नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
राज्याच्या भूजलपातळीत वाढ; परतीच्या पावसाचा फायदा
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ७६ तालुक्यांतील सुमारे ९८२ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक वाढली असल्याचे आढळून आले आहे.
पुणे : पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ७६ तालुक्यांतील सुमारे ९८२ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक वाढली असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी अवघ्या १४५ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती भासणार असल्याचे चित्र आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागांतील धरणे भरली होती. मात्र विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाचा तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजलपातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे. गेल्या वर्षी सुमारे ९ हजार ३५५ गावांमध्ये एक मीटरपेक्षा पाणीपातळी खोल गेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी वाढ झाली असली, तरी उपसा अधिक झाल्यास उन्हाळ्यात काही प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे.
पर्जन्यमानाचा तुलनात्मक अभ्यास ः
ऑक्टोबरअखेरीस तालुकानिहाय पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी २५८ तालुक्यांत सरासरी, त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान झालेले असून, ६७ तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आली आहे. सरासरीच्या पर्जन्यामानाच्या तुलनेत तूट आलेल्या २५८ तालुक्यांपैकी ६७ तालुक्यांत ० ते २० टक्के तूट आढळून आली आहे. तर १७ तालुक्यांत २० ते ३० टक्के, १३ तालुक्यांत ३० ते ५० टक्के, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट एकाही तालुक्यात आढळून आलेली नाही.
विहिरींच्या पाणीपातळीचा अभ्यास ः
भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या ऑक्टोबर महिनाअखेरमधील निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजलपातळीशी तुलनात्मक करण्यात आला. राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरींपैकी २० हजार ७५४ विहिरींमधील भूजलपातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली असून, १२ हजार १५ निरीक्षण विहिरींमधील भूजलपातळीमध्ये सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. त्यामध्ये राज्यातील एकूण ९ हजार ३५५ गावांत भूजलपातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ४,१६४ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. एक हजार ९१० गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर तीन हजार २८१ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे.
मराठवाड्यात १५ तालुक्यांतील पाणीपातळी घटली
मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत चांगलीच घट झाली आहे. मात्र उपसा अधिक होत असल्याने मराठवाड्यातील १५ तालुक्यांतील ९० गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल असल्याचे निदर्शनास आले आहे. यात जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ गावांत एक ते दोन मीटर, तर २५ गावांत दोन ते तीन मीटर, तर ११ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे.
विदर्भात ६७९ गावांत पाणीपातळी खोल
विदर्भात काही भागांत कमी झालेल्या पावसाचा परिणाम ४६ तालुक्यांत जानेवारी महिन्यापासून दिसून येईल. विदर्भातील सुमारे ६७९ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे. यामध्ये नागपूर विभागातील १५८, तर अमरावती विभागातील ५२१ गावांचा समावेश आहे. त्यापैकी ४०८ गावांत एक ते दोन मीटर, तर १४० गावांत दोन ते तीन मीटर, तर १३१ गावांत तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी गावे
कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणीपातळी चांगली झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील अवघ्या २१३ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी १८९ गावांत एक ते दोन मीटर, तर २१ गावांत दोन ते तीन मीटर, तर ३ गावांत तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
भूजलपातळी खोल जाण्याची कारणे ः
- पावसाचे स्थळ, वेळ आणि दोन पावसांतील खंड
- भूजलाचा सिंचनाकरिता होणारा अतिउपसा
- भूजलाचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव
- कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण
- पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी
प्रतिक्रिया...
यंदा चांगल्या पावसामुळे भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ
झाली आहे. मात्र रब्बी हंगामात पाण्याचा उपसा अधिक वाढला,
तर पुन्हा पाणीपातळी झपाट्याने खाली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य
नियोजन करून कमीत कमी उपसा कसा करता येईल, यावर भर द्यावा.
जेणेकरून ९८२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती तयार
होणार नाही.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे
विभागनिहाय भूजलपातळी वाढलेल्या गावांची संख्या | ||||
विभाग | ३ मिटर (+) | २ ते तीन ३ मिटर (+) |
१ ते २ मिटर (+) |
|
ठाणे | ० | ० | १ | १ |
नाशिक | ० | २१ | १८६ | २०७ |
पुणे | ३ | ० | २ | ५ |
औरंगाबाद | ११ | २५ | ५४ | ९० |
अमरावती | १२० | १२७ | २७४ | ५२१ |
नागपूर | ११ | १३ | १३४ | १५८ |
एकूण | १४५ | १८६ | ६५१ | ९८२ |
पाणीटंचाई कालावधीचे गृहीतके व संभाव्य अनुमान | |||||
क्षेत्र | पर्जन्यमानातील तूट (टक्के) | स्थिर पाणी पातळीतील घट | तालुके | गावांची संख्या | संभाव्य टंचाई कालावधी |
अवर्षणप्रवण व शाश्वत पर्जन्यमान | २० टक्क्यांपेक्षा जास्त | तीन मीटरपेक्षा जास्त | ४ | ३६ | ऑक्टोबरपासून पुढे |
दोन ते तीन मीटर | ८ | ७३ | जानेवारीपासून पुढे | ||
एक ते दोन मीटर | १६ | २१७ | एप्रिलपासून पुढे | ||
एकूण | १६ | ३२६ | -- | ||
अति पर्जन्यमान | ५० टक्क्यांपेक्षा जास्त | दोन ते तीन मीटर | -- | -- | जानेवारीपासून पुढे |
एक ते दोन मीटर | -- | -- | एप्रिलपासून पुढे |
- 1 of 1498
- ››