हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
रत्नागिरी : गारपिटीचा आंबा बागांना फटका
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह रब्बीचे सुमारे १०० हेक्टरवरील नुकसान झाले आहे.
रत्नागिरी ः पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसासह गारपिटीमुळे जिल्ह्यातील आंबा, काजूसह रब्बीचे सुमारे १०० हेक्टरवरील नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा सर्व्हे सुरू केला आहे. सर्वाधिक नुकसान संगमेश्वर, चिपळूण तालुक्यात झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात १८ फेब्रुवारीला अवकाळी मुसळधार पावसाने पहाटेच्या सुमारास रंग दाखवले. त्यानंतर सायंकाळी चिपळूण, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
रत्नागिरी तालुक्यात बसणी, नेवरे, गणपतीपुळे, करबुडे, वेतोशी, नेवरेत तर लांजा तालुक्यात वेरळ, शिपोशी, कोचरी, सालपे, पालु, केळवली, माचाळ, हुंबरवणे, चिंचुरटी या भागात गारांचा पाऊस झाला. या पावसाचा फटका हापूसला बसला आहे. याच कालावधीत आंबा तयार होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
गारा थेट आंब्यावर पडल्याने डाग पडले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळ झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील क्षेत्र सर्वाधिक आहे. अचानक पडलेल्या पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात १०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हापूसला बसला असून काजू बी पावसामुळे गळून गेल्या आहेत. रब्बी हंगामावरही
याचा परिणाम झाला आहे. सुमारे दहा हेक्टरवरील भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घारपडे म्हणाले की, पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. आंबा, काजूसह रब्बीतील काही पिकांना पावसाचा फटका बसलेला आहे. एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविला जाईल.