agriculture news in marathi Gramshivar success story of gundewadi village from nanded district | Agrowon

सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला कायापालट

कृष्णा जोमेगावकर
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती, शेतीपूरक व्यवसाय, औद्योगीकरणाला चालना दिली आहे. सोबतच वृक्ष लागवड, तंटामुक्ती अभियान, जलसंधारण, महिला सबलीकरण, निर्मलग्राम, ग्रामस्वच्छता यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. 

गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती, शेतीपूरक व्यवसाय, औद्योगीकरणाला चालना दिली आहे. सोबतच वृक्ष लागवड, तंटामुक्ती अभियान, जलसंधारण, महिला सबलीकरण, निर्मलग्राम, ग्रामस्वच्छता यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. गावाच्या या कायापालटाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील निर्मलग्राम पुरस्कारासह राज्य व जिल्हास्तरावरील ३५ पुरस्कार मिळाले आहेत.

नवीन नांदेड शहराजवळ असलेल्या गुंडेगावची लोकसंख्या दोन हजारापर्यंत आहे. मुख्य व्यवसाय शेती व शेतीपूरक व्यवसाय आहे. पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला या ठिकाणी घेतला जातो. पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी केळी, ऊस, चारापिके, फळबागा असे बागायती पिके घेतात. शहराजवळ असल्याने दुधाची मागणी पाहता अनेक तरुण दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. येथील पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण काम सरपंच दासराव हंबर्डे यांनी केले. अभियांत्रिकी (बी. ई. -मेकॅनिकल) ची पदवी घेतलेल्या या तरुण नेतृत्वाला गावानेही तितकीच साथ दिल्याने गुंडेगावचे नाव देशाच्या नकाशावर झळकले.

गाव आदर्श करण्यासाठी धडपड
उच्च माध्यमिक शिक्षण नांदेडला झाल्यानंतर दासराव हंबर्डे यांनी १९९२ मध्ये औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. (मेकॅनिकल) पदवी प्राप्त केली. त्याकाळी शासकीय नोकरीच्या मागे न लागता समाजकार्यात वाहून घेतले. गावाच्या विकासासाठी ते धडपडू लागले. यातूनच १९९८-९९ मध्ये पहिल्यांदा गुंडेगाव ग्रामपंचायतचे बिनविरोध सरपंच म्हणून निवडले गेले. आपल्या निवडीचे कामातून चीज केल्याने गावानेही गेली वीस वर्षे त्यांना बिनविरोध सरपंच केले आहे. आजही ते गावाची धुरा सांभाळत आहेत. यातून गावात सकारात्मक बदल होत गावाचा कायापालट झाला.

स्वच्छतेला प्रथम प्राधान्य 

 • गुंडे गाव हे आकाराने लहान असले तरी प्रथम स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव सुंदर करण्याचा संकल्प सोडला. पुढे निर्मल गाव योजनेमध्ये प्रत्येकाच्या घरी शौचालय उभारून ते वापरण्याची सवय लावण्यात आली. यामुळे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातून गावात केवळ २१ दिवसात गाव हागणदारीमुक्त केले गेले. या कामाची दखल घेऊन २००६-०७, २००७-०८ मध्ये सलग गावाला तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला.
 • स्वच्छता अभियानासोबतच जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून गावातील सांडपाण्याच्य व्यवस्थापनासाठी शोषखड्डे तयार करण्यात आले. परिणामी गावातील डासांचे प्रमाण कमी झाले. स्वच्छतेमुळे आरोग्यांच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत झाली. भूगर्भातील जलसंचय वाढला.

जलपुनर्भरण स्तंभाचा प्रयोग
कमी पर्जन्यमान झालेल्या काळात गावातील सार्वजनिक जलस्त्रोताला पाणी कमी यायचे. यामुळे जलयुक्त शिवार योजनेतून नांदेड जिल्ह्यात जलस्त्रोताजवळ जलपुनर्भरण स्तंभ (रिचार्ज शाफ्ट) घेण्यात आले. त्याद्वारे भूगर्भातील पाणी साठा वाढण्यास मदत झाली. परिणामी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कमी झाली. या प्रयोगाचे यश लक्षात येताच गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीजवळही रिचार्ज शाफ्टचा प्रयोग करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत जलपुनर्भरण स्तंभ निर्माण करून विहीर, विंधन विहीरींचे बळकटीकरण करण्यात आले.

२००८ मध्ये निर्मलग्राम राष्ट्रीय पुरस्कार
गावकरी व सरपंच दासराव हंबर्डे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे गुंडेगाव निर्मल झाले. राज्य तसेच केंद्र शासनाच्या पथकाने गावाचा सर्व्हे केल्यानंतर २००८ मध्ये गावाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ मिळाला. यानंतरही सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छतेला गावात अधिक महत्त्व देण्यात येते.

