संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची सांगता

गेलेल्या हंगामामुळे तोंडचे पाणी पाळले. निसर्गाने मोठी अवकृपा केली. बागा तयार झाल्यानंतर सुगीच्या काळात अतिवृष्टीमुळे माल खराब झाला. सुरुवातीला माल तयार होत असून घडकुज झाली अन् द्राक्ष काढणीस असताना घडांना अक्षरशः बुरशी आली. त्यामुळे काहीही हाती आलेले नाही. -अमृत कापडणीस, द्राक्ष उत्पादक, आसखेडा, ता. बागलाण
grapes
grapes

नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत संकटे येत राहिली. घडनिर्मितीनंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. याच दरम्यान इतर ठिकाणी नियमित हंगामात छाटणीनंतर फुलोरा अवस्थेतच ३० टक्के बागा बाधित झाल्या. याही संकटातून शेतकरी सावरले, मेहनत घेतली, दर्जेदार माल तयार केला. मात्र अंतिम टप्प्यात कोरोनाच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे संकटांच्या अनेक मालिका सोसून चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाची सांगता झाली असून शेतकरी पुढच्या हंगामाच्या तयारीत पुन्हा उमेदीने उभा राहिला आहे. जिल्ह्यात ५८३६७.४३ हेक्टर पूर्वहंगामी व नियमित द्राक्ष हंगाम होतो.त्यात कसमादे भागात पूर्वहंगामी उत्पादन घेतले जाते. हंगामाच्या सुरुवातीलाच अतिवृष्टीमुळे ३० टक्के बागांचे नुकसान झाले. या तडाख्यातून ७० टक्के बागा वाचल्या. मात्र द्राक्षमण्यांना तडे, मणी पोखरणारी अळी या संकटांमुळे २० टक्के क्षेत्रावरील बागा बाधित झाल्या. त्यातून शेवटच्या ५० टक्के बागा वाचल्या. मात्र कोरोनाच्या संकटात वाहतूक व्यवस्था अडगळीत सापडल्याने मागणी व पुरवठा अडचणीत सापडला. पूर्वहंगामी द्राक्षबागेचे सटाणा, कळवण, मालेगाव, देवळा तालुक्यात नुकसान झाले. अतिवृष्टी व नंतर कोरोनामुळे निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड, येवला तालुक्याला फटका बसला. त्यामुळे दर्जेदार माल तयार असताना विक्रीअभावी पडत्या भावात तो विकावा लागला, तर अधिक कालावधीचा माल झाल्याने काहींनी त्याचा बेदाणा तयार केला. वास्तविक काही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या निम्म्या दराने विक्री करावी लागली. या मंदीच्या काळात व्यापाऱ्यांनी संधी साधत शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. निर्यातक्षम बागा एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून काढणीवाचून मंदावल्या. निर्यातदार माल काढणीस तयार होते मात्र दराची शास्वती नसल्याने व टाळेबंदीच्या अटी, मजुरटंचाई, जिल्ह्याबाहेर प्रमुख बाजारपेठेत पाठवणीतील अडचणी यामुळे कामकाजात सातत्याने अडथळे येत गेले. स्थानिक बाजारासाठी दिला जाणारा माल काढताना मोठ्या प्रमाणावर मजुरटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे निर्यातक्षम बागांची काढणी मंदावत गेली व निर्यातदारांनी नंतर हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळाले. ज्यामध्ये दर कमीतकमी प्रतिकिलो ७ रुपयांपर्यंत खाली घसरले की ज्याचा उत्पादन खर्च किमान २० रुपये येत असताना १३ रुपयांपर्यंत घट सोसावी लागली. आता बागा संपल्या, मालही गेला मात्र विकलेल्या मालाचे अद्याप पैसे हाती मिळालेले नाहीत. दर काही व्यापारी माल काढून गेले, मात्र काही उत्पादकांच्या हाती काहीच दिलेले नाही. त्यामुळे ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी मोठी अडचण जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांसमोर आहे.

हंगामातील प्रमुख अडचणी

  • पूर्वहंगामी तयार माल अतिवृष्टीमुळे खराब 
  • फुलोरा अवस्थेत मोठ्या प्रमाणावरील घडकुज 
  • हवामान बदलामुळे प्रतिएकरी १ लाखांपर्यंत पीक संरक्षण खर्च वाढ
  • टाळेबंदीत विक्रीत अडचणी असल्याने दरात मोठी घसरण
  • उत्पादन खर्चाच्या निम्म्या दराने विकण्याची वेळ
  • जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम द्राक्षाखालील क्षेत्र:    ५८३६७.४३ हेक्टर ‘ग्रेपनेट’वर नोंदणी:    २८६६६ निर्यातक्षम क्षेत्र:    १८३४६ हेक्टर नाशिकमधून युरोपात निर्यात:    ८१ हजार ९९० असे राहिले दर (प्रतिकिलो) स्थानिक:  ७ ते ३० रुपये निर्यातक्षम बाजारपेठ:   २० ते १०० रुपये

    प्रतिक्रिया सुरुवातीला अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. मात्र मेहनत घेऊन व खिशातील उरलेले भांडवल आतून हंगाम उभा केला. नंतर भांडवल नसताना निविष्ठा उधारीवर घेतल्या मात्र आता. ते पैसेही देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. तर पुढचा हंगाम कसा उभा करावा हा समोर मोठा प्रश्न आहे. -अशोक पाटील, दाभोळकर प्रयोग परिवार, सोनजांब, ता. दिंडोरी 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com