द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय हंगामानुसार लागू करा 

दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसा‌नीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई‌ देण्याबाबत शासकीय पातळीवर निर्णय घेण्यात यावा.
Grape Crop Insurance Scheme Apply section wise by season
Grape Crop Insurance Scheme Apply section wise by season

नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्ष पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसा‌नीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून त्या नुकसानीच्या तुलनेत भरपाई‌ देण्याबाबत शासकीय पातळीवर निर्णय घेण्यात यावा. द्राक्ष पीकविमा योजना त्या त्या विभागातील हंगामानुसार लागू करण्यात यावी व त्यांच्या ट्रिगरमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. ३) रोजी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन केली आहे.  नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर भागांत गत पंधरवाड्यात व आता पाऊस झाला. परिणामी, परिपक्व झालेल्या द्राक्षाला तडे जाणे, फुलोरा व दोडा अवस्थेतील द्राक्षाची मणीगळ, घडकूज होत आहे. त्याचे प्रमाण आर्द्रता धुके सूर्यप्रकाशानंतर व्यापक राहील, या प्रश्‍नांकडे द्राक्ष बागायतदार संघाने कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष ॲड. रवींद्र नि‌मसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन द्राक्ष बागायतदारांच्या समस्या मांडल्या.  दर महिन्याला पाऊस, ढगाळ हवामान आणि थंडी असे संकट द्राक्ष बागांवर आहे. द्राक्ष बागेसाठी लागणाऱ्या पूरक वस्तू खते, रोग प्रतिबंधक औषधे यांचा खर्च दुप्पटीने वाढला आहे. या प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बागा सांभाळत द्राक्ष बागायतदार‌ मेहनत करत आले आहेत. मात्र अवकाळीने झालेल्या नुकसानीने द्राक्ष ‌बागायतदार हतबल झाले आहेत, त्यांना उभे करण्यासाठी शासनस्तरावरून हातभार लागणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

भुसेंनी घेतली तत्काळ दखल  शिष्टमंडळाने भुसे यांची भेट घेतल्यानंतर तत्काळ या बाबत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना त्या त्या भागातील प्लॅस्टिक आच्छादित द्राक्षबागांची पाहणी करून अहवाल तयार करावा, असे आदेश भुसे यांनी दिले आहेत. तसेच संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले यांचे डॉ. पाटील यांच्यासोबत फोनद्वारे बोलणे करून दिले आहे. 

सक्तीची कर्जवसुली थांबवा; विशेष पॅकेज द्या         द्राक्ष बागायतदारांनी बँका, पतसंस्थांकडून कर्जे घेऊन द्राक्ष बागा उभ्या केल्या आहेत. वर्षभरात एकदाच येणारे द्राक्षपीक त्यावर शेतकऱ्यांचे अर्थचक्र अवलंबून असते. त्यामुळे एक वर्षासाठी सर्व शासकीय कर, वीजबिल माफ करण्यात यावे. बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवावी. द्राक्ष बागायतदारांसांठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे. पावसामुळे तडे गेलेल्या द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी कांदा चाळ अनुदान योजनेप्रमाणे बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यास अनुदान द्यावे. ज्या द्राक्ष बागांवर प्लॅस्टिक आच्छादन आहे. तेथे घडकूज व मणीगळीचे तडे जाण्याचे संकट आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्लॅस्टिक कव्हरसाठी ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com