द्राक्षबागेत जाणवणाऱ्या समस्यावरील उपाययोजना

द्राक्षबागेतील वातावरणाचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान वाढलेले दिसून येईल. ज्या ठिकाणी बागेत लवकर छाटणी झाली, तिथे फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. काही ठिकाणी नवीन फुटी निघण्याकरिता अडचणी येताना दिसून येतील. काही बागांमध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग आलेले दिसेल. या तिन्ही समस्यांवर पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.
grapes advisory
grapes advisory

द्राक्षबागेतील वातावरणाचा आढावा घेतल्यास बऱ्याच ठिकाणी दिवसाचे तापमान वाढलेले दिसून येईल. ज्या ठिकाणी बागेत लवकर छाटणी झाली, तिथे फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. काही ठिकाणी नवीन फुटी निघण्याकरिता अडचणी येताना दिसून येतील. काही बागांमध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग आलेले दिसेल. या तिन्ही समस्यांवर पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील. वेळीच छाटणी झालेल्या बागेमध्ये फुटीची विरळणी महत्त्वाची असेल. सर्वच फुटी व्यवस्थित फुटल्या असल्यास एका वेलीवर साधारणपणे ८० ते ९० फुटी दिसतील. यामध्ये जवळपास १० टक्के फुटी जोमदार दिसतील, अन्य १० टक्के फुटी अशक्त व उशिरा निघालेल्या असतील. उर्वरीत ८० टक्के फुटी एकसारख्या व एकाच वेळी निघालेल्या दिसतील. फुटीची विरळणी करताना महत्त्वाचे म्हणजे वेलीला मिळालेल्या प्रत्येक वर्गफूट अंतराकरिता अर्धी काडी किंवा फूट असे गुणोत्तर असावे. ओलांड्यावर प्रत्येक काडी अडिच ते तीन इंच अंतरावर असल्यास पुढील नियोजन सोपे होते. उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. तेव्हा उपलब्ध ८० टक्के फुटींपैकी अडिच ते तीन इंचावर काडी राहिल अशा प्रकारे विरळणी करून घ्यावी. इतर दोन वर्गातील काड्या (जोमदार व अशक्त) सरसकट काढून टाकाव्यात. या फुटींची विरळणी शक्यतो सहा ते सात पानांच्या अवस्थेत केल्यास एकतर परिणाम चांगले मिळतात. व काड्या ओळखणे सोपे होते.

डोळे फुटण्याची समस्या  काही बागांमध्ये डोळे फुटण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. खालील परिस्थितीतील बागेत डोळे फुटण्याची समस्या प्राधान्याने दिसून येते. उशिरा फळकाढणी केलेली बाग या बागेत वेलीवर फळ दिर्घकाळ राहिल्यामुळे वेलीस ताण जास्त बसला. त्यामुळे फुटी निघणे कठिण होत आहे. मागील हंगामात वेलीवर जास्त प्रमाणात घडांची संख्या होती या परिस्थितीमुळे वेलीमधील आवश्यक सोर्स ः सिंक गुणोत्तर बिघडले, परिणामी वेल ताण सहन करू शकली नाही. द्राक्षबागेत फळ काढणी ते खरड छाटणी या कालावधीमध्ये अपूर्ण विश्रांती बऱ्याचशा बागेत मजूरांची उपलब्धता नसल्यामुळे फळकाढणी लवकर झाली नाही. आता खरटछाटणीला उशीर होत असल्यामुळे पुन्हा खरड छाटणी लवकर घेतली. अशामुळे त्याचाही ताण वेलीवर आला. खरडछाटणीपूर्वी घेतलेली चारी जास्त काळ उघडी राहिली असल्यास  बऱ्याच वेळा आपण खरड छाटणीपूर्वी मशागत म्हणून दोन वेलीमध्ये उपलब्ध बोद खोदून मोकळे करतो. त्यामध्ये पुन्हा शेणखत व अन्य अन्नद्रव्याचा पुरवठा करून माती झाकून पुन्हा बोद तयार करतो. असे करतेवेळी खोदलेले बोद काही दिवस उघडे राहतात. जवळपास २५ ते ३० टक्के मुळेसुद्धा तुटली जातात. उन्हाच्या तीव्रतेमुळे पेशींची मर होते. त्याचाच परिणाम म्हणजे ओलांडे जास्त प्रमाणात कडक झालेले असतात. कारण या वेलीमध्ये रसनिर्मिती कमी झालेली असते. परिणामी डोळे एकतर उशीरा फुटतात किंवा फुटतच नाहीत. अशा परिस्थितीत ओलांडे डागाळलेले दिसतील किंवा मुके झालेले दिसतील. या परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना 

