अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
अॅग्रोमनी
बाजारात हरभराही खाणार भाव
हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, लग्न-समारंभ या क्षेत्रांतून मागणी आहे. तसेच नाफेडही खरेदीत उतरणार असल्याने दर यंदा ४४०० च्या खाली येण्याची शक्यता खूपच कमी आहे.
हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, लग्न-समारंभ या क्षेत्रांतून मागणी आहे. तसेच नाफेडही खरेदीत उतरणार असल्याने दर यंदा ४४०० च्या खाली येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आवक वाढीच्या कालावधीचा विचार करता दर किमान ४४०० आणि कमाल ४८५० ते ४९०० रुपये राहण्याचा अंदाज आहे. तर दोन ते तीन महिन्यांचा विचार करता दर ५१०० रुपये, हमीभावाचा टप्पा गाठेल, असा अंदाज आहे.
देशातील अनेक बाजारपेठांमध्ये २०२० मध्ये लॉकडाउनपूर्वी हरभरा दर ३६०० रुपयांच्या जवळपास होते. मात्र जसे लॉकडाउन जाहीर झाले, त्यानंतर हरभरा दरात सुधारणा होत गेली. बाजारात ४१०० पर्यंत हरभरा पोचला. लॉकडाउनध्ये आयात ठप्प होती, तसेच बाजारातही आवक नव्हती. त्यातच सरकारने कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी हरभरा डाळीचे वाटप केले. त्यामुळे आपल्याकडील हरभऱ्याचा साठा बऱ्यापैकी घटला होता. परिणामी, दरात मोठी वाढ झाली. हरभरा ५००० ते ५४०० रुपयांपर्यंत गेला होता.
मध्य प्रदेशात हरभऱ्याचे दर एका आठवड्यात जवळपास ४ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजारात हरभऱ्याचे दर पडल्यास मध्य प्रदेश सरकार हमीभावाने खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणा पाहायला मिळत आहे. नाफेडने हरभरा विक्रीचे अनेक टेंडर काढलेले नाहीत. त्याचाही लाभ बाजारात हरभरा दराला होताना दिसत आहे. नाफेडची विक्रीचा परिणाम बाजारावर होत असतो. देशात कोरोनानंतर हरभऱ्याला मागणी वाढली आहे. कोरोना काळात आणि नंतर लोकांनी प्रोटीनयुक्त आहाराला प्राधान्य दिल्याने हरभऱ्यालाही पसंती मिळाली. त्याचा बराच फायदा मागणीच्या बाजूने होत आहे. सध्याही प्रोटीनयुक्त अन्न म्हणून हरभऱ्याला मागणी आहे. सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन्ही देशांमधून हरभऱ्याला मोठी मागणी आहे.
देशात यंदा कोरोना काळात लग्न-समारंभावर बंदी होती. नंतरच्या काळात थोडी सूट मिळाली. मात्र लग्न-समारंभाचा हंगाम येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला या क्षेत्रातून मोठी मागणी असते. पुढील काळात लग्न-समारंभासाठी हरभऱ्याला मागणी वाढली आहे. तसेच सध्या काही राज्यांमध्ये बाजारात नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. तसेच पुढील काही दिवसांत आवक वाढणार आहे. त्यामुळे दरात होणारी सुधारणा सध्या तरी थांबली आहे. आवकेच्या चाहुलीने हरभरा दरवाढ थांबली आहे. तसेच साठेबाजांकडे बाजारात नवा माल येईपर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या साठेबाजांनी बाजारात अद्याप खरेदी सुरू केली नसल्याचे बोलले जात आहे.
देशात यंदा हरभऱ्याची पेरणी वाढल्याचे केंद्रीय कृषिमंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यंदा देशात १०९ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. गेल्या वर्षी १०७ लाख हेक्टर पेरा झाला होता. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांत पेरणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पेरणीत यंदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या ५ ते ७ हंगामामध्ये बिकानेर बाजारात हरभरा दर ४४५० ते ४४८० रुपये प्रतिक्विंटल राहिले आहेत.
ऑस्ट्रेलियात पेरा वाढला
ऑस्ट्रेलिया हा हरभरा उत्पादक महत्त्वाचा देश आहे. यंदा ऑस्ट्रेलियात हरभरा पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तेथे पेरणी वाढली आहे. तसेच पोषक वातावरणामुळे पीकही चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात यंदा हरभरा उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ऑस्ट्रेलियात हरभरा यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यात वाढली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये हरभरा निर्यात ७४ हजार टन झाली होती. तर २०१९ मध्ये ४० हजार टन झाली होतीय.
नाफेडची खरेदी वाढेल
कोरोना काळात नाफेडने मोठ्या प्रमाणात हरभरा वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविला. तसेच मागील काही काळातही हरभऱ्याची विक्री केली. त्यामुळे नाफेडकडे सध्या कमी हरभरा असण्याची शक्यता असून, नाफेड बाजारात खेरदी करणार आहे. नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारातील दरांना आधार मिळेल.
हरभऱ्याला मागणी
अनलॉकडाउन झाल्यानंतर हरभरा डाळ आणि बेसनला मागणी वाढली आहे. स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, लग्न-समारंभ या क्षेत्रातून मागणी होत आहे. मात्र सर्व क्षेत्रांतील साठा हा खूपच कमी आहे. आजही लग्न-समारंभ अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाहीत. तर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाले असले, तरी गेल्या दोन वर्षांच्या पातळीवर आले नाहीत. त्यामुळे बाजारात हरभरा आवक वाढली, तरी दर ४४०० च्या कमी होण्याची शक्यता कमीच आहे.
दरवाढीसाठी अनुकूल घटक
- मध्य प्रदेशात सरकारी खरेदी वाढण्याचे संकेत
- नाफेडचा हरभरा कमी प्रमाणात येण्याची शक्यता
- कोरोनानंतर प्रोटीनयुक्त अन्नाला मागणी
- प्रोटीनसाठी हरभऱ्याला पसंती
- सौदी अरेबिया आणि थायलंडमधून मागणी
- लग्न-समारंभामुळे खरेदी वाढणार
- हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राकडे कमी साठा
- साठेबाजांची खरेदीला अद्याप पसंती नाही
- 1 of 30
- ››