काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील रोग नियंत्रण

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थिती जुलै महिन्यामध्ये पाऊस व उघडिप अशा दोन्ही बाबींचा समावेश असतो. यावेळी वातावरणात उघडिप असताना जास्त तापमान व जास्त आर्द्रता अशी परिस्थिती दिसून येईल.
Bacterial blight.
Bacterial blight.

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थिती जुलै महिन्यामध्ये पाऊस व उघडिप अशा दोन्ही बाबींचा समावेश असतो. यावेळी वातावरणात उघडिप असताना जास्त तापमान व जास्त आर्द्रता अशी परिस्थिती दिसून येईल. तर पावसाळी वातावरण असताना कमी तापमान व जास्त आर्द्रता या सोबत हलक्या ते मध्यम प्रतीचा पाऊस सुद्धा दिसून येईल.

द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थिती जुलै महिन्यामध्ये पाऊस व उघडिप अशा दोन्ही बाबींचा समावेश असतो. यावेळी वातावरणात उघडिप असताना जास्त तापमान व जास्त आर्द्रता अशी परिस्थिती दिसून येईल. तर पावसाळी वातावरण असताना कमी तापमान व जास्त आर्द्रता या सोबत हलक्या ते मध्यम प्रतीचा पाऊस सुद्धा दिसून येईल. अशा परिस्थितीत द्राक्ष बागेत कोणत्याच रोगाचा प्रादुर्भाव होतो, कशाप्रकारे होतो व त्यावर कशाप्रकारे उपाययोजना कराव्यात, या बद्दलची माहिती या लेखामध्ये घेऊ. केवडा (डाऊनी मिल्ड्यू 

  • हा रोग वाढण्याकरिता तापमान, पाऊस व वेलीच्या वाढीची अवस्था या महत्त्वपूर्ण असतात. वातावरणात १७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान व त्यासोबत १० मि.मी. झालेला पाऊस व ४० टक्क्यापेक्षा जास्त असलेली आर्द्रता या स्थितीमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादु्र्भाव सहज वाढतो. अर्ध परिपक्व ते कोवळे पान या स्थितीत डाऊनीच्या प्रादुर्भावास लवकर बळी पडते.
  • या रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी पानाच्या वरील बाजूस पिवळ्या रंगाचे तेलकट असे गोल डाग दिसून येतात. असे डाग हिरव्या रंगाच्या द्राक्ष जातीत दिसून येतात, तर रंगीत द्राक्षजातींमध्ये लाल रंगाचे डाग दिसतात. लगेच बदललेल्या वातावरणात या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. पानाच्या खालील बाजूस पांढरे भुकटीसारखे आवरण दिसून येईल. डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव हा पावसाळा सुरू होताच, कमाल तापमान ३० अंशापेक्षा कमी असल्यास दिसून येईल.
  • उपाययोजना 

  • या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेतील कॅनोपी मोकळी असणे गरजेचे असेल. जुलै महिन्यामध्ये काडीची परिपक्वता अर्ध्यापर्यंत आलेली दिसेल. यावेळी काडी मोडणार नाही म्हणून तारेवर सर्व काड्या सुतळीने बांधून बगलफुटी काढून घेतल्यास सुरवातीस आपण अडिच ते तीन इंचावर राखलेली काडी या वेळी रोगनियंत्रणास मदत करेल. मोकळ्या कॅनोपीमध्ये हवा खेळती राहिल्यास रोगाच्या वाढीकरिता आवश्यक असलेली आर्द्रता अपुरी पडेल व रोगनियंत्रण सोपे होईल. या वेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी आपण शक्यतो करत नाही.
  • रोगाच्या नियंत्रणासाठी पोटॅशिअम सॉल्ट फॉस्फरस ॲसीड ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टँक मिक्स) प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. किंवा
  • पोटॅशिअम सॉल्ट फॉस्फरस ॲसीड ४ ग्रॅम अधिक प्रोपीनेब ३ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे किंवा
  • मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) दीड ते दोन ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे बुरशीनाशकाचा वापर फवारणीद्वारे करावा.
  • भूरी (पावडरी मिल्ड्यू ) हा रोग शाकीय वाढीची अवस्था, ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढत असलेल्या परिस्थितीत दाट कॅनोपीमध्ये जास्त वाढतो. रोगाचा प्रसार होण्यासाठी वातावरणात २० ते २७ अंश सेल्सिअस तापमान व ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आवश्यक असते. तर ६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ३२ अंशापेक्षा जास्त तापमान व ३० टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असलेल्या परिस्थितीत रोगाचा प्रसार होण्याची शक्यता कमी असते.