  • घेतलेली चारी शक्य तितक्या लवकर शेणखत टाकून झाकून घ्यावी. त्वरीत पाणी द्यावे. शेणखतामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे तुटलेल्या मुळीच्या कक्षेत ओलावा टिकून राहतो. मुळांच्या पेशींची संख्या वाढून पेशींची वाढ होईल. आवश्यक असलेली पांढरी मुळी तयार होईल. यामुळे वेलीत रस निर्मिती शक्य तितक्या लवकर होऊन बाग फुटण्यास मदत होईल.
  • बागेमध्ये फळकाढणीस उशीर झाला असला तरी किमान ८ ते १० दिवस वेलीस विश्रांती द्यावी. फक्त इतकेच नाही, तर यावेळी दरवर्षीपेक्षा १० टक्के पाणी व अन्नद्रव्ये जास्त द्यावीत. यामुळे खोड, ओलांडा रसरशीत होण्यास मदत होईल.
  • छाटणीनंतर बोद पूर्ण भिजेल अशा प्रकारे पाणी द्यावे. त्यासोबत ओलांडा पूर्ण भिजेल अशा प्रकारे पाण्याची फवारणी दिवसातून दोन वेळा करावी. यामुळे ओलांड्यावरील डोळ्याभोवती आर्द्रतेचे प्रमाण वाढेल व डोळे फुटण्यास मदत होईल.
  • ओलांड्यापासून दीड ते दोन फुट वर शेडनेटचा वापर केल्यास बागेतील तापमान कमी होईल. आर्द्रता वाढण्यास मदत होईल. यामुळे डोळे लवकर फुटतील. खरड छाटणी घेतेवेळी शक्यतो एक डोळा राखून छाटणी घेतल्यास एक सारख्या डोळ्यांची समानता राहिल. डोळे एकसारखे फुटतील. कमी प्रमाणात का होईना हायड्रोजन सायनामाईडचा वापर पेस्टिंग किंवा फवारणीद्वारे (१५ ते २० मि.लि. प्रति लीटर प्रमाणे) करावा.
  • डोळे फुटत असलेल्या अवस्थेत नत्राचा पुरवठा जमिनीतून १ ते सव्वा किलो प्रति एकर ड्रिपद्वारे फक्त दोन ते तीन वेळा द्यावा. हलकी जमीन असल्यास बोदावर मल्चिंग करून घ्यावे. पाणी पुरवठा भारी जमिनीच्या तुलनेत वाढवावा.
  • कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग काही बागांमध्ये निघालेल्या कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग आलेले दिसेल. बऱ्याचशा बागेत पानांच्या कडा जळालेल्या दिसतील किंवा काही परिस्थितीत पानांच्या वाट्यासुद्धा झालेल्या दिसतील. जुनी बाग खरट छाटणी होऊन निघालेल्या फुटीवर अशी काही परिस्थिती दिसून येईल. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बऱ्याच बागेत निघालेल्या कोवळ्या फुटींवर उन्हाच्या वेळी बुरशीनाशकांची फवारणी घेतली गेल्याचे दिसून आले. यामुळे पानाच्या कडा जळालेल्या दिसतील. जरी शिफारशीत बुरशीनाशकाचा योग्य डोस घेतला असला तरी पानामध्ये पूर्णपणे हरितद्रव्य तयार झालेले नसल्यामुळे वापरलेले प्रमाण जास्त झाले. परिणामी स्कॉर्चिंग आले. खरेतर बागेत या तापमानात कोणताही रोग येण्याची शक्यता कमी असते. तेव्हा बुरशीनाशकांची फवारणी आपल्याला टाळता येते. अगदीच फवारणी करायची झाल्यास सकाळी किंवा संध्याकाळी करावी. नवीन बाग

  • रिकट घेतल्यानंतर निघालेल्या नवीन फुटीच्या पानांवर स्कार्चिंग दिसून येते. जर एक वर्ष जुन्या रुटस्टॉकवर कलम केले असल्यास हे स्कॉर्चिंग दिसणार नाही. तर ज्या बागेत जुनी बाग तळातून काढून जुन्या रुटस्टॉकवर निघालेल्या फुटींवर कलम केलेले असल्यास स्कॉर्चिंग जास्त प्रमाणात आढळून येईल.
  • रुटस्टॉक जर सहा- सात वर्षापेक्षा जास्त जुना असल्यास त्या मुळांचा विस्तारसुद्धा जास्त झाला असेल. रिकटनंर आपण एक किंवा दोन फुटी ठेवून इतर फुटी काढून घेतो. यावेळी जमिनीत असलेल्या विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी रुटस्टॉकचा वापर केला जातो.
  • उदा. जमिनीत उपलब्ध चुनखडीचे प्रमाण व पाण्यात असलेला क्षार. मुळांचा विस्तार आधीच जास्त झालेला असल्यामुळे तितक्या प्रमाणात वर पुरवठा केला जाईल. मात्र, वर फुटींची संख्या कमी असल्यामुळे उपलब्धता व गरज या ताळमेळ बसत नसल्यामुळे निघत असलेल्या फुटींवर स्कॉर्चिंगच्या रुपात परिणाम दिसून येतात. यामुळे फुटीची वाढ एकतर थांबून जाईल, पाने पिवळी पडतील, पानांचा आकार कमी होईल व पानातील हरितद्रव्याची निर्मिती कमी होईल. परिणामी खोड व ओलांडा तयार होण्यास विलंब होईल. यावर मात करण्याकरिता सल्फर ३० ते ४० किलो प्रती एकर प्रमाणे जमिनीत मिसळून घ्यावे. दुसरी महत्वाची कार्यवाही म्हणजे रिकटनंतर वर जाणारी फूट ४ ते ४.५ फूट उंच होईपर्यंत बगलफुटी काढू नये. असे केल्याने जमिनीतून मुळांद्वारे होत असलेला अतिरिक्त पुरवठा वरील वाढलेल्या कॅनोपिमध्ये विभागला किंवा रिचवला जाईल. एकदा ओलांडा तयार करणे सुरू झाले की बगलफुटी काढून टाकाव्यात.
  • संपर्क- डॉ. आर . जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com