मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी सोलली पाठ

नगर, सातारा, पुणे, सोलापूर, जालना जिल्ह्यांत चांगलीच गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या द्राक्षे, कलिंगडे, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.
Hail in Central Maharashtra, Marathwada
Hail in Central Maharashtra, Marathwada

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी गारांसह वादळी पाऊस पडत आहे. नगर, सातारा, पुणे, सोलापूर, जालना जिल्ह्यांत चांगलीच गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या द्राक्षे, कलिंगडे, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. 

राज्यात पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. दिवसभर काही प्रमाणात ऊन पडत असले, तरी दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. सायंकाळी चार वाजल्यानंतर मळभ दाटून येत असून जोरदार वारे वाहत आहेत. तर काही ठिकाणी वादळी पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद या भागांत सलग पाऊस होत असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत येत आहे. मध्य महाराष्ट्रातही नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाचा दणका सुरूच आहे. 

राज्यात बुधवारी सायंकाळी खटाव तालुक्यातील (जि. सातारा) मोळ, डिस्कळ परिसरांत गारांसह जोरदार पाऊस झाला. कोरेगाव, माण या दुष्काळी तालुक्याचा अनेक भागांत पूर्वमोसमी पावसासह गारपीट झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन, पिंपोडे, जाधववाडी खटाव तालुक्यातील मोळ, डिस्कळ परिसरात तसेच माण तालुक्यातील टाकेवाडी, कुळकजाई, पांगारी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या परिसरात अनेक शेतात गारांचे खच लागले होते. या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नगर तालुक्यातील काही भागांत वादळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकांचे चांगलेच नुकसान झाले. 

पुणे जिल्ह्यातील कारेगाव, रांजणगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला व कलिंगड, खरबूज पिकांचे नुकसान झाले. सोलापूरमध्ये काही ठिकाणी जोरदार गारपीट झाल्याने द्राक्षे बागांचे मोठे नुकसान झाले. 

मराठवाड्यातही औरंगाबाद शहराच्या पूर्व भागात तसेच करमाड, कुंभेफळ परिसरात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. जालना जिल्ह्यातील राजूर परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राजूर दुपारी चार वाजताच्या सुमारास राजूरसह परिसरात सुमारे अर्धा तास वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बाजारात व्यापारी तसेच ग्रामस्थांची मोठी धांदल उडाली. मुसळधार पावसाबरोबर थोडा वेळ काही प्रमाणात गारांचा पाऊस झाला. राजूरसह, लोणगाव, खामखेडा, तपोवन, उंबरखेडा, चांधई आदी ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात लावलेल्या शेडनेटची दुरवस्था झाली आहे. तर आंब्याचीही मोठ्या प्रमाणात गळ झाली. 

बुधवारी रात्री लागणाऱ्या लॉकडाउनमुळे बाजारात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पावसात अनेकांची धांदल उडाली होती. जामखेड परिसर, किनगाव परिसरात सायंकाळी पावणेसहा वाजल्यापासून जोरदार पाऊस पडला. वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या गव्हाचे नुकसान होत आहे. तसेच वाऱ्यामुळे आंब्याची फळे गळून पडत आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. विदर्भातील अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी हलक्या पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. 

पावसाने नुकसान

  • पिंपळगाव बारव (ता. जालना) येथे शेतकरी साहेबराव फटाले यांच्या एक म्हैस व वासराचा वीज पडून मृत्यू 
  • सोलापुरात द्राक्षे पिकाला मोठा फटका 
  • वादळी पावसामुळे विदर्भातील शेतकरी चिंतेत 
  • साताऱ्यात गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान 
  • जोरदार वाऱ्यामुळे आंब्याची फळगळ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com