    लक्षणे

  • पानाच्या खालील बाजूस काळसर डागाच्या रुपात दिसून येतात. जसेजसे प्रसार वाढत जातो, तसतसे डाग भुरकट व मोठे होत जातात. मुख्यतः दाट कॅनोपी असलेल्या वेलीवर दमट असे वातावरण निर्माण झाल्यामुळे तयार झालेल्या तापमानात या बुरशीचे बिजाणू लवकर वाढतात.
  • बिजाणूंची संख्या जितकी जोमाने वाढते, तितकेच पानातून रस शोषून घेतला जातो. परिणामी पान अशक्त होऊन गळते. अशा बागेत पूर्ण पानगळ झाल्यास काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. वेळेआधीच पानगळ झाल्यामुळे काडीमध्ये अन्नद्रव्ये तयार होत नाही. या परिस्थितीतील बागेत पुढील हंगामात एकतर गोळीघड तयार होतात किंवा घड जिरण्याची समस्या दिसून येते.
  • उपाययोजना

  • रोगाच्या नियंत्रणासाठी मोकळी कॅनोपी तितकीच महत्त्वाची असेल. वाढ नियंत्रणात ठेवल्यास कॅनोपी सुटसुटीत राहिल. याकरिता सूक्ष्म घडनिर्मितीच्या कालावधीपासून किंवा काडीवर आवश्यक त्या संख्येमध्ये पानांची पूर्तता झाल्यानंतर वेलीस नत्राचा वापर बंद करावा.
  • ज्या बागेत दाट कॅनोपी आहे, अशा बागेत प्रकाश संश्लेषणाच्या अभावामुळे कॅनोपीतील खालील पाने पिवळी झालेली दिसतात. या ठिकाणची काडीसुद्धा हिरवी असेल. नेमकी हीच पाने भुरीच्या प्रादुर्भावास लवकर बळी पडतात. तेव्हा ही पाने काढून टाकणे फायद्याचे ठरेल.
  • बुरशीनाशकांचा वापर

  • कमी तीव्रतेची बुरशीनाशके वापरून रोग नियंत्रणात आणता येईल.
  • यामध्ये सल्फर (८० डब्ल्यूपी) किंवा (८० डब्ल्यूडीजी) २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर प्रमाणे किंवा
  • ट्रायअझोल वर्गातील हेक्झाकोनॅझोल (५ एससी) १ मिली प्रती लीटर किंवा
  • डायफेनोकोनॅझोल (२५ ईसी) ०.५ मिली प्रती लीटर किंवा
  • टेट्राकोनॅझोल (३.८ ईडब्ल्यू) ०.७५ ते १ मिली प्रती लीटर पाणी या पैकी कोणतेही एक बुरशीनाशक फवारणीद्वारे वापरता येईल.
  • पाऊस व जास्त आर्द्रता असलेल्या परिस्थितीत बॅसीलस सबटिलिस २ ग्रॅम प्रती लीटर आणि ॲम्पिलोमायसिस क्विसकॅलिस ४ ते ५ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
  • करपा (ॲन्थ्रॅक्नोज)

