कांदेबाग केळीची लागवड वाढण्याची शक्‍यता

कांदेबाग केळीची लागवड वाढण्याची शक्‍यता
कांदेबाग केळीची लागवड वाढण्याची शक्‍यता

जळगाव ः खानदेशात कांदेबाग लागवडीची तयारी चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत सुरू झाली आहे. पावसाबाबत सकारात्मक स्थिती व अनेक प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा असल्याने केळी लागवड वाढेल, असे संकेत मिळत आहेत. 

खानदेशात कांदेबाग केळी लागवडीसाठी चोपडा, जळगाव हे तालुके आघाडीवर आहेत. चोपडा तालुक्‍यात या हंगामात सुमारे २०० ते २५० हेक्‍टर, तर जळगावात सुमारे १०० हेक्‍टर क्षेत्र वाढू शकते. कारण केळीचे दर टिकून आहेत. इतर पिकांमधील उत्पादनाला हवे तसे दर नसल्याने केळीकडे अनेक शेतकरी वळतील. यामुळे लागवड वाढून ती चोपडा व जळगाव तालुक्‍यात मिळून पाच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक होईल. 

जळगाव तालुक्‍यात किमान १३०० हेक्‍टरपर्यंत लागवड होऊ शकते. चोपडा व जळगाव तालुक्‍यांतील तापी नदीकाठी कांदेबाग केळी लागवड दरवर्षी केली जाते. तर पाचोरा व धुळ्यातील शिरपूर येथेही अनेक शेतकरी कांदेबाग केळीची लागवड करतात. ही लागवड या महिन्याच्या अखेरिस व ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. 

लागवडीसाठी शेतकरी कंदांना पसंती देतात. त्यात उतिसंवर्धित केळी बागांमधील कंद याशिवाय आंबेमोहोर, उंच श्रीमंती, बसराई, महालक्ष्मी केळी वाणांना किंवा कंदांना शेतकरी पसंती देतात. या कंदांच्या पाहणीसाठी शेतकरी जामनेर, रावेर, शिरपूर, पाचोरा, औरंगाबाद आदी भागांत जात आहेत. कंदांची आगाऊ मागणी संबंधित शेतकऱ्यांकडे शेतकरी करून घेत असून, जसे कंद उपलब्ध होतील, त्यानुसार लागवडीचे नियोजन करीत आहेत. मूग, उडीद व धैंचा याखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात कांदेबाग केळी लागवडीचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. 

कांदेबाग केळी लागवडीसंबंधी आम्ही नियोजन करीत असून, ऑक्‍टोबरच्या मध्यापर्यंत लागवड पूर्ण करू. आमच्या भागात या हंगामात कांदेबाग केळीची लागवड वाढू शकते. कारण पावसासंबंधी सातत्य असून, जलसाठेही बऱ्यापैकी आहेत.  - विजय पाटील,  शेतकरी, गाढोदे (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com