महाराष्ट्रातून एक लाख टन द्राक्ष सातासमुद्रापार

हंगामात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे बाजारात आली असताना नेमक्‍या त्याच वेळी थंडीने तडाखा दिला. वातावरण अनुकूल असल्याने दर्जेदार द्राक्षे शेतकऱ्यांनी पिकविली, पण दरात पडझड झाल्याने उत्पादन खर्च निघू शकला नाही. निर्यातीत भारतीय द्राक्षांनी हुकमत गाजवली. स्पर्धेक देशातील द्राक्ष त्याच वेळी युरोपच्या बाजारपेठ आल्याने तेथेही फटका बसला. अंतिम टप्प्यात दरवाढ होत असली तरी हे वर्ष शेतकऱ्यांसाठी संमिश्र राहिले आहे. - कैलास भोसले, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक ः दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतून यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७४८० कंटेनर द्राक्ष सातासमुद्रापार पोचले आहेत. एक लाख ९१० टन द्राक्ष निर्यातीत ८० टक्के वाटा हा नाशिक जिल्ह्याचा राहिला आहे.  निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने निर्यात वीस टक्‍क्‍यांनी वाढलेली दिसते. थंडी वगळता फारसे संकट न आल्याने चांगले पीक शेतकऱ्यांच्या हाती आले. थंडीचा मुक्काम वाढल्याने मागणीत घट झाली. बाजारभावावर परिणाम झाला. हंगाम ऐन भरात असताना दर कोसळल्याने निर्यातीचा गोडवा शेतकऱ्यांना फारसा चाखायला मिळालेला नाही. गेली दोन दिवसांत मात्र दर १० रुपयांनी वधारले असून ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने सौदे सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव परिसरात ऑक्‍टोबर महिन्यात द्राक्ष हंगामाला यंदा प्रांरभ झाला. डिसेंबरमध्ये निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, नाशिक परिसरातील द्राक्षे बाजारात दाखल झाली. अनुकूल हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्षे फुलविली. आकार, चव व साखरेच्या योग्य प्रमाणामुळे परदेशात नाशिकची द्राक्षे पसंतीला उतरली. त्यामुळे निर्यातीचा आलेख सरासरीपेक्षा वीस टक्‍क्‍यांनी वधारला आहे. दक्षिण आफ्रिका, चिलीबरोबरच पेरू या देशांनी युरोपच्या बाजारपेठ भारतीय द्राक्षांना काही प्रमाणात टक्कर दिली. त्याचा फटका भारतीय द्राक्षांच्या दराला बसला. मात्र आता स्पर्धक देशातील द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्याने भारतातील द्राक्षाच्या वाटेतील अडसर दूर झाला आहे. त्यामुळे नेदरलॅंड, जर्मनी, किंगडमसह आखाती देशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात सुरू आहे.

अंतिम टप्प्यात वधारले बाजारभाव द्राक्षाचा यंदाचा ७० टक्के हंगाम पूर्ण झाला आहे. हंगाम सुरु झाला तेव्हा निर्यातक्षम व स्थानिक द्राक्षाला अनुक्रमे ८० व ४० रुपये प्रतिकिलो दर होते. पण उत्तर भारतात थंडीने कहर केल्याने नाशिक जिल्ह्यातील ५० टक्के द्राक्षाला कमी दर मिळाले. द्राक्ष बागेचा सौदा करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांमागे पाठपुरावा करावा लागला. तापमानात वाढ होताच मागणी वाढल्याने द्राक्षांच्या दरालाही झळाळी आली आहे. निर्यातक्षम द्राक्षाला ६० ते ७० रुपये व देशांतर्गत द्राक्षासाठी ३० ते ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत दरात तेजी आली आहे. द्राक्ष निर्यातीतून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.   एक लाख ९१० टनांची निर्यात राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत सुमारे चार लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा फुललेल्या आहेत. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात दोन लाख एकरांवर द्राक्षांची लागवड झालेली आहे. राज्यात गत वर्षाच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढ होऊन ४३ हजार ७१२ एकर क्षेत्राची नोंदणी निर्यातीसाठी झाली होती. यातून आतापर्यंत एक लाख ९१० टन द्राक्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोचली आहेत. यात नाशिकच्या द्राक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशात ११९ एकर क्षेत्राची निर्यातीसाठी नोंदणी झाली, पण यंदाही तेथील शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठ कवेत घेण्यात यश आले नाही.  

द्राक्ष निर्यात झालेले प्रमुख देश, कंसात निर्यात (टन) व कंटेनर 
नेदरलॅंड ५९ हजार ५१९ टन,४ हजार ३७३ कंटेनर
जर्मनी १७ हजार १४२ टन, एक हजार २८८ कंटेनर
युनायटेड किंगडम  १४ हजार ९८८ टन, एक हजार १२८ कंटेनर
डेन्मार्क  १ हजार ६३ टन,१५३ कंटेनर 
फ्रान्स ७१२ टन,४७ कंटेनर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com