हिंगोली जिल्ह्यातील भूजलपातळीमध्ये १.१९ मीटरने वाढ

Groundwater level in Hingoli district increased by 1.19 m
Groundwater level in Hingoli district increased by 1.19 m

हिंगोली : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १.१९ मीटरने वाढ झाली आहे. 

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे भूजलपातळीत आणखीन वाढ होईल. त्यामुळे येत्या मे महिन्यापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता कमी राहू शकते. पाणीटंचाई टाळण्यासाठी भूजलाचा अतिउपसा थांबविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सिंचनासाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धतीवर भर देणे आवश्यक आहे, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.

भूजलपातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील २३ पाणलोट क्षेत्रातील ५० निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेण्यात येतात. निरीक्षण विहिरींतील मागील पाच वर्षांतील सप्टेंबर महिन्यातील भूजलपातळीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सर्व पाच तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. सर्वांत कमी म्हणजे ०.९३ मीटर वाढ वसमत तालुक्यात आढळून आली.

हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील भूजलपातळीमध्ये १ ते २ मीटरने वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. सप्टेंबर महिन्याअखेरच्या पर्ज्यनमानाची तुलना केली असता, जिल्ह्यातील पाच पैकी हिंगोली आणि कळमनुरी या दोन तालुक्यांमध्ये १० टक्के घट झाली. औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यात १० ते २० टक्के घट झाली. वसमत तालुक्यात २० ते ५० टक्के घट झाली. वसमत तालुक्यात पावसात घट आल्यामुळे भूजलपातळीत सर्वांत कमी वाढ झाली.

पाणलोट क्षेत्रनिहाय भूजलपातळीचा अभ्यास केला असता २१ पाणलोट क्षेत्रात वाढ, तर २ पाणलोट क्षेत्रात घट असल्याचे आढळून आले. सप्टेंबर महिन्यातील भूजलपातळीच्या नोंदीनुसार वसमत तालुक्यातील २६ आणि औंढा नागनाथ तालुक्यातील ५ असे एकूण ३१ गावांमध्ये येत्या जानेवारी महिन्यातच पाणीटंचाई भासण्याची शक्यता होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. 

सप्टेंबर महिना तुलनात्मक भूजलपातळी स्थिती (मीटरमध्ये)

तालुका  पाच वर्षाची सरासरी २०१९ वाढ
हिंगोली ३.२३  २.१६ १.०७
कळमनुरी ३.५५  २.४२  १.१३
वसमत ५.४८  ४.५४ ०.९३
औंढानागनाथ ३.०८ २.०१  १.०६
सेनगाव  ४.०१  २.२५  १.७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com