माळशेजघाट येथे १६ फेब्रुवारीपासून ‘द्राक्ष महोत्सव’

द्राक्ष
द्राक्ष

मुंबई: द्राक्षांची बाग कशी असते, शेतकरी त्याचे उत्पादन कसे घेतात, द्राक्षांचे वेगवेगळे प्रकार कोणते, द्राक्षांपासून वाइनची निर्मिती कशी होते, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याबरोबरच द्राक्षांची प्रत्यक्ष शेतात जाऊन चव चाखण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी येत्या १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान द्राक्षगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे ‘जुन्नर द्राक्ष महोत्सव’ (Junnar Grape Festival) आयोजित करण्यात आला आहे. एमटीडीसीचे माळशेजघाट रिसॉर्ट आणि जुन्नर तालुक्यातील द्राक्ष शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत आहे. ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर होत असलेल्या या महोत्सवात पर्यटक कोणत्याही एका दिवशी सहभागी होऊ शकतात. यासाठी पर्यटकांना सकाळी १० वाजता माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर पोचावे लागेल. त्यानंतर गोळेगाव येथील द्राक्षबागेला प्रत्यक्ष भेट देऊन द्राक्ष पिकांबाबत माहिती, द्राक्षांची तोडणी, पॅकिंग, विक्री कशी केली जाते याची पर्यटकांना माहिती दिली जाईल. पर्यटकांना द्राक्षांची थेट बागेत जाऊन चव चाखता येईल. याशिवाय थेट शेताच्या बांधावरून द्राक्षांची खरेदी करता येईल. दुपारी १ वाजता ॲग्री टुरिझम युनिटला भेट, शेतात फेरफटका आणि तिथेच शेताच्या बांधावर बसून पर्यटकांना जेवणाचा आनंद घेता येईल. त्यानंतर वाइनरीला भेट देण्यात येईल. इथे पर्यटक द्राक्षापासून वाइन तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ शकतील. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता ग्रामीण बचत गटांच्या मशरूम बागेला भेट, मशरुम पिकाची महिती घेणे तसेच या पिकाच्या पॅकिंग व विक्रीची माहिती पर्यटकांना घेता येईल. या सर्व स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येकी फक्त ५० रुपये इतकी प्रवेश फी असून, या स्थळांना भेट देण्यासाठी एमटीडीसीमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी पर्यटकांना माळशेज घाट येथील एमटीडीसी रिसॉर्टवर किंवा गोळेगाव (लेण्याद्री) (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे पोचावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com