  • हा रोग सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ज्या वेळी बागेत उष्ण वातावरण, ओलावा व ढगाळ परिस्थिती असल्यास नवीन फुटींची वाढ जास्त प्रमाणात होताना दिसून येईल. अशा वेळी करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • हा रोग मुख्यतः पावसाळा सुरू होण्याच्या व नवीन फुटी निघणे अशा वेळी जास्त प्रमाणात दिसतो. फुटीच्या शेंड्याकडील पानांवर बारीक पिवळसर डाग सुरुवातीस दिसून येतात. त्यानंतर हेच डाग तपकिरी रंगात रुपांतरीत होऊन छिद्रे पडतात.
  • रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पानांवरील पेशी मरतात व छिद्र पडते, यालाच ‘शॉट होल’ असेसुद्धा म्हटले जाते. काही परिस्थितीत हिरव्या काडीवर प्रादुर्भाव झाल्यामुळे या रोगाचे बिजाणू काडीत प्रवेश करतात. वाढ तिथेच करपल्यासारखी दिसते. फुटीचा शेंडाही जळल्यासारखे दिसून येते. त्यानंतर हे बिजाणू हळूहळू परिपक्व काडीमध्ये प्रवेश करतात. पुढील काळात फळछाटणीनंतर निघालेल्या घडावर प्रादुर्भाव करतात.
  • रोगनियंत्रण करायचे झाल्यास यावेळी निघालेल्या अनावश्यक कोवळ्या फुटी काढून टाकणे फायद्याचे ठरेल.
  • थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा
  • कासुगामायसीन (५ टक्के) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (४५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ७५० ग्रॅम प्रती हेक्टर या प्रमाणे फवारणी केल्यास नियंत्रण सोपे होईल.
  • तांबेरा (रस्ट)

  • या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः जुलै ऑगस्ट महिन्यात व जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दिसून येतो. या रोगाची लक्षणे सुरुवातीस डॉगरीज या रुटस्टॉक वर आढळून आली. या कालावधीत रुटस्टॉकची पाने जुनी झालेली असतात, व काड्या जमिनीवर लोळलेल्या असल्यास पानाच्या खालील बाजूस पिवळे ते नारिंगी रंगाचे छोटेछोटे भुकटीसारखे आवरण दिसून येते. मुख्यतः जुन्या झालेल्या पानावरच (रुटस्टॉक व काही द्राक्ष जाती) यावर प्रादुर्भाव दिसून येतो.
  • जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या परिस्थितीत पानाचे देठ, कोवळी फुट त्यातून सुटत नाही. ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला अशा ठिकाणी जुन्या पानावर खालील बाजूस पूर्णपणे बिजाणू पसरलेले दिसतील. मागील वर्षी सांगली जिल्ह्यातील वाळवा भागात या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
  • बोर्डो मिश्रण (१ टक्के) (सामू ७) किंवा
  • कॉपर हायड्रॉक्साईड २.५ ते ३ ग्रॅम प्रती लीटर किंवा
  • कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा
  • क्लोरोथॅलोनील १.५ ते २ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे वापरल्यास रोगनियंत्रण सोपे होईल.
  • जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल ब्लाईट किंवा बॅक्टेरिअल लीफ स्पॉट) या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः झांथोमोनास सिट्री व्हिटीकोला मुळे होतो. बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास रोगाची लक्षणे पानावर दिसून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपा रोगाच्या लक्षणाप्रमाणेच पानाच्या खालील बाजूस डाग दिसून येतात. कालातंराने हे डाग मोठे होऊन फुटींची वाढ खुंटते किंवा थांबते. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी फुटीची वाढ कमीअधिक झालेली दिसून येईल.  उपाययोजना

  • या रोगाच्या नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी किंवा
  • कासूगामायसीन (५ टक्के) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (४५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) ७५० ग्रॅम प्रती हेक्टर या प्रमाणे फवारणी फायदेशीर ठरेल.
  • संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com