नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची का
अॅग्रो विशेष
सांगलीत द्राक्ष हंगाम रोगांच्या विळख्यात
द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. परिणामी, माल जिरणे व गळकूजमुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे.
सांगली : द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे डाऊनी, भुरीच्या प्रादुर्भावाचा फटका द्राक्ष बागांना बसला आहे. परिणामी, माल जिरणे व गळकूजमुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी ५१ हजार हेक्टर इतके आहे. त्यापैकी पलूस, तासगाव तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष पिकांवर नैसर्गिक आपत्तीच्या संकटाची मालिका सुरूच आहे. मार्च महिन्यात ऐन हंगामात कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन झाला. त्यामुळे द्राक्षाची विक्री करता आली नाही. त्यामुळे एप्रिल छाटणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली.
जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिली. पुन्हा ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले. त्यातूनही मिरज, पलूस भागांत शेतकऱ्यांनी फळ छाटणी घेतली. मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांना याचा फटका बसला.
सप्टेंबर महिन्यापासून फळ छाटणीस प्रारंभ होतो. सततच्या पावसामुळे फळ छाटणी घेता आली नसल्याने फळ छाटणीस विलंब झाला. दरम्यान, या साऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने घड भरणे ही प्रक्रिया झाली नाही.
सध्या तासगाव आणि मिरज तालुक्यातील काही भागांत द्राक्ष विक्री योग्य झाली असली, तरी जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० टक्क्यांहून अधिक बागा फुलोरावस्थेत आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणाचा फटका बागांना बसला असल्याने फुलोरा गळून पडला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जानेवारीच्या दरम्यान द्राक्षे बाजारात
जिल्ह्यात मिरज, तासगाव तालुक्यांत प्रामुख्याने आगाप फळ छाटणी घेतली जाते. त्यामुळे नाताळ सणाच्या अगोदर द्राक्ष बाजारात दाखल होतात. त्या वेळी द्राक्षाचा चांगला दर मिळतो. परंतु यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे आगाप फळ छाटणी फारशी झाली नसल्याने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणारी द्राक्ष डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया...
यंदा द्राक्ष बागांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असून, त्याचा फटका द्राक्ष पिकाला बसला आहे. परिणामी, उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी घट होईल अशी शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फळ छाटणी घेतलेल्या बागा चांगल्या आहेत.
- सुभाष आर्वे,
माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायदार संघ