धुळे जिल्ह्यात हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढणार

वाढता भाव लक्षात घेता कांदा उत्पादनाकडे कल आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने फळपिके घेत आहे. केवळ घरापुरते गहू, हरभरा घेण्याचे नियोजन आहे. शासकीय अंदाज काहीही असला तरी परिसरात गहू काढणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने गव्हाची पेरणी करण्याची शक्‍यता कमी आहे. - नरेंद्र पाटील, शेतकरी, कापडणे (ता. धुळे) आमच्या भागात काबुली हरभरा व मका यांची लागवड किंवा पेरणी सुरू आहे. गव्हाची पेरणी लवकरच सुरू होईल. खरिपात पिकांचे अतिपावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वित्तीय संकटाला तोंड देऊन हंगामासंबंधी कार्यवाही करून घेत आहेत. - गयभू पाटील, शेतकरी, शिरपूर, (जि. धुळे)
gram, wheat area will increase in Dhule district
gram, wheat area will increase in Dhule district

धुळे : अतिवृष्टीमुळे भूमिगत पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे विहिरींची पातळी वाढल्याने पीकपेराही वाढण्याची शक्‍यता आहे. शासकीय अंदाजानुसार गहू व हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढणार आहे. मात्र, त्याचवेळी गळीत धान्याचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. सद्यःस्थितीत गव्हाची पेरणी सुरू झालेली नाही. परंतु, कोरडवाहू ज्वारी किंवा दादर ज्वारीची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. तर हरभरा पेरणीला वेग आला आहे. 

दरवर्षी दिवाळीनंतर शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करतात. यंदा अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघावे, या उद्देशाने शेतकरी पिकांचे नियोजन करीत आहेत. वातावरणाचा अंदाज घेत रब्बी पिकांची निवड करत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४३ हजार ९८७ हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची, तर ३२ हजार ५३९ हेक्‍टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड केली जाते. यंदा शासकीय आकडेवारीनुसार ६१ हजार २६५ हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची व ४९ हजार ४५० हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी होईल.

यंदा एकूण पावणेदोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी हंगाम उभा राहू शकतो.  पेरणी सुरू झालेली असली तरी तिची टक्केवारी ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. कारण यंदा लांबलेल्या पावसामुळे पूर्वमशागत उशिरा झाली. परिणामी, कोरडवाहू ज्वारी, हरभरा पेरणी लवकर किंवा आगाप स्वरूपात झाली नाही. मका लागवड शिरपूर भागात सुरू झाली आहे. मक्‍याची सुमारे दोन हजार हेक्‍टरवर, ज्वारीची २० हजार हेक्‍टरवर तर हरभऱ्याची सुमारे २० हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. 

गळीत धान्यवर्गीय पिके कमी असणार

एकेकाळी जिल्हा गळीत धान्याचे कोठार म्हणून ओळखला जायचा. मात्र काही वर्षांपासून शेतकरी कांदा, केळी, ऊस, बोर आदी पिकांकडे वळल्यामुळे ही ओळख पुसली आहे. माळमाथा परिसरात थोड्याफार प्रमाणात गळीत धान्य पिकवले जाते. दरवर्षी शिरपूर, साक्री तालुक्‍यांत गळीत धान्य पेरतात; परंतु यंदा पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी गहू, हरभरा पिकांकडे वळल्याचे चित्र आहे.  सध्या बाजारात तीन ते सहा हजार रुपये प्रतिक्‍विंटल दराने कांदा विक्री होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप तयार करून ठेवली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. गळीत धान्यासंबंधीची पेरणी १०० हेक्‍टरदेखील नसणार अशी स्थिती आहे. कारण तीळ, सूर्यफूल, भुईमूग यांची पेरणी जिल्ह्यात जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. 

खते मुबलक

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी रासायनिक खते मुबलक आहेत. ९० हजार मेट्रिक टन खतांची गरज असणार आहे. त्यात सुमारे ५० हजार मेट्रिक टन  युरियायाचा पुरवठा जानेवारीअखेरपर्यंत होईल. युरियाचा पुरवठा सुरळीत सुरू असून, पुरवठ्याची टक्केवारी ३० टक्के आहे. संयुक्त खतांचा पुरवठा कमी असेल. सरळ खतांमध्ये फॉस्फेटचा सुमारे १५ हजार व पोटॅशचादेखील १५ हजार मेट्रिक टन पुरवठा होईल, अशी माहिती मिळाली. 

प्रमुख पिकांचे अपेक्षित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये ) 

पीक अपेक्षित क्षेत्र
गहू ६१ हजार २६५ 
हरभरा ४९ हजार ४५०
ज्वारी (तृणधान्य एकूण) ५० हजार ४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com