चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार 

शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आवक होत आहे. पुढील महिना-दीड महिन्यात बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे.
groundnut_2.jpg
groundnut_2.jpg

पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी आवक होत आहे. पुढील महिना-दीड महिन्यात बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यातच देशांतर्गत आणि चीनसह इतर आशियायी देशांकडून मागणी वाढल्याने शेंगदाणा दरात १० टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल आणि तेलबिया दरात झालेली वाढीमुळेही शेंगदाणा दराला आधार मिळत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात शेंगदाण्याला मागणी असल्याने दरांना आधार मिळतो आहे. त्याचबरोबर कारखाने आणि साठेबाजांकडील शेंगदाण्याचे साठे कमी होत चालल्यानेही सगळ्यांचे डोळे रब्बी हंगामातून येणाऱ्या पिकाकडे लागले आहेत. पुढील पाच ते सहा आठवड्यांत शेंगदाण्याच्या आवकेत वाढ होण्याचे संकेत आहेत. त्यापूर्वीच शेंगदाण्याच्या किमतीत १० टक्के सुधारणा झाली आहे. सध्या गुजरातच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये शेंगदाण्याच्या किमती प्रति २० किलोला ११७५ ते १२०० रुपये आहेत. असे असले तरी शेंगदाण्याचे भाव अजून ७५ ते १२० रुपयांनी सुधारण्याची शक्यता आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत शेंगदाण्याचे शिल्लक साठे निम्म्याने कमी झाले आहेत. यंदा शेंगदाण्याचे साठे सात ते आठ लाख टन असण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षीचे साठे १२ ते १५ लाख टन होते. त्यामुळे येत्या महिना, दीड-महिन्यात शेंगदाण्याची आवक सुरू झाली, तरी बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता विश्‍लेषकांनी वर्तवली आहे. शेंगदाणा उत्पादनात गुजरात सगळ्यात आघाडीवरचे राज्य आहे. तेथे यंदा आवक कमी झाली आहे. गेल्या वर्षी, याच कालावधीत, गुजरातेत दररोज ८० हजार पोती येत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत यंदा ४० हजार पोती येत आहेत, म्हणजे आवकही निम्म्याने कमी झाली आहे. त्याचबरोबर निर्यातदारांकडून मागणी असल्याने भावांमध्ये सुधारणा झाली आहे. 

खरिपात देश पातळीवर भुईमुगाची लागवड साधारणपणे ४२ लाख हेक्टरवर होते. त्यापैकी १५ लाख हेक्टर लागवड क्षेत्र गुजरातमध्ये असते, आठ लाख हेक्टर आंध्र प्रदेशात असते आणि पाच लाख हेक्टर राजस्थानात असते. महाराष्ट्रात खरिपातील तेल बियाण्याचे पीक म्हणजे सोयाबीन. राज्यातील भुईमुगाचे लागवड क्षेत्र दोन लाख हेक्टरवर असते. रब्बीमध्ये देशात एकूण सात लाख हेक्टरवर भुईमूग लागवड होते. सरकारी आकडेवारीनुसार कर्नाटक, तमिळनाडू, आणि तेलंगण ही प्रमुख राज्ये आहेत.  चीनला मोठी निर्यात  यंदा एकंदरीत सगळ्याच आंतरराष्ट्रीय शेतीमाल खरेदीवर चीनचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांच्या किमतींना मोठा आधार मिळाला. सध्या चीन शेंगदाण्याच्या खरेदीसाठी बाजारात उतरल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. भारतातून शेंगदाण्याच्या एकूण निर्यातीपैकी ९५ टक्के चीनला झाली आहे. चीन व्यतिरिक्त व्हिएतनाम आणि इंडोनेशियासाहीत इतर देशातही भुईमुगाची निर्यात होते.  शेंगदाणा तेलाची निर्यात वाढण्याचे संकेत  भारतातून २०१९ मध्ये ४५ हजार टन शेंगदाणा तेलाची निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदा शेंगदाणा तेलाच्या निर्यातीत तब्बल चारपट वाढ होण्याचा अंदाज असून, ती २.२५ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत देशातून ४.७१ लाख टन शेंगदाण्याची निर्यात झाली. अजून जानेवारी ते मार्च तिमाहीची निर्यातीची आकडेवारी जाहीर होणे बाकी आहे.  राज्यात पावसाचा फटका  या महिन्यात १८ ते २३ मार्च या काळात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा फटका भुईमुग पिकालाही बसला आहे. परंतु नेमके किती नुकसान झाले याचा आकडा अद्याप हाती आला नाही. मात्र उत्पादकतेला फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  यवतमाळ झाले भुईमुगाचे हब  यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि महागाव या दोन तालुक्यांत भुईमुगाला प्रधान्य देण्यास सुरुवात झाली आहे, अशी बातमी मागे ‘अॅग्रोवन’ने दिली होती. दरवर्षी या दोन तालुक्‍यांतील लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे ७,८०० हेक्‍टरवर भुईमूग लागवड आहे. त्यातील सर्वाधिक २,४२५ हेक्‍टर क्षेत्र एकट्या पुसद तालुक्‍यात आहे. कपाशीवर या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशी काढून अनेकांनी भुईमूग लागवड केली.  यामुळे दराला आधार 

  • मागील काही दिवसांत दरात १० टक्के वाढ 
  • तेल मिलर्स, स्टॉकिस्टकडे कमी माल असण्याची चिन्हे 
  • सध्या गेल्यासवर्षीच्या तुलनेत आवक निम्मी 
  • देशांतर्गतसह निर्यातीसाठीही मोठी मागणी 
  • चीनकडून शेंगदाणा तेलाची मोठी खरेदी 
  • इतर आशियायी देशांकडून मागणीचा जोर 
  • खाद्यतेल आणि तेलबिया दरात आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा लाभ 
  • प्रतिक्रिया चीनमध्ये भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चीनला भारताकडून खरेदी करण्याच्या व्यतिरिक्त पर्याय नाही. जवळपास ९५ टक्के निर्यात चीनकडेच होणार आहे. त्यामुळे दरात वाढ कायम राहणे अपेक्षित आहे.  - गोविंदभाई पटेल, प्रमुख व्यापारी आणि विश्‍लेषक 

    निर्यातदारांकडून मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारतीय भुईमुगाच्या चांगल्या गुणवत्तेमुळे इतर देशातून भारतीय पिकाची मागणी जास्त असते.  - मुकेश कुमार, अध्यक्ष, अंबिका मिल 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com