पिंपरखेडात गारपिटीने द्राक्ष बाग, कांदा पीक उद्‌ध्वस्त

गतवर्षी भीषण दुष्काळात द्राक्षबाग टॅंकरच्या पाण्यावर जगवली. त्यावर यंदा पीक जोमात आले होते. यावेळेस चांगले उत्पादन वाढेल, ही अपेक्षा होती. पण, त्या स्वप्नांवर पाणी फिरले. निसर्गाने १५ मिनिटांत तोंडचा घास हिरावून घेतला. या नुकसानीचे संकट निवारण्यासाठी पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. - भिकाजी चिंचाने, शेतकरी.
Grape gardens, onion crop destroyed in Pimparkheda
Grape gardens, onion crop destroyed in Pimparkheda

परतूर, जि. जालना : अवघ्या १५ मिनिटांच्या पाऊस, गारपिटीने पिंपरखेडातील शेतकरी भिकाजी चिंचाने यांच्या द्राक्ष व कांदा बियाणे पिकांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे चिंचाने कुटुंब पार कोलमडून पडले आहे.

बुधवारी (ता. १८) मध्यरात्री रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील दहिफळ भोंगाने, वाटूर, पिंपरखेडा, वाढोना शिवाराच्या काही भागांत तुफान गारपीट झाली. ७ मिनिटांच्या बोराएवढ्या आकाराच्या गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले. चिंचाने या शेतकऱ्यांची  मोठ्या कष्टाने तीन वर्षांपासून सांभाळलेली ३ एकर द्राक्ष भाग काढणीला आली होती. ती गारपिटीने पार उद्‌ध्वस्त झाली. तर, तीन लाख रुपये खर्च करून लावलेले कांदा (बियाणे) पीक भुईसपाट झाले. हे सांगताना शेतकरी चिंचाने यांना अश्रू अनावर झाले.

द्राक्ष बागेवर ३ वर्षांपासून झालेला खर्च या वेळी भरून येईल, अशी बाग फुलली होती. नुकतीच द्राक्ष काढणीला सुरुवात झाली होती. पुढच्या एक महिन्यात १५ -२० लाख पदरात पडणार, अशी स्वप्ने चिंचाने पहात होते. मात्र, त्यावर गारपिटीने पाणी फिरविले. दोन एकरवरील कांदा बियाण्यांचे नुकसान झाले. या दोन्ही पिकांतून २५ लाख उत्पन्न येण्याची अपेक्षा होती. त्यातून नातेवाईक मित्रांकडून घेतलेले कर्ज फेडून काही लाख पदरात पडतील, असे त्यांचे नियोजन होते. 

आमदार बबनराव लोणीकर यांनी गुरुवारी (ता. १९) दुपारी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पहाणी केली.  या वेळी तहसीलदार रूपा चित्रक, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी हेही होते. लोणीकर यांनी नुकसानीचे योग्य पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. या वेळी त्यांनी चिंचाने यांच्या द्राक्षाच्या बागेची, कांदा बियाणे पिकांची पहाणी करून शासनाकडून जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.  

परतुर तालुक्यातील जालना मंठा हायवेलगतचा सर्व भाग हा गारपिटीचे केंद्र होते. तालुक्यातील इतर भागांत गारपीट झाली नसली, तरी हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाल्याचे पावसाने मोठे नुकसान केले. नुकसानीचे पंचनामे करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com