दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ आश्वासनांवर

‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबाची उपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेली नाही. राजकीय नेत्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने या कुटुंबीयांचा जगण्याचा संघर्ष आजही सुरूच आहे.
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ आश्वासनांवर
दादाजींचे कुटुंबीय जगतेय केवळ आश्वासनांवर

चंद्रपूर: ‘एचएमटी’सह तब्बल ९ धानाचे वाण विकसित करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबाची उपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतरही संपलेली नाही. राजकीय नेत्यांकडून आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने या कुटुंबीयांचा जगण्याचा संघर्ष आजही सुरूच आहे. नागभीड तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी असलेल्या दादाजी खोब्रागडे या अल्पशिक्षित शेतकऱ्याने निवड पद्धतीने ‘एचएमटी’ हे वाण विकसित केले होते. उत्पादनक्षम असलेल्या या वाणाचा अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये प्रसार झाला. त्यानंतर या वाणाखालील लागवड क्षेत्रही वाढीस लागले.    एवढ्यावरच या संशोधकाने न थांबता ‘डीआरके’ हे वाण विकसित केले. त्यानंतर दादाजींनी मागे वळून न पाहता तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. मागास, नक्षल प्रवण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या या शेतकऱ्याच्या संशोधनाची दखल राज्य तसेच देशपातळीवर घेण्यात आली. धान क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. परंतु धान विक्रीतून पैसे कमाण्याऐवजी शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या या संशोधकाने आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष केले. परिणामी उतारवयात त्यांना अनेक आजारांनी ग्रासले असताना उपचारासाठी मात्र त्यांच्याकडे पैशाची सोय नव्हती. काही दानशूरांकडून मदत देण्यात आली मात्र ती देखील अपुरी असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांना पैशासाठी हात पसरावे लागले. अशातच उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने तीन जून २०१८ रोजी दादाजी खोब्रागडे यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूतीची लाट राज्यात पसरली. 

दादाजी यांच्या मृत्यूनंतर १२ जून २०१८ रोजी भाजप खासदार अशोक नेते, हंसराज अहिर यांनी सर्वांत आधी गावात जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी दादाजी खोब्रागडे यांचे स्मारक बांधण्यासह इतरही उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतु आजवर या आश्वासनाची पूर्तता त्यांना करता आली नाही. दुसऱ्या दिवशी १३ जूनला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खोब्रागडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या पुढाकाराने नंतर हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय देयकापोटी तीन लाख रुपयांचा धनादेश रुग्णालयाच्या नावे काढण्यात आला. हा अपवाद वगळता इतर कोणतीच मदत शासन, प्रशासन तसेच राजकारण्यांकडून झाली नाही. त्यामुळे आजही हे कुटुंबीय व हलाखीचे जीवन जगत आहे. 

माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दादाजींचा नातू विजय खोब्रागडे यांना बल्लारपूर पेपर मिलला नोकरी मिळवून दिली आहे. वेतनापोटी त्याला महिन्याला दहा ते बारा हजार रूपये मिळतात. ५ डिसेंबर २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोजनि (चक) या शिवारात पाच एकर शेती देण्यात आली होती. हे दोनच पर्याय या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचे स्रोत आज आहेत. या थोर संशोधकांच्या कुटुंबीयांचा आजही मातीच्या घरातच निवारा आहे.  दादाजींच्या नावाने कृषी महाविद्यालय स्थापन करा दादाजींनी संशोधनाला प्राधान्य दिले होते. त्यांच्यापासून या परिसरातील नव्या पिढीतील युवकांना प्रेरणा मिळावी. याकरिता शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करावे, त्याला दादाजींचे नाव द्यावे, अशी मागणी देखील त्यांच्या कुटुंबीयांची आहे. त्या मागणीचा देखील कोणत्याच राजकीय पक्षाकडून विचार झाला नाही, अशी खंतही कुटुंब व्यक्त करतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com