वड, कडुनिंब, पिंपळ अशा लाखो वृक्षांची लागवड
गुंडेगाव आणि आसदवन या दोन गावाच्या हद्दीत तब्बल अडीचशे एकरचा उंच डोंगर आहे. या ठिकाणहून पावसाचे पडलेले पाणी वाहून जात असे. यामुळे दोन्ही गावात उन्हाळ्यात विहीर, कूपनलिकेचे पाणी कमी होत असे. यामुळे गावकऱ्यांनी या डोंगराच्या उताराला सीसीटी, डीप सीसीटी, व्हॅट यासारखे जलसंधारणाचे उपाययोजना केल्या. पायथ्याशी सिमेंट बंधारे, वनराई बंधारे घेतले. या साऱ्या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरते. डोंगर हिरवागार करण्यासाठी याठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. यात एक लाख कडुनिंब, दहा हजार पिंपळ, दहा हजार वडाची झाडे लावण्यात आली आहेत. सध्या डोंगरावर वृक्ष लागवडीमुळे गर्द झाडी झाली आहे. याच ठिकाणी भोळेश्वर मल्लीनाथ देवस्थान आहे. त्यामुळे धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत आहे.

पंजाब सरकारच्या मंत्र्यांकडून दोन लाख
गुंडेगाव येथील ग्रामविकासाचे काम ऐकून पंजाब सरकारमधील ग्रामविकास मंत्री मालूका यांनी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत गावाला भेट दिली. गावातील स्वच्छता, जलपुनर्भरण स्तंभ (रिचार्ज शाफ्ट) प्रयोग, वृक्ष लागवड आदी कामाचा प्रभाव त्यांच्यावर झाला. प्रभावित झालेल्या मालूका यांनी गावाला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिल्याचे सरपंच अभिमानाने सांगतात.

दुग्ध व्यवसायाला चालना
गाव शहराजवळ असल्याने गावातील अनेकांचा पूर्वीपासून दुधाचा व्यवसाय होता. या व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी गावातच दूध डेअरी सुरु करण्यात आली. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले. दूध व्यवसायातून शेतकऱ्यांच्या हाती बऱ्यापैकी ताजा पैसा येऊ लागल्याने गावात समृद्धी आली. तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी गावाचे कौतुक केले.

गावातील तंटे गावातच मिटविले
गुंडेगावमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती व्यवस्थित कार्यरत असल्यामुळे मागील अनेक वर्षापासून एकही तंटा गावाबाहेर गेला नाही. गाव म्हटले की शेती व किरकोळ तंटे असतातच. त्याचेही निराकरण फिरत्या लोक न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख न्यायमूर्तींच्या उपस्थितीत गावातच तडजोडीच्या माध्यमातून सोडविण्यात आले. या साऱ्या प्रयत्नामुळे गावाला शासनाच्या तंटामुक्ती अभियानाचे बक्षीसही गावाला मिळाले.

गावाची वैशिष्ट्ये 

 • महिला सबलिकरणातंर्गत बचत गटांची स्थापना
 • व्यसनमुक्ती केंद्राकडून गाव व्यसनमुक्त
 • दूध डेअरीच्या स्थापनेतून धवलक्रांती
 • शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
 • गाव परिसरात उद्योग उभारून तरुणांना रोजगार
 • लागवडीसह कुऱ्हाड बंदीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन
 • गोदाम, बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी.
 •  गावात नाले, शोषखड्डे, पथदिवे यातून सुंदर, स्वच्छ रस्ते तयार केले आहेत.
 • बालविवाह बंदी, स्त्री भ्रुण हत्या प्रतिबंधक समिती कार्यरत.
 • शालेय विद्यार्थ्यांना पोषक माध्यान्ह भोजन

दासराव हंबर्डे, ९४२३१३६७५७, ९५६१०२११५०.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
गुलाब, लिली, शेवंतींनं अर्थकारण केलं...शिरसोली (ता.जि.जळगाव) येथील रामकृष्ण, श्रीराम व...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
ग्राम, आरोग्य अन् शेती विकासामधील ‘...सातारा जिल्ह्यातील अन्नपूर्णा सेवाभावी संस्था...
एकात्मिक शेतीतून अर्थकारण केले सक्षमरेवगाव (ता. जि. जालना) येथील आनंदराव कदम यांनी...
गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी...खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम...
पडसाळी झाले ढोबळी मिरचीचे ‘हब’बोर, कांद्यासाठी प्रसिद्ध पडसाळी (जि. सोलापूर)...
गांडूळ खतासह सेंद्रिय मसाला गूळनिर्मितीसातारा जिल्ह्यातील मालदन येथील कृषी पदवीधर विजय...
साहिवाल गोसंगोपनासह शेण, गोमूत्राचे...सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील निकम कुटुंबाने...
आदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत...नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात...
नांदेडचे कापूस संशोधन केंद्र कोरडवाहू...नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात बीटी, नॉन बीटी...
प्रयोगशीलतेतून एकात्मिक शेतीचा आदर्शमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटकातील बुदिहाळ (ता...
पीक नियोजन, थेट विक्रीतून वाढविला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला)...
कुक्कुटपालन, भाजीपाला लागवडीतून तयार...लखमापूर (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील आश्‍विनी...
तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली...बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित...