जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना सव्वातीन लाखांचा गंडा
निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्याने सव्वातीन लाखांना गंडा घातला आहे.
नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्याने सव्वातीन लाखांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्याने पैसे न देताच पोबारा केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की मौजे सुकेणे येथील संदेश प्रकाश मोगल व कसबे सुकेणे येथील नंदू दशरथ भंडारे, राहुल कारभारी भंडारे या शेतकऱ्यांचा द्राक्षमाल आग्रा येथील द्राक्ष व्यापारी रवींद्र गोस्वामी याने घेतला होता. द्राक्ष बाग सुरू केल्यानंतर दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून द्राक्ष बाग अर्धवट सोडून पैसे न देता त्याने पोबारा केला आहे. त्यात अनुक्रमे संदेश मोगल एक लाख ६० हजार ६५० रुपये, नंदू भंडारे एक लाख ३५ हजार २०० रुपये व राहुल भंडारे एक लाख १२ हजार ७०० रुपये यांचे जवळपास सव्वातीन लाख रुपये व्यापाऱ्याने दिले नाहीत. संदेश मोगल यांना २० हजार रुपये दिले आहेत.
ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
संशयित व्यापारी रवींद्र गोस्वामी हा दुचाकीने (यूपी ८०, एफएम २१८६) येत होता. ओझर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक रहाटे तपास करीत आहेत.
प्रतिक्रिया
आग्रा येथील व्यापारी रोखीने पैसे देऊन द्राक्ष माल खरेदी करत होता. परंतु विक्रीत अडथळे येत आहेत. दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून पैसे न देताच त्याने पलायन केले. पिंपळगाव अडत ठिकाणाहून त्याची चौकशी होऊन आमचे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.
- संदेश मोगल, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मौजे सुकेणे
ओझर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना यापूर्वीच व्यापाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स ताब्यात घ्याव्यात व चौकशीअंती द्राक्ष बाग द्याव्या, अशा सूचना केल्या आहे. या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्यात. दोषी व्यापाऱ्यांची चौकशी केली जाईल.
- अशोक रहाटे, पोलिस निरीक्षक, ओझर पोलिस स्टेशन
- 1 of 691
- ››