पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाची गती मंदावली

शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाची गती मंदावली
शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाची गती मंदावली

पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यास २४ फेब्रुवारीपासून सुरवात केली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात या योजनेचा लाभ देण्याची गती मंदावली आहे. त्यामुळे अजूनही बहुतांशी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यास २४ फेबुवारीपासून रोजी सुरवात केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या योजनेचा प्रारंभ पुणे येथे केला होता. या वेळी १५ व्यक्तींना लाभ दिल्याबद्दल थाटात सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नोंदी करण्याचे काम वेगाने सुरू होते. राज्यातील सुमारे ७० लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये मदत मिळणार आहे. परंतु गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी धीम्या गतीने सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही लाभापासून दूर आहेत.  

पुणे जिल्ह्यातील जवळपास १९२२ गावे आहेत. यामध्ये एकूण आठ लाख ३५ हजार ४९७ आठ ‘अ’प्रमाणे खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी १८७८ गावांची माहिती संकलित झाली आहे. यामध्ये तीन लाख ३८ हजार २७५ पात्र शेतकरी ठरविण्यात आले आहे. तर एनआयसी पोर्टलवर १८४२ गावांतील पात्र झालेल्या ३ लाख ३६ हजार ८८९ शेतकऱ्यांची माहिती भरून पात्र ठरविण्यासाठी योजनेच्या प्रणालीवर अपडेट करण्यात आली आहे. जिल्ह्यात लागवडीलायक धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबीयांना दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाख ४ हजार ३५३ अर्ज रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या 
तालुका गावांची संख्या   पात्र लाभार्थी संख्या 
हवेली   १११   १५७१८ 
पिंपरी चिंचवड   ६   ४४० 
शिरूर   १०४   ४४६८४ 
भोर   १९४  १२७००
वेल्हा   १२८   ७५४७ 
दौड   ९८    ३७,४५६
पुरंदर  १०० १४,०३१ 
बारामती   ११७   ४१५४१ 
इंदापूर   १४१   २९,९७३ 
खेड   १८७   ३१,३३५ 
जुन्नर   १७९   ४६,१७४ 
आंबेगाव   १४२   ३४,२१५ 
मावळ   १८९   ७४६५ 
मुळशी  १४६   १३,६१० 
एकूण   १८४२   ३६,८८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com