बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९ मीटरने वाढ

कधी नव्हे ती या वर्षी दमदार पाऊस झालेला आहे. परतीचा पाऊससुद्धा ताकदीने झाल्याने ही भूजलपातळीत वाढ झालेली आहे. असे प्रत्येक वर्षी होईलच, याची शाश्‍वती नाही. त्यामुळे आपल्याकडे आलेले पाणी आता जपून वापरले पाहिजे. त्याचे मोल प्रत्येकाने जाणले तरच फायदा होईल. - रामकृष्ण पाटील, जलतज्ज्ञ
water level
water level

बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पाणी समस्येत यामुळे मोठ्या प्रमाणात भर पडली. गेल्या वर्षी जिल्ह्यात पहिल्यांदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. कोट्यवधींची हानी झाली आहे. परंतु, याच पावसामुळे जिल्ह्याच्या भूजलपातळीत वाढ झाली. बंद पडलेले पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित झाले.  जिल्ह्यात भूजलपातळी १.३९ मीटरने वाढली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास १६७ विहिरींचे निरीक्षण नोंदवले. त्यात सप्टेंबर २०१९ मध्ये भूजलपातळी ४.७७ मीटर इतकी आढळून आलेली आहे. १.३९ मीटरची वाढ त्यात झालेली असल्याचे सांगितले जाते. गेल्या चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षात एप्रिल-मे महिन्यांत जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक टँकर धावत होते. जागोजागी पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्या. शेतांमधील विहिरी उघड्या झाल्याने सिंचन बंद झाले होते. अनेकांना उन्हाळ्यात पिके घेता आली नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत यंदाचा पाऊस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. प्रामुख्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झालेली आहे. प्रामुख्याने परतीचा पाऊस अधिक फायदेशीर ठरला. भूजलपातळी वाढल्याने आगामी काळात पाणीटंचाई निवारण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. सोबतच सिंचनासाठी फायदेशीर ठरणार आहे. या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पातळीत वाढ झालेली आहे. सध्याही अनेक ठिकाणी नदी-नाले वाहताना दिसत आहेत. याचाच अर्थ जमिनीत पाणी साठवल्यानंतरचे उर्वरित पाणी झिरपत आहे. यंदा अनेक वर्षांत ही वाढ झालेली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या जिल्ह्यात सर्वाधिक भूजलपातळी संग्रामपूर तालुक्यात ७.६० मीटरने वाढल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे देऊळगावराजा, लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात भूजलपातळीत फारशी वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प यंदा तुडुंब भरून आहेत. जलसंधारणाच्या कामांमध्ये सर्वत्र पाणी साठलेले आहे. हा साठा किमान मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारा आहे. तालुकानिहाय भूजलपातळीची आकडेवारी (मीटरमध्ये)

तालुका  पाणीपातळी  घट-वाढ
बुलडाणा  १.८४    १.४२
चिखली    १.७६    १.११
देऊळगावराजा   ४.८३   (-०.०८)
मेहकर   ३.०६  ०.११
लोणार   ३.७०  (-०.१५)
सिंदखेडराजा  ३.२३    (-०.४५)
मलकापूर ५.४९  ३.०६
नांदुरा    १३.७३   १.२१
मोताळा   ३.५६   १.८१
खामगाव  २.८८  २.८९
शेगाव  ६.०८ २.७३
जळगाव (जा.)  ३.४३   २.२१
संग्रामपूर   ३.२३   ७.६०
एकूण   ४.७७      १.३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com