यवतमाळ जिल्ह्यात भूजल पातळीत घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई बाजूला पडली होती. निवडणूक आटोपताच प्रशासनाने टंचाई निर्मूलनाच्या कामांना सुरवात केली आहे. मार्च महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत ०.२२ मीटरने घट झाल्याचे आढळून आले. टंचाईची तीव्रता नसली तरी सद्यःस्थितीत आठ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, चार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत यंदा टंचाई बाजूला होती. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक आटोपली असून प्रशासनाने आता टंचाईवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा जिल्ह्यात टंचाईची तीव्रता नसली तरी प्रशासनाने साडेचार कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. निवडणुकीच्या काळात टंचाईवर कुणाचेही लक्ष नव्हते. निवडणूक आटोपताच प्रशासनाने टंचाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रशासनाने तयार केलेल्या टंचाई आराखड्यात जिल्ह्यातील ७०० गावांचा समावेश आहे. त्यासाठी चार कोटी ४७ लाख ६२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तीव्रता कमी असली तरी आता टंचाईने डोके वर काढण्यात सुरवात केली आहे. त्यात ७५५ उपाययोजनांचा समावेश आहे.

सध्या वणी तालुक्‍यातील सहा, दारव्हा व पुसद प्रत्येकी एक अशा आठ गावांसाठी आठ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. बाभूळगाव, दारव्हा तालुक्‍यांत प्रत्येकी एक तर पुसद तालुक्‍यात दोन असे चार टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी विहीर अधिग्रहणाचा आकडा तब्बल ७२५ होता. १०८ गावे व कळंब नगर पंचायत येथे दोन असे ११० टॅंकर सुरू होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तीव्रता कमी आहे. यंदा भूजल पातळीतही केवळ .०२२ मीटर घट झाली आहे. वाढते तापमान पाहता येणाऱ्या काळात भूजल पातळीत घट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  

भूजल पातळीत झालेली घट ः  आर्णी  -०.८१, बाभूळगाव ०.१९,दारव्हा ०.१६,दिग्रस -०.५७,घाटंजी -०.१३,कळंब -०.१९,महागाव ०.७४, मारेगाव ०.१५,नेर -०.४६, पांढरकवडा -१.२९, पुसद -०.४३, राळेगाव ०.२६, उमरखेड ०.५५, वणी -१.६४, यवतमाळ -०.७३, झरी ०.७५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com