पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांना मोठा फटका

पावसामुळे द्राक्ष पिकावर झालेला परिणाम
पावसामुळे द्राक्ष पिकावर झालेला परिणाम

नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे हंगाम अडचणीत सापडला आहे. द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत असताना डाऊनी, करपा, मणीगळ, घडकूज व घड जिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे एकूण क्षेत्र ५८,३६७.४३ हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर सध्या या समस्यांचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दिंडोरी, निफाड व नाशिक तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने डाऊनी, करपा, फळगळ, घडकूज आणि घड जिरण्याचे प्रमाण वाढले असल्याचे या भागातील द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. अनेक ठिकाणी अनेक बागा पोंगावस्थेत आहेत. सध्याच्या हवामानामध्ये सगळ्यात जास्त धोका दोडा अवस्थेपासून मणीधारणा अवस्थेपर्यंतच्या बागांना आहे. प्रामुख्याने सिन्नर, चांदवड, दिंडोरी तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत असल्याने याही भागात पावसामुळे बागांना मोठा धोका निर्माण झाला आहे. फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये फळगळ व घडकूज मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे एकरी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी द्राक्ष पीक घेण्यात आले आहे. मात्र द्राक्ष काढणीसाठी आले असताना पावसाच्या तडाख्यामुळे मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे उत्पादन हाताशी असताना मोठ्या प्रमाणावर घड खराब झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे निर्यातीचा टक्का मोठ्या प्रमाणात घटेल असे द्राक्ष तज्ज्ञांनी सांगितले. निफाड, चांदवड तालुक्याच्या पूर्व भागात बागांच्या छाटण्या चालू आहेत. त्यामुळे या भागात नुकसानीची पातळी कमी असली तरी पुढील काळात असेच हवामान राहिले तर मोठ्या अडचणींचा सामना जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com