डाऊनीनंतर द्राक्षबागा भुरीच्या विळख्यात

मणीसेंटींग व त्यानंतरच्या अवस्थेतील द्राक्षबागेमध्ये ढगाळ वातावरण व कमी तापमान सुरू झाल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. अशा परिस्थितीतील बागेत वेळीच नियंत्रणाचे उपाय केल्यास पुढील अडचणी टाळता येतील. बऱ्याच बागेमध्ये दाट कॅनोपीच्या आत असलेला घड भुरी ग्रस्त झालेला आढळून येतो. यावर कॅनोपी मोकळी ठेवणे ही सर्वात महत्त्वाची उपाययोजना असू शकेल. - डॉ. आर. जी. सोमकुंवर (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी)
powdery mildew
powdery mildew

नाशिक: हवामानात होत असलेल्या बदलांमुळे द्राक्षबागांवर संकटांची मालिकाच सुरू झाली आहे. द्राक्षावर डाऊनीनंतर आता भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. कीडनाशकांच्या जास्त फवारण्या कराव्या लागत असल्याने आर्थिक गणितही कोलमडले आहे. दोन महिन्यांत जिल्ह्यातील हवामानातील आर्द्रता अधिक असल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे द्राक्ष वेलींमध्ये अशक्तपणा अधिक वाढला होता.  डाऊनीचा प्रादुर्भाव कमीतकमी १५ ते जास्तीतजास्त ४५ दिवस दिसतो. मात्र, हा प्रादुर्भाव चालू हंगामात ८० ते ९० दिवसांपर्यंत दिसून आला. त्यामुळे एकरी ९० हजारांपर्यंत खर्च वाढला आहे. मात्र, आता कोरडे वातावरण झाल्यानंतर थंडी वाढू लागल्याने भुरीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव असल्याने चालू वर्षी द्राक्ष उत्पादकांसमोर संकटांची मालिका कायम आहे. आता ६० ते ८० दिवसांच्या दरम्यान द्राक्ष हंगाम आला आहे. द्राक्षाच्या रंगीत जातींवर अधिक प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आल्याचे द्राक्ष उत्पादक सांगतात. मागील महिन्यात काडीवर मोठ्या प्रमाणावर डाऊनी दिसून आला. मात्र, पानानंतर हा प्रादुर्भाव घडांमध्ये दिसून येतोय. त्यामुळे घड काढून टाकण्याची वेळ आली आहे.  द्राक्षबागांवरील परिणाम

  • रसायन अवशेष पातळी किमान ठेवण्यासाठी कसरत
  • चालू वर्षी रोगांच्या प्रादुर्भावामुळे फवारण्या वाढल्या
  • दरवर्षीच्या तुलनेत मजुरी व फवारणीच्या खर्चातही वाढ झाली
  • निर्यातक्षम द्राक्षबागांमध्ये रसायनांचे अंश मर्यादित ठेवण्याचे मोठे आव्हान 
  • प्रतिक्रिया थंडीमुळे द्राक्षबागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या प्रतिकूल वातावरणात महागडी कीडनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने खर्च वाढला आहे.  - बापू साळुंखे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वडणेर भैरव, ता. चांदवड 

    डाऊनीनंतर द्राक्ष पोखरणाऱ्या अळीने मोठे नुकसान केले आहे. अशा परिस्थितीत भुरीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अडचणी वाढत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत असून अडचणी कमी न होता वाढतच आहेत.  - दीपक ठुबे , द्राक्ष उत्पादक, खेडगाव, ता. दिंडोरी 

    चालू वर्षी रोगांचा प्रादुर्भाव असल्याने निर्यातक्षम द्राक्ष बागांना रासायनिक किडनाशकांच्या वापरात मर्यादा आहेत. डाऊनीनंतर भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. रसायन अंशांची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा, बसलीस, सुडोमोनास अम्पिलोमायसिस सारख्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा वापर करावा.  - प्रा. तुषार उगले, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्र विभाग, के. के. वाघ कृषि महाविद्यलय, नाशिक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com