मोठ्या कंपन्या, छोटे उद्योग आणि दालमिल खरेदीत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीची ही प्रवृत्ती कायम राहण्याची शक्यता आहे. परिणामी जानेवारीपासून बाजारात हरभरा दरात ६०० ते ६५० रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत हरभरा आवक खुपच कमी आहे. मध्य प्रदेशातील बेंचमार्क मार्केटमध्ये हरभरा दर ५१०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. येथील व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार हे दर पुढील महिन्याच्या शेवटी ५३०० रुपयांपर्यंत पोहचू शकतात, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.  चालू रब्बी हंगामात हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच येत्या काळात होळी आणि रमजानसारखे महत्त्वाचे सण असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे हरभऱ्याला बाजारात मागणी वाढली आहे. घाऊक व्यापारी, डाळ मिल आणि साठेबाज सध्या बाजारात आक्रमक खरेदी करत आहेत. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. बाजारात नव्या मालाची आवक वाढल्यानंतर दबाव येऊन दर १०० ते २०० रुपयांनी तुटण्याची शक्यता आहे. ही स्थिती एप्रिल महिन्याच्या प्रारंभी येण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे. बाजारात खरेदीदार सक्रिय असल्याने आवकेचा दबाव वाढल्यानंतरही दर मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता कमीच आहे. 

वायद्यांतील दरही टिकून  हजर बाजारात हरभरा दरात सुधारणा होत असताना वायद्यांमध्येही हरभरा भाव खात आहे. गुरुवारी (ता. १८) एप्रिलचे सौदे ५१५७ रुपयांनी झाले. त्यात घसरण होऊन शुक्रवारी (ता. १९) ५००६ रुपयांनी सौदे झाले. तर मे महिन्याचे सौदे ५०३५ रुपयांनी झाले. त्यामुळे पुढील काळातही हरभरा दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  उत्पादकतेला फटका  देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल वातावरणामुळे उत्पादकतेला मोठा फटका बसला आहे. पावसासह वाढते ऊन आणि ढगाळ हवामानाचा परिणाम होत आहे. राजस्थानमध्ये उत्पादकतेत जवळपास ४० टक्के घट येण्याचा अंदाज आहे. तर छत्तीसगडमध्ये २० टक्के पिकाला फटका बसल्याचे वृत्त आहे. तर मध्य प्रदेशात सरकारी उत्पादकतेत २५ टक्के घट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पिकावर परिणाम जाणवत आहे.  नाफेडची खरेदी  नाफेडने कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशमध्ये हमीभावाने हरभरा खरेदी सुरू केली आहे. तर २२ मार्चपासून मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये खरेदी सुरू होणार आहे. नाफेडने १७ मार्चपर्यंत आंध्र प्रदेशातून १११ टन, महाराष्ट्रातून १८ हजार १०६ टन, कर्नाटकातून ९९५ टन आणि गुजरातमधून १२ हजार ६१४ टन खरेदी केली. नाफेडने एकूण ३१ हजार ८२१ टन हरभरा हमीभावाने खरेदी केला आहे. 

राज्यनिहाय किमान आणि कमाल दर (रुपये/क्विंटल) 

राज्य किमान कमाल 
गुलबर्गा (कर्नाटक) ४६०० ४७६१ 
इंदोर (मध्य प्रदेश) ४९५० ५००० 
ललितपूर (उत्तर प्रदेश) ४६५० ४७५० 
राजकोट (गुजरात) ४००० ४८०० 
जोधपूर (राजस्थान) ४५५० ४६०० 

राज्यातील महत्त्वाच्या बाजारांतील दर  ४४००/४६००  परभणी  ४३५०/४८००  हिंगोली  ३९००/४७०१  वाशीम  ४२००/४८००  अकोला  ४६००/४८५०  लातूर  प्रतिक्रिया नाफेडने अनेक राज्यांमध्ये खरेदी सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून बाजारात हरभरा आवक वाढल्याने दर १०० ते २०० रुपयांनी तुटले आहेत. मात्र काही राज्यांमध्ये हरभरा पिकाला पावसाचा फटका बसला आहे. ही स्थिती जसजशी पुढे येईल तसे दर वाढतील. अवकेचा दबाव एक महिन्यात कमी होऊन दर पुन्हा हमीभावाएवढे होतील. दीड ते दोन महिन्यांत दर हमीभावाच्या पुढे असतील, असा अंदाज आहे.  - राहुल चौहान, व्यवस्थापकीय संचालक, आयग्रेन इंडिया 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com