पुणे विभागात भूजलपातळी खालावली

पुणे विभागात भूजलपातळी खालावली
पुणे विभागात भूजलपातळी खालावली

पुणे ः पावसाळ्यात पडलेला पावसाच्या खंडाचा परिणाम भूजलपातळीवर झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून येत्या उन्हाळ्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांतील दोन हजार २५८ गावांमध्ये पाणीटंचाई भासणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यापैकी २७ तालुक्यांतील ६६४ गावांमध्ये आॅक्टोबरपासून भीषण पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. आत्तापासून सरकारला पाणी टंचाई कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहे.

पुणे विभागातील जून ते सप्टेंबर महिन्यातील पडलेल्या पावसाचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांत ०-२० टक्के घट आढळून आली असल्याचे दिसून आले. तर पाच तालुक्यांत २०-३० टक्के, १३ तालुक्यांत ३० ते ५० टक्के घट आढळून आली. तर १४ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आढळून आली.

तसेच १५ तालुक्यांत पाऊस झाला नसल्याचे चित्र समोर आले आहे. भूजलपातळीत शून्य ते एक मीटरने घट आढळून आलेल्या गावात पाणीटंचाईची शक्यता कमी असून, ती नियंत्रित ठेवण्यासारखी असते. शासन निर्णयातील निकषानुसार पर्जन्यमानामध्ये वीस टक्क्यांपेक्षा कमी तूट असलेल्या गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्यता नसते. मात्र, पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास विभागातील बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरीही गाठली नसल्याचे आढळून येते.

विहिरींच्या नोंदी ठरल्या महत्त्वाच्या जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे भूजलपातळी किती वाढली यांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणा करते. यंदाही विभागातील स्थिर भूजलपातळीच्या पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. त्या निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील आॅक्टोबर महिन्यातील सरासरी भूजलपातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार विभागातील एकूण ५७ तालुक्यांपैकी ४४ तालुक्यांतील दोन हजार २५८ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. तर ७२२ गावांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त, ६३३ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, ९०३ गावांमध्ये एक ते दोन मीटर एवढी घट आढळून आली असल्याचे दिसले.

जिल्हानिहाय भूजलपातळीत तूट असलेली गावांची संख्या
जिल्हा ३ मीटरहून अधिक ३ मीटरपर्यंत २ मीटरपर्यंत १ मीटरहून अधिक
पुणे १५२ १६३ २६२ ५७७
सोलापूर ३७१ २८१ २९७ ९४९
कोल्हापूर
सांगली १३६ ११४ १६२ ४१२
सातारा ६३ ७५ १७९ ३१७
पुणे ७२२ ६३३ ९०३ २२५८

कोकण आणि विदर्भाच्या पूर्व पट्ट्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाचा पश्चिम पट्ट्यातील काही जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे भूजलपातळी वाढली नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. येत्या उन्हाळ्यात या भागात चांगलीच पाणीटंचाई जाणवेल. त्यासाठी या भागातील नागरिकांनी पाण्याचा कमी वापर करण्याची गरज आहे. - शेखर गायकवाड, संचालक, भूजल सर्वेक्षण, विकास यंत्रणा, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com