दूध सोसायट्या, उत्पादकांच्या मानगुटीवर ‘जीएसटी’चे भूत
दूध सोसायट्या, उत्पादकांच्या मानगुटीवर ‘जीएसटी’चे भूत

दूध सोसायट्या, उत्पादकांच्या मानगुटीवर ‘जीएसटी’चे भूत

जळगाव : दूधदरात लीटरमागे रोज तीन रुपये फटका सहन करणाऱ्या दूध सोसायट्या, उत्पादकांना आता वस्तू व सेवाकर क्रमांक नोंदणी करून मिळविण्याचे सरसकट परिपत्रक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने जारी केले आहे. यामुळे दूध उत्पादक व सोसायट्यांमध्ये खळबळ उडाली, पण लागलीच दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी जे दूध संघाचे तूप खरेदी करतात, त्यांनाच हा जीएसटी क्रमांक संघाला द्यावा लागेल, असे स्पष्टीकरण काही दूध उत्पादकांना दिले. या प्रकारामुळे दूध सोसायट्या व उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दूध संघाला दूधपुरवठा करणाऱ्या सोसायट्या व गट यांना संघाच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी आपला जीएसटी क्रमांक संघाकडे सादर करा, अशा सूचना दिल्या. त्यासाठी परिपत्रक दिले. यावरून सोशल मीडियावर दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त करताच, दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक फक्त दूध संघाचे तूप ज्या सोसायट्या खरेदी करून त्याची ग्राहकांना विक्री किंवा पुरवठा करतात त्यांनाच लागू राहील, असे स्पष्टीकरण दिले, परंतु या परिपत्रकामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे.

तूप खरेदीदारांच्या उलाढालीचे आकडे घ्या जी सोसायटी दूध संघाकडून आलेल्या तुपाच्या विक्रीतून २० लाखांवर उलाढाल करील, त्यांचाच जीएसटी क्रमांक घ्यावा. दुधावर तर जीएसटी नाही, त्यामुळे सर्वच दूध सोसायट्यांना जीएसटी क्रमांक देण्याचे परिपत्रक जारी करणे मूळ भोंगळ कारभाराचे लक्षण असल्याची टीका काही दूध उत्पादकांनी केली आहे.

वितरणावरही नाही लक्ष दूध संघ सध्या जेवढे संकलन करीत आहे, तेवढ्या दुधाची विक्री होत नाही. रोज शिल्लक राहणाऱ्या दुधातून पावडर, लोणी तयार करावे लागते. त्यालाही उठाव नसल्याने दूध पावडर व लोणीची गोदामे भरत आहेत. दूध विक्री वाढविण्यासाठी मार्जीन कमी करण्याची गरज आहे. जसे दूधाचे खरेदी दर कमी केले तसे संघाने त्याचे विक्री दरही कमी करावेत. यामुळे विक्री वाढेल, असेही उत्पादकांचे म्हणणे आहे.

जी सोसायटी किंवा गट हा दूध संघाच्या तुपाची २० लाखांवर विक्री करीत असेल, त्याच सोसायटीचा जीएसटी क्रमांक दूध संघाने घ्यावा. मुळातच दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी नसावा. - गीता चौधरी , अध्यक्ष, कामधेनू महिला सहकारी दूध सोसायटी, खिरोदा (जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com