खासगी बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कारंजा, जि. वाशीम  ः  २०१६-१७ मध्ये खासगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. खासगी बाजार समित्यांमध्ये मानोरा येथील रामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीला ६० लाख ९४ हजार तर वाशीम तालुक्यातील विठ्ठल खासगी बाजार समितीला ८८ लाख ७६ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३१ ऑगस्टपूर्वी हे अनुदान जमा करावयाचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.

खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ऑक्टोंबर-डिसेंबर २०१६ या महिन्यात बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये आणि जास्तीत जास्त २५ क्विंटल मर्यादेत अनुदान मंजूर केले होते. मात्र, खासगी बाजार समिती व थेट पणन परवानाधारक यांच्याकडे सोयाबीन विक्री केलेले शेतकरी यापासून वंचित होते. त्यानुसार वाशीम जिल्ह्यातील खासगी बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने आमदार पाटणी यांनी सुभाष देशमुख यांच्याकडे मागणी केली होती. यासंदर्भात देशमुख यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलाविली. 

बैठकीत आमदार पाटणी यांच्यासह जिल्ह्यातील बाजार समिती संचालक मंडळ उपस्थित होते. खासगी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे, या मागणीच्या अनुषंगाने देशमुख यांनी माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना दिले.  पणन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत खरेदी केलेल्या सोयाबीनचे अनुदान शासनाने वितरित केले. मात्र, खासगी बाजार समित्यांनी ही माहिती ऑनलाइन पध्दतीने भरली नसल्यामुळे अनुदान वितरित करता आले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते. माहिती शासनाकडे पाठविल्यानंतर आवश्यक तो निर्णय घेण्याचे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com