द्राक्ष बागांना गळकुजीची समस्या

लॉकडाउनमुळे द्राक्ष काढणी वेळेवर न झाल्याने हंगामात विश्रांती कालावधी कमी मिळाला. पुढे खरड छाटणीनंतर काडी पक्वता न झाल्याची स्थिती काही ठिकाणी आहे.
grapes disease
grapes disease

नाशिक : लॉकडाउनमुळे द्राक्ष काढणी वेळेवर न झाल्याने हंगामात विश्रांती कालावधी कमी मिळाला. पुढे खरड छाटणीनंतर काडी पक्वता न झाल्याची स्थिती काही ठिकाणी आहे. यासह जूनपासून अपुरा सूर्यप्रकाश, गोडी बहर छाटणीनंतर ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यांसह परतीच्या पावसाचा फटकाही कारणीभूत आहे. त्यामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह फुलोरा अवस्थेत घडांना मार बसल्याने गळकुजीचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच दव पडत असल्याने ३५ टक्के बागांना फटका बसल्याची स्थिती आहे.  मागील हंगामात लॉकडाऊनमुळे तयार द्राक्ष मालाची काढणी लांबणीवर गेली. त्यामुळे तयार माल अधिक काळ वेलीवरच राहिला. परिणामी पुढील हंगामासाठी होणारी कामे पुढे गेल्याने वेलींना चालू वर्षी विश्रांतीचा कमी कालावधी मिळाला.त्यातच पुढे पाऊस जूनमध्ये सुरू झाला. त्यामुळे नियमित द्राक्ष हंगामापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कमी प्रमाणात बागांच्या छाटण्या झाल्या. त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बहार छाटण्या झाल्या. तर काही छाटण्या या गत सप्ताहाखेरीस सुरू होत्या. मात्र, पावसामुळे सप्टेंबरमधील बागांमध्ये छाटणीनंतर ३० ते ३५ दिवसांपर्यंत पाऊस असल्याने अशा बागा गळकुजीत सापडल्या आहेत.  ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात छाटलेल्या बागा फुलोऱ्यात आहेत. त्यांना सततच्या पडणाऱ्या दवामुळे काही प्रमाणात बागा गळकुजीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लागवडी निफाड, दिंडोरी, नाशिक व चांदवड तालुक्यात आहेत. या भागात बागांवर अनेक ठिकाणी पोंगा अवस्थेत घड जिरणे, फुलोरा अवस्थेत गळकुज या प्रमुख समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आता घड वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांचे आटोक्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या भीतीनंतर दाखल झालेले मजूर पुन्हा दिवाळी व भात काढणीसाठी गावाकडे परतल्याने मजूर टंचाई वाढण्याची शक्यता आहे.

द्राक्ष पट्ट्यातील सद्यःस्थिती 

  • अर्ली क्षेत्रावर गळकुज समस्या वाढती
  • ऑक्टोबरच्या सुरुवातीला छाटण्या झालेल्या बागांमध्ये घड जिरण्यासह लहान घड (गोळी घड) निघण्याचे प्रमाण अधिक
  • गळकुज व गोळी घड यावर उपाययोजना करण्यासाठी खर्च वाढता 
  • सकाळी पडणाऱ्या दवामुळे गळकुज होण्याच्या समस्येत वाढ 
  • भांडवल नसल्याने वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांची ओढाताण 
  • प्रतिक्रिया मागच्या हंगामात घड जिरण्याची समस्या मोठी होती. त्यातून प्रयत्न करीन बागा वाचवल्या, चांगला माल तयार केला.मात्र लॉकडाऊनमुळे द्राक्ष विक्री करता आली नाही. त्यामुळे घड तोडून मनुके तयार केले. त्यामुळे अडचणी कायम असताना यावर्षी पुन्हा पावसामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. - किशोर निफाडे, संचालक-राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

    २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान बागा फुलोरा अवस्थेत आहेत. त्यावर दव पडत असल्याने गळकुजीचा धोका आहे.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दररोज फवारण्या करण्याची वेळ आली आहे.  — बापू साळुंके,  द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड

    जिल्ह्यातील द्राक्ष बागांची स्थिती एकूण लागवडीः    ५८३६७.४३ हेक्टर अपेक्षित उत्पादनः     १६८८५९२.५४ टन सरासरी उत्पादकताः     २५ टन (हेक्टरी)

    (संदर्भ : कृषी विभाग)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com