गारपीटीने कांदा पातींसह स्वप्नेही तुटली...

बोरासारख्या टपोऱ्या गारांमुळे कांद्याची पात तुटुन पडली. त्यामुळे ‘फक्त पातचं तुटली नाही, तर आम्ही पाहिलेलं स्वप्नंच तुटलं’, अशी प्रतिक्रिया सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांनी दिली.
The hail also shattered dreams, including onion leaves
The hail also shattered dreams, including onion leaves

नाशिक : अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात अनेक कारणांनी कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले. पुढे घरगुती बियाणे संपुष्टात आल्यानंतर खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने महागडे बियाणे घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. ही रोपे तयार करून प्रतिकूल परिस्थितीत लागवडी पूर्ण केल्या. मेहनत घेऊन उन्हाळ कांदा लागवडी बहरल्या. चालू वर्षी काहीतरी साधलं जाईल अन् दोन पैसे पदरी पडतील, अशी आशा होती. मात्र, १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीमुळे सारं होत्याच नव्हतं झालं. बोरासारख्या टपोऱ्या गारांमुळे कांद्याची पात तुटुन पडली. त्यामुळे ‘फक्त पातचं तुटली नाही, तर आम्ही पाहिलेलं स्वप्नंच तुटलं’, अशी प्रतिक्रिया सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांनी दिली.

चालू वर्षाचा कांदा लागवडीचा खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक व अनैसर्गिक दोन्ही घटकांमुळे मोठा अडचणीचा राहिला. त्यातच सटाणा तालुक्याच्या पश्चिम व काही प्रमाणावर पूर्व भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका कांदा पिकाला सर्वाधिक बसला आहे. अवकाळी पावसासह गारपीट ठीकठिकाणी काही अंतरावर झाली. त्यातही ज्या गावांमध्ये गारपीट झाल्या, अशा गावांतही नुकसानीचे प्रमाण असमान आहे. त्यामुळे काहींच्या लागवडी पूर्णच हातातून गेल्या. तर काही लागवडी नुकसान होण्यापासून वाचल्याही आहेत. नोव्हेंबर महिन्यात ज्यांच्या आगाप लागवडी झाल्या. अशा लागवडी येत्या काही दिवसात काढणीवर होत्या. मात्र, झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका काढणीस आलेल्या कांद्याला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्यासह  टिकवणक्षमतेवर परिणाम आहे. तर जोड कांदे तयार होण्याचे प्रमाण वाढणार असल्याने प्रतवारीवर मोठा परिणाम होणार आहे.

या गावांमध्ये अधिक नुकसान : अंतापूर, ताहाराबाद, पिंगळवाडे, मुंगसेपाडा, दसवेल, मळगावपाडा, रावेर, अंबासन

गारपिटीने अतोनात नुकसान

  • गारांच्या फटक्यामुळे अडीच महिन्यांपुढील लागवडीमध्ये पात तुटली
  • कांद्याला पातच नसल्याने काळी बुरशीचा प्रादुर्भाव वाढता. तीन महिन्यांच्या लागवडीत कांद्याला गारांच्या फटक्याने जखमा
  • तापमान वाढते असल्याने जखमा झालेल्या कांद्याची वेगाने सड होण्यास सुरुवात
  • पात तुटून नवीन फुटवे येण्याची अवस्था सुरू
  • बाधित कांद्यावर प्रतिबंधात्मक फवारण्या करूनही परिणाम कमी
  • कांदा उत्पादकांसमोर अडचणी वाढल्या दरवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० हजार रुपये अतिरिक्त उत्पादन खर्च वाढला आहे. गारपिटीमुळे तालुक्यात सर्वाधिक २,६२३ हेक्टरवर नुकसान झाले. तर या निम्म्याहून कमी क्षेत्रावर कृषी विभागाने पंचनाम्यात ३३ टक्क्यांवर नुकसान ग्राह्य धरले आहे. आता जे उत्पादन हाती येईल त्यात सड वाढती असल्याने कांदा साठविण्यास अडचणी येतील. त्यामुळे हाती काही येईल की नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांनी फवारण्या केल्या आहेत. मात्र, त्याचा परिणाम अपेक्षित नाही. मात्र ज्या ठिकाणी लागवडीमध्ये सुधारणा होईल. तेथे मात्र फुटवे येऊन जोड कांदा तयार होण्याचे प्रमाण वाढणार असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणी वाढत्या असल्याची स्थिती आहे.

    कांदा पिकाला पातच राहिली नाही. हे पीक हातातून गेले. दिवस रात एक करून पिक उभ केले. अन आता गारांमुळे पात नसल्याने कांद्याची वाढ होणार नाही. कांदा आकार येण्याच्या अवस्थेत असताना आता बुरशीचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यामुळे कांदा टिकणार नाही. - दिनेश उत्तम अहिरे, कांदा उत्पादक, अंतापूर, ता. सटाणा

    गारपीट व अवकाळी पावसामुळे कांद्याचे पोषण होण्यास अडचणी आहेत. त्यामुळे अपेक्षित आकार तयार होणार नाही. जागेवर कांदा सडत आहे. त्यामुळे कांदा काढल्यानंतर उत्पादन कमीच येणार आहे. त्यास कांदा साठविता येणार नसल्याने आगामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. - रोहिदास नानाजी जाधव, कांदा उत्पादक, अंतापूर, ता. सटाणा

    रंग, आकार, टिकवणक्षमता यासाठी कसमादे भागातील कांद्याची विशेष ओळख आहे. काढणी पश्चात सरासरी ८ महिन्यापर्यंत कांदा टिकतो. मात्र, ज्या भागात गारपीट झाली. या भागातील कांद्याची प्रतवारी अडचणीत आली आहे. त्यामुळे काढणीपश्चात साठविण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान आहे. - अनिकेत सोनवणे, व्यवस्थापकीय संचालक- सुगी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, अंतापूर, ता. सटाणा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com