सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात एक हजार टनाने घटली

द्राक्ष निर्यात
द्राक्ष निर्यात

सांगली ः यंदा जिल्ह्यातील २ हजार २१५ शेतकऱ्यांची ५८३ कंटेनरमधून ७ हजार ४२२  टन द्राक्षाची निर्यात झाली. गेल्या वर्षी ८ हजार ५०५ टन द्राक्ष निर्यात झाली होती. युरोपीय देशांत होणारी द्राक्षनिर्यात यंदा तब्बल १ हजार टनाने घटली आहे. दुष्काळ स्थिती आणि गुणवत्तेच्या अभावामुळे निर्यात घटल्याचे मानले जात आहे.   या वर्षी जिल्ह्यातील २ हजार २१५ शेतकऱ्यांनी युरोपीय देशातील निर्यातीसाठी नोंदणी केली होती. निर्यातीचे क्षेत्र १ हजार १६५ हेक्टर नोंद झाले होते. गेल्या वर्षी १ हजार हेक्टर क्षेत्र असूनही युरोपीय देशात निर्यात जास्त झाली होती. पाऊस कमी झाल्याने यंदा पाणीटंचाई  आहे. अनेक शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा जगवल्या आहेत. पाणीटंचाईचा परिणाम द्राक्षाच्या गुणवत्तेवर झाला. त्याशिवाय चिलीमधील द्राक्षांची आवक युरोपीय देशात मोठ्या प्रमाणात झाली.  त्यामुळे ८० ते १०० रुपये प्रतिकिलो असलेले द्राक्षाचे दर ५० ते ६० रुपयांपर्यंत खाली आले. परिणामी युरोपीय देशांत होणारी निर्यात थांबवण्यात आली.   युरोपीय देशांत निर्यातीचा हंगाम तीन ते चार महिना सुरू असतो. यंदा मात्र निर्यातीचा हंगाम केवळ सव्वा महिना राहिला. जिल्ह्यातील विटा, खानापूर, पळशी, तासगाव या परिसरांतून पूर्वीपासून द्राक्षे निर्यात होते.  द्राक्ष निर्यातीचे क्षेत्र वाढविण्याची मोठी संधी सध्या जिल्ह्यातील अगदी थोडे शेतकरी द्राक्षाची निर्यात करीत आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ योजनेचे पाणी गेले आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते आहे. इतर पिकांच्या ऐवजी चांगले उत्पन्न मिळवून देणारे द्राक्ष क्षेत्र वाढवण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, कृषी विभाग यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. युरोपची द्राक्षे इतर देशाकडे वळवली यंदा द्राक्षाचे युरोपीय देशातील दर कमी झाल्याने ही द्राक्षे इतर देशांत पाठवण्यात आली. आखाती देशांतही मोठ्या प्रमाणात द्राक्षे पाठवण्यात येतात. या वर्षी आखाती देशात ६ हजार ३१ टन द्राक्ष निर्यात करण्यात आली. द्राक्ष निर्यात (टनांत)

देश   २०१८     २०१९ 
नेदरलँड  ४३०१.८०   ४८२८.२२    
नॉर्वे     ५८७.९६    ५५२.००    
अमेरिका   ९८६.९०   ९२९.९९    
जर्मनी   ४८२.२२ २७३.४४
डेन्मार्क    १४९.७६    १२.००  
फिनलँड  ५४२.८८ ४२०.००    
स्पेन १८८.५१    ५०.५४
बेल्जियम  ८०१.९९ १४५.००    
फ्रान्स   १७२.२१  १५.३०    
एकूण   ८५०५.०६   ७४२२.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com