..असे करा अचानक वेली सुकत असलेल्या रिकटच्या बागेचे व्यवस्थापन

ज्या भागात कोरडे वातावरण आहे, पाणी जास्त प्रमाणात दिले गेले आहे आणि जिथे काळी जमीन आहे अशा ठिकाणी वेलीची दोन,तीन पाने सुकलेली दिसतात. सध्याच्या परिस्थितीमुळे छाटणीस विलंब झाल्यास काही अडचणी येऊ शकतील. या अडचणीवर मात करण्याकरिता सुरुवातीस बागेतील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.
stages of vine begins to dry in first second and third day
stages of vine begins to dry in first second and third day

ज्या भागात कोरडे वातावरण आहे, पाणी जास्त प्रमाणात दिले गेले आहे आणि जिथे काळी जमीन आहे अशा ठिकाणी वेलीची दोन,तीन पाने सुकलेली दिसतात. सध्याच्या परिस्थितीमुळे छाटणीस विलंब झाल्यास काही अडचणी येऊ शकतील. या अडचणीवर मात करण्याकरिता सुरुवातीस बागेतील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. मागील हंगामामध्ये (ऑगस्ट, सप्टेंबर) कलम केल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा वाढू लागते, त्यावेळी आपण कलम जोडाच्या वर चार पाच डोळ्यांच्या वर पुन्हा रिकट घेतो. यानंतर नवीन फुटी निघून वाढ जोमात होते. ही वाढ खोड, ओलांडा व मालकाड्या यामध्ये रूपांतरित केली जाते. यालाच आपण वेलीचा सांगाडा तयार झाला असे म्हणतो. वेलीचा हा सांगाडा तयार होते वेळी बागेतील तापमान व आर्द्रता (३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान व ७० टक्क्यापर्यंत आर्द्रता) पोषक असते. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जसेजसे तापमान वाढू लागते, तसतसे वेलीवर काही प्रमाणात वेलीच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. ही परिस्थिती ज्या भागात कोरडे वातावरण आहे, पाणी जास्त प्रमाणात दिले गेले आहे आणि जिथे काळी जमीन आहे अशा ठिकाणी प्रामुख्याने दिसून येईल. सुरुवातीस एखाद्या वेलीवर दोन तीन पाने सुकल्याप्रमाणे दिसतील. दुसऱ्या दिवशी तीच वेल पूर्णपणे सुकलेली दिसेल. वाढत्या तापमानामध्ये जर पाणी जास्त झालेले असेल, तर त्या ठिकाणी मुळीच्या कक्षेत बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येईल. बागेमध्ये एकाच ठिकाणी वेली सुकताना दिसत नसून, वेगवेगळ्या ठिकाणी सुकताना दिसून येतील. जमिनीलगत खोडाची साल काढून बघितल्यास ती काळी झालेली दिसेल. तसेच तिथून पाणी निघताना आढळेल. यावरून मुळीद्वारे वेलीला होणारा पाणी व अन्नद्रव्यांच्या पुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट होते. ही समस्या सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. उपाययोजना

  • वेलीच्या बुडाशी कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) १.५ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे प्रत्येक वेलीस एक लिटर द्रावणाचे ड्रेंचिंग करावे.
  • ज्या बागेत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे, अशा बागेत वरील द्रावणाचे ड्रेंचिग त्याच मात्रेत पुन्हा तिसऱ्या दिवशी करावे. किंवा
  • तिसऱ्या दिवशी फक्त हेक्साकोनॅझोल १ मि.लि. प्रती लिटर पाणी या प्रमाणे ड्रेंचिग करावे.
  • वर दिलेल्या ड्रेचिंगच्या तीन दिवसानंतर टेब्युकोनॅझोल १ मि.लि. प्रती लिटर पाणी या द्रावणाचे ड्रेचिंग करावे.
  • सुकत असलेल्या वेलीला ड्रिपने ड्रेचिंग न करता खोडावर व बुडालगत हाताने द्रावणाचे ड्रेचिंग केल्यास परिणाम चांगले मिळतील. असे केल्यास या समस्येतून आपण तात्पुरते बाहेर येऊ.
  • मात्र, पुढील काळात या वाढत्या तापमानात पुन्हा काही वेली अशाच सुकण्याची समस्या उद्भवू शकते. ते टाळण्यासाठी पूर्ण बागेत ड्रिपद्वारे ड्रेचिंग करून घ्यावे.
  • वरील ड्रेचिंग झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी ट्रायकोडर्मा दोन ते तीन लिटर प्रती एकर प्रमाणे ड्रिपद्वारे ड्रेंचिंग करून घ्यावे.
  • आपण यावेळी ओलांड्यावर निघालेल्या काड्यांची पिंचिंग करतो. हे पिचिंग करणे एक आठवड्याकरिता टाळावी. ही वाढ तशीच पुढे जाऊ द्यावी. या करिता युरिया दीड ते दोन किलो प्रती एकर फक्त एकदा ड्रिपद्वारे द्यावे. यामुळे वाढ थोडीफार जोमाने होईल व सुकवा थांबेल.
  • बागायतदारांच्या अनुभव  सांगली जिल्ह्यातील आगळगाव (ता. कवठे महांकाळ) येथील दत्तात्रय निलकंठराव पाटील यांच्या बागेमध्ये गतवर्षी रिकटच्या बागेमध्ये वेली अचानक सुकण्याची समस्या उद्भवली होती. त्यातूनद्राक्ष संशोधन केंद्राच्या सल्ल्यानुसार केलेली उपाययोजना अत्यंत फायदेशीर ठरली होती. या समस्येची लक्षणे स्पष्ट होण्यासाठी त्यावेळी घेतलेली ही छायाचित्रे सर्व बागायतदारांसाठी उपयुक्त ठरतील. उशिरा छाटणीच्या बागेतील व्यवस्थापन 

  • बागेत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजुरांची उपलब्धता झाली नाही. अशातच द्राक्ष वेलीवर फळे बरेच दिवस टिकून राहिली. काही कारणाकरिता फळ जास्त टिकून राहावे, यासाठी आपण बागेत पाणी आणि नत्राचा वापरही सुचवला होता. असे करता फळकाढणीला विलंब झाला. आणि आता खरडछाटणीकरिता उशीर होत असल्याचे दिसून येते. साधारणतः खरड छाटणीही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाते. परंतू, सध्याच्या उपलब्ध परिस्थितीमुळे छाटणीस विलंब झाल्यास काही अडचणी येऊ शकतील. या अडचणीवर मात करण्याकरिता सुरुवातीस बागेतील व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. फळछाटणीनंतर द्राक्ष घड परिपक्व होण्याकरिता साधारणतः १४० ते १५० दिवसाचा कालावधी लागतो. या वर्षी काही बागेत हा कालावधी १६० ते १६५ दिवसांपर्यंत गेला. फळकाढणी ते खरड छाटणी या दरम्यानचा कालावधी म्हणजेच वेलीस मिळालेला विश्रांतीचा कालावधी होय. हा किमान १५ ते २० दिवसांचा असणे गरजेचे असते.  
  • आपल्या बागेत फळकाढणीस आधीच उशीर झालेला असल्यामुळे बागेस विश्रांती न देत खरडछाटणी घेतल्यास वेलीवर ताण बसून पुढील घडनिर्मितीच्या काळात वेलीवर विपरीत परिणाम होतील. जरी उशीर झालेला असला तरी किमान ८ ते १० दिवसाचा तरी विश्रांतीचा कालावधी गरजेचा समजावा. या कालावधीत दरवर्षीच्या व्यवस्थापनाच्या तुलनेत अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन शिस्तबद्ध असावे. कारण फळ वेलीवर जास्त दिवस राहिल्यामुळे वेलीस जास्त प्रमाणात ताण बसलेला आहे. वेलीला या परिस्थितीतून बाहेर काढून एक सारखी बाग फुटण्याच्या दृष्टीने सक्षम करणे गरजेचे आहे. तेव्हा या विश्रांतीच्या काळात अन्नद्रव्य (नत्र व स्फुरद) आणि पाणी शिफारशीपेक्षा १० टक्के जास्त प्रमाणात द्यावे. यामुळे वेलीची झीज त्वरित भरून निघण्यास मदत होईल. खोड ओलांड्यामध्ये रस तयार होण्याचे प्रमाण वाढेल. यामुळे तयार झालेला ओलांड्याचा रसरशीतपणा बागेत लवकर फूट निघण्यास मदत करेल.  
  • पुढील काळात छाटणीनंतर बागेतील तापमान जास्त प्रमाणात वाढलेले दिसून येईल. (४० अंश सेल्सिअस तापमान आणि ३० टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता ) अशा परिस्थितीत डोळे फुटण्याकरिताही अडचणी निर्माण होतील. यावर उपाययोजना म्हणून ओलांड्यावर दिवसातून दोन वेळा पाण्याची फवारणी, व शेडनेटद्वारे वेलीवर केलेली सावली आणि कमी प्रमाणात हायड्रोजन सायनामाईडचा वापर (१५ ते २० मि.लि. प्रति लिटर पाणी) या बाबी फायदेशीर ठरतील.
  • संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com