नाशिक जिल्ह्यात गारांचा तडाखा, वादळामुळे मोठे

नाशिक जिल्ह्यात गारांचा तडाखा, वादळामुळे मोठे
नाशिक जिल्ह्यात गारांचा तडाखा, वादळामुळे मोठे

नाशिक  : संपूर्ण जिल्हाभर दुष्काळाच्या झळा सोसत असताना (ता. ७) रोजी पावसाचे आगमन झाले. नांदगाव, येवला, चांदवड, निफाड या तालुक्यात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला. खरीप हंगामाच्या त्याच्या आशाही पल्लवित झाल्या. मात्र, या वेळी गारांच्या पावसासह वादळवाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. तर कांदाचाळ तसेच शेड पडून मोठ्या प्रमाणावर कांदा भिजला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यामुळे फळबागा उन्मळून पडल्या. पशुधनाच्या चाऱ्याच्या सोयीसाठी साठवलेला चाराही पावसात भिजला तर काही ठिकाणी वादळामुळे तो उडून गेला. त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे हाल व नुकसान झाले आहेत. त्यामुळे काहीकाळ कामकाज विस्कळित झाले होते. ज्या भागात गारांच्या पावसासह वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे तेथे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  चांदवड तालुका  चांदवड तालुक्याच्या पूर्व दक्षिण भागात विजांचा कडकडाट व वादरी वाऱ्याने थैमान घातले होते. चांदवड शहरात तुरळक पाऊस पडला. मात्र, तालुक्यातील तळेगाव रोही, काळखोडे, काजीसांगावी, सोनीसांगवी, रेडगाव, साळसाने, वाकी, वाहेगाव साळ, हिवरखेडे, कोलटेक, पाटे, दहिवद, दिघावद, दुगाव, रायपूर, भडाणे, पिंपळगाव, दाभळी, निंबाळे या गावांमध्ये व परिसरात पावसाने विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. सुरवातीला गारा पडल्या. यामुळे ठिकठिकाणी झाडे व विजेच्या तारा तुटल्या व खांबही पडले आहेत. पाटे गावातील प्रकाश चव्हाण यांच्या छतावरील कौले व पत्रे उडाले. तर दिघवद शिवारातील युवराज कजबे यांच्या घराचे पूर्ण पत्रे उडाले. काजीसांगावी येथील समाधान सोनवणे यांचा शेतातील वीजवाहिनी जमीनदोस्त झाली आहे. वाहेगाव साळ येथील शोभा खैरे यांच्या पोल्ट्रीवर झाड कोसळले त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. यात कुक्कुट खाद्य भिजले तसेच २०० कोंबड्या मृत पावल्या आहेत. निफाड तालुका  निफाड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस झाला. नाशिक, औरंगाबाद महामार्गावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक रोडावली अखेर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. अनेक ठिकाणी वादळामुळे खांब पडल्याने व तांत्रिक अडचणी आल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. लासलगाव, विंचूर व निफाड परिसराच्या आसपास दीड तास गारांचा पाऊस झाला. सायखेडा, चांदोरी, नांदूर मध्यमेश्वर , नैतले, कुंदेवादी, शिवरे, सोनेवाडी, खेडलेझुंगे, रुई या गावांमध्ये तासभर पाऊस झाला. लासलगाव येथे कांदा व्यापाऱ्यांचे कांद्याचा  शेडचे छत असून ते जमीनदोस्त झाले. यामध्ये हजारो क्विंटल कांदा खराब झाला आहे.  नांदगाव तालुका  नांदगाव तालुक्यात मनमाड येथे गारांचा तडाखा झाला. नंतर वादळी वारा व पावसाने हजेरी लावली. पाणीटंचाईने बेजार झालेल्या मनमाडकारांना तूर्तास दिलासा मिळाला. विजांचा कडकडाट, वादळी वारा व गारांच्या वर्षावात मोठे नुकसान झाले. अनेक घटलराचे पत्रे, छप्पर उडून गेले. रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.  येवला तालुका  येवला तालुका व परिसरात झालेल्या पावसासह वादळाने सुमारे  ५० लाखांचे नुकसान केले. तालुक्याच्या पश्चिम भागात मुखेड, सत्यगाव येथे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सत्यगाव येथील शेतकरी वाल्मीक सांगळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले यात ढोबळी मिरचीचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने डाळिंब, पेरू यांची झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे मनमाड रोडवरील उमेश अट्टल यांचे कांद्याचे शेड कोसळले. यात शेडमधील कांदा भिजला. शेडही पडल्याने त्यांचे दहा लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्यातील पूर्व भागात राजापूर, ममदापूर येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. तालुक्यातील नगरसूल येथील आठवडे बाजारात तारांबळ उडाली होती.

दिंडोरी तालुका सकाळपासून उष्णता अधिक प्रमाणावर जाणवत होती तसेच ढगाळ वातावरण दिसून आले. तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला आहे.

झालेले नुकसान दृष्टिक्षेपात

  •     वादळी वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले.
  •     विजेचे खांब व तारा तुटल्याने महावितरणचे मोठे नुकसान 
  •     अनेक ठिकाणी फळबागा उन्मळून पडल्या. 
  •     कांदा चाळ व शेडचे छत उडाल्याने हजारो क्विंटल कांदा भिजला.
  •     जनावरांसाठी साठवलेला चारा भिजला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com