दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची उधळण
मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर विजयाच्या सुरू असलेल्या आडाखे बांधणीला सोमवारी (ता. १८) निकालानंतर पूर्णविराम मिळाला. निकाल जसजसे जाहीर होत होते तसतसे गावाचे कारभारी म्हणून संधी मिळालेल्यांकडून गुलालांची उधळण अन् घोषणांचा निनाद सुरू झाला.
औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर विजयाच्या सुरू असलेल्या आडाखे बांधणीला सोमवारी (ता. १८) निकालानंतर पूर्णविराम मिळाला. निकाल जसजसे जाहीर होत होते तसतसे गावाचे कारभारी म्हणून संधी मिळालेल्यांकडून गुलालांची उधळण अन् घोषणांचा निनाद सुरू झाला. या एकूणच निवडणूक प्रक्रियेत कुठे आधीच्या सत्ताधाऱ्यांना संधी तर कुठे मातब्बरांना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोबतच विविध राजकीय पक्षांकडून ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेचे दावे प्रतिदावेही सुरू झाले.
मराठवाड्यातील ४१३४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यापैकी ४१३३ ग्रामपंचायतीसाठी जाहीर कार्यक्रमानुसार मतदान होणार होते. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीपैकी ३८८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मराठवाड्यात प्रचंड उत्साह व चुरशीने १५ जानेवारीला झालेल्या मतदानात मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायतीसाठी ८३.५८ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी ८०.६१ टक्के,लातुर जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतीसाठी ७८.८२ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतीसाठी ८१.४८ टक्के तर जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतीसाठी ८२.३२ टक्के मतदान झाले होते. ‘गावाचा कारभारी’ होण्याचा मान कुणाला मिळणार यासाठी मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सोमवारी सकाळी ९ वाजता विविध तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. निकाल जसजसे लागणे सुरू झाले तसतसे निवडणुकीच्या रिंगणातील विजेत्यांकडून गुलालांची उधळण अन घोषणा देऊन विजयोत्सव साजरा केला गेला. जालना जिल्ह्यातील पाथरवाला बु. व कुरण ग्रामपंचयातवर अंकुशराव टोपे ग्रामविकास पॅनल विजयी झाल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गावसत्तेचा गड कायम राखला. तर जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दहा मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये झालेले सत्ता परिवर्तन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्का मानले जात आहे.
राज्याचे रोहयो, फळबाग मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटाचे सर्वच्या सर्व १७ जागेवरील उमेदवार निवडून आले. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मुळ चित्तेपिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणीत पाच सदस्य विजयी झाले. औरंगाबाद बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनाही ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला.
भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्येचा पराभव
औरंगाबाद तालुक्यातील आदर्श गाव पाटोदा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गेली पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत सत्ताकेंद्रात केंद्रस्थानी असलेल्या भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ११ सदस्यांपैकी ८ सदस्य बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत तीन जागेसाठी निवडणूक झाली. यावेळच्या निवडणुकीतून भास्करराव पेरे पाटील यांनी माघार घेतली होती. नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
- 1 of 1054
- ››