पाटण तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात

भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात
भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात

पाटण, जि. सातारा  ः तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त वळीव किंवा मॉन्सूनच्या सरींची. सध्या शेतांमध्ये खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वाकडे आली आहे. मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्याचे कुटुंब व पै-पाहुण्याची मदत घेऊन भुईमूग काढणीची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  

मॉन्सून उशिरा दाखल होणार असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या खरिपाच्या पेरण्या रखडणार आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. यात्रा उत्सवांचा कालावधी संपला असून लग्नसराईची धामधूम कमी झाली आहे. 

अति पावसामुळे खरीप हंगामातील भुईमूग पिकाचे तण व रानडुकरांमुळे वारंवार नुकसान होते. त्यामुळे उन्हाळी हंगामातील भुईमूग पीक घेण्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. यंदा भुईमूग काढणीच्या कालावधीत वळिवाचा पाऊस न पडल्याने काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. भुईमुगाची काढणी, काढलेल्या शेंगा वाळविणे व भुईमुगाचे वेल वाळवून जनावरांना पावसाळ्यात सुका चारा म्हणून सुरक्षित ठेवणे यामध्ये शेतकरी व्यस्त आहे.

भुईमूग काढणीसाठी मजुरांची कमतरता असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब भुईमूग काढणीत मदत करत आहेत. तसेच, उन्हाळी सुटीसाठी शहरातून आलेली चाकरमान्यांची कुटुंबे भुईमूग काढणीत योगदान देत आहेत. काही ठिकाणी पै-पाहुण्यांचा आधार घेण्यात येत आहे. वळिवाच्या पावसाने दडी मारली असून शेतकऱ्यांचे सारे लक्ष मॉन्सूनकडे लागले आहे. तो लवकर दाखल झाला नाही तर यावर्षी खरिपाच्या पेरण्या रखडण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com