लातूर विभागात भुईमुगाचा पेरा घटला; मक्याचे क्षेत्र वाढले

उन्हाळी भूईमूग
उन्हाळी भूईमूग
नांदेड  ः मराठवाड्यातील लातूर कृषी विभागाअंतर्गतच्या पाच जिल्ह्यांमध्ये १५ हजार ६१६ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. या जिल्ह्यांत उन्हाळी भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार २०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १० हजार ३८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २२८० हेक्टर आहे. मात्र मक्याची २९३२ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
लातूर कृषी विभागाअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत उन्हाळी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ७६० हेक्टर आहे. आजवर या जिल्ह्यांत १५ हजार ६१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६२४० हेक्टर असताना ५९०० हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी क्षेत्रामध्ये २८९० हेक्टरवरील भुईमुगाचा, ७२८ हेक्टरवरील मक्याचा, २२०४ हेक्टरवरील ज्वारीचा, ७८ हेक्टरवरवरील तीळ पिकाचा समावेश आहे.
 
परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५४३० हेक्टर असताना ५३२८ हेक्टवर पेरणी झाली आहे. यामध्ये ४५९१ हेक्टरवरील भुईमुगाचा, ७३७ हेक्टरवरील मका पिकाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३९७० हेक्टर असून ११५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात ८०४ हेक्टरवरील भुईमुगाचा, ३५० हेक्टरवरील मका पिकाचा समावेश आहे. 
 
लातूर जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २०६० हेक्टर असताना १४०५ हेक्टरवर पेरणी झाली. पेरणी झालेल्या पिकांमध्ये १०६१ हेक्टरवरील भुईमुगाचा, ३२५ हेक्टरवरील मक्याचा, १९ हेक्टरवरील सूर्यफुलाचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ५०६० हेक्टर असताना १८२९ हेक्टरवर पेरणी झाली. यामध्ये १०३७ हेक्टरवरील भुईमुगाचा, ७९२ हेक्टरवरील मका पिकाचा समावेश आहे.
 
लातूर कृषी विभागात उन्हाळी हंगामातील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या भुईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र १७,२०० हेक्टर आहे; परंतु यंदा आजवर १०,३८३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. लातूर वगळता अन्य चार जिल्ह्यांत भुईमुगाचे क्षेत्र कमी झाले आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४५९१ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वांत कमी ८०४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे.
 
जायकवाडीच्या कालव्याचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्यामुळे परभणी जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पेरा वाढला आहे. सिद्धेश्वर आणि इसापूर धरणातून आवर्तने नसल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील उन्हाळी पेरा घटला आहे. नगदी पीक तसेच चारापीक म्हणून भुईमुगाची; तसेच चारापीक म्हणून मका आणि ज्वारी या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली. मक्याचे क्षेत्र वाढले आहे. लातूर वगळता अन्य जिल्ह्यांत सूर्यफुलाचा पेरा झालेला नाही.

पाच जिल्ह्यांतील पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर) : भूईमूग १०,३८३,मका २,९३२, ज्वारी २,२०४, तीळ ७८, सूर्यफुल १९.  

 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com