नाशिकमध्ये द्राक्षाची मागणी वाढली, पण दरवाढीची प्रतिक्षाच

द्राक्षाला सध्या मिळणारा दर हा समाधानकारक नाही. मात्र सध्या व्यापाऱ्यांची मागणी वाढत असून, द्राक्ष उत्पादकांनी योग्य दराने माल व्यापाऱ्यांना द्यावा. चांगल्या दराची खात्री वाटते. - विजय पिंगळे, द्राक्ष उत्पादक, दरी, ता. जि. नाशिक
द्राक्ष
द्राक्ष

नाशिक : लाखो रुपयांची गुंतवणूक आणि वर्षभर प्रचंड मेहनत असे द्राक्षशेतीचे समीकरण आहे. वातावरणातील किंचितसा बदल हंगामावर विपरीत परिणाम करतो. सध्या तापमानात झालेली वाढ व द्राक्षात उतरलेली गोडी यामुळे द्राक्षांची आवक वाढली आहे. निर्यातीचे आकडे मागच्या वर्षाच्या तुलनेत जरी वाढलेले असले, तरी तुलनेत दरात मात्र सुधारणा झालेली नाही.   परदेशात आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करून द्राक्षमाल निर्यातदारांकडून काळजीपूर्वक पाठविण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निर्यातीमध्ये युरोप व रशियामध्ये कमालीची वाढ झाली. तरीही द्राक्ष उत्पादकांना समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. मागील वर्षी निर्यातक्षम द्राक्षांना मिळालेल्या दरापेक्षा २५ ते ३० टक्के कमी दर आहे. साधारणपणे एकरी २ ते ३.५० लाख उत्पादन खर्च येत असताना योग्य परतावा न मिळाल्याने द्राक्ष उत्पादक सध्या अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होत असल्याचीही प्रकरणे पुढे येत आहेत. स्थानिक बाजारात कमी दर असले तरीही किरकोळ दर प्रतिकिलो ५५ ते ६० रुपयांपर्यंत आहेत. उत्पादकांपेक्षा विक्रेते अधिक नफा कमवित असल्याचे चित्र आहे. सध्या जरी आवक वाढलेली असली तरी येणाऱ्या काळात आवक कमी होऊन बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. एकंदरीत सध्या सफेद व्हारायटीमध्ये सोनाका, सुपरसोनाका, आरके, एसएसएन, तर कलर व्हारायटीमध्ये नानासाहेब जम्बो, शरद सीडलेस यांची मागणी वाढली असून, निवडक व गुणवत्तापूर्ण मालाला चांगला दर मिळत आहे. याच अर्थाने चांगला प्रतवारी व गुणवत्तापूर्ण माल खरेदी करण्यासाठी एकी बाजूला व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे.  प्रतिक्रिया मागील वर्षाच्या तुलनेत बाजारभाव कमी मिळत आहेत. जर अशीच स्थिती राहिली तर द्राक्ष उत्पादक व निर्यातदार यांना आर्थिक फटका बसू शकतो.  - राजाराम सांगळे,  द्राक्ष निर्यातदार, नाशिक यंदा निर्यातक्षम माल अधिक तयार झाला. निर्यातदारांना मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण माल मिळाला. मात्र आवक ओसरत असून, लवकरच दर सुधारण्याची अपेक्षा आहे.  - संजय पडोळ, द्राक्ष उत्पादक, ओझरखेड, ता. दिंडोरी,  